महिला आणि बालविकास मंत्रालय
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात महिला 20 (W20)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)इथे 27-28 फेब्रुवारी 2023 रोजी महिला-20(W20) परिषदेचे आयोजन
Posted On:
25 FEB 2023 7:02PM by PIB Mumbai
जी-20 समूहाच्या 2015 साली तुर्कीयेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत, W20 -महिला-20 हा गट स्थापन करण्यात आला होता. या गटाचे प्राथमिक उद्दिष्ट, जी-20 गटाच्या चर्चेत,लैंगिक समानता हा मुद्दा प्राधान्याने चर्चिला जाणे सुनिश्चित करणे आणि जी-20 नेत्यांच्या घोषणापत्रात, धोरणे आणि कटिबद्धतेमध्ये लैंगिक समानता आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यावर भर देणे यासाठीही हा गट कार्यरत असतो.
भारताच्या जी-20 अध्यक्षपदासोबतच आपण 12 डिसेंबर 2022 रोजी, W20 चे देखील अध्यक्षपद स्वीकारले. W20 मध्ये आपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, “महिला-प्रणीत विकास” हे आपले ध्येय ठेवले आहे. ज्यानुसार, महिलांसाठी समानतेवर आधारित प्रतिष्ठेचे जीवन जगता यावं असे वातावरण निर्माण करणे, जिथे महिलांना त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात बदल घडवता येतील, अशी समान संधी निर्माण करणे हाही उद्देश आहे.
W20, 2023 अंतर्गत, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासातील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या तसेच इतरांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम वातावरण आणि व्यवस्था सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.
W20, 2023 मध्येही या गटाच्या आधीच्या बैठकीतील अजेंडा पुढे नेला जाईल, हे सुनिश्चित करण्यात आले आहे. त्याचवेळी, W20चे एक मजबूत जागतिक आणि राष्ट्रीय जाळे निर्माण करायचे आहे. यात, होणाऱ्या सर्वसमावेशक चर्चा आणि कृती यावर W20 चे घोषणापत्र निश्चित केले. W20 2023 मध्ये महिलांना सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यातून जगभरातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतील.
भारताच्या अध्यक्षतेखाली W20 ची पाच प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यात, उद्योजक महिला, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता , शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, असे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत.
संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा डब्ल्यू 20 च्या अध्यक्षस्थानी आहेत. समूहातील इतर प्रतिष्ठित भारतीय प्रतिनिधींमध्ये 5 व्या राजस्थान वित्त आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉ. ज्योती किरण शुक्ला, पंतप्रधानांच्या आर्थिक परिषदेच्या सदस्य प्रा. शमिका रवी, भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी भारती घोष, अभिनेत्री रवीना टंडन, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज तसेच उद्योजक आणि डब्ल्यू 20 सचिवालयाच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांचा समावेश आहे. डब्ल्यू 20 मध्ये 19 देश आणि युरोपिय महासंघा चे अंदाजे 100 प्रतिनिधी आहेत. पाच कृती दले, धोरण शिफारशी आणि संवादाचा मसुदा तयार करण्यासाठी हे प्रतिनिधी सहकार्य करतात आणि तीव्रतेने कार्य करतात. डब्ल्यू 20 इंडोनेशियाकडून पदभार स्वीकारल्यापासून डब्ल्यू 20 भारताने ज्ञान आणि नेटवर्क भागीदार म्हणून विविध संस्थांसोबत 15 हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. भारतातील 10 राज्यांमध्ये हजारो महिलांसोबत 40 जन भागीदारी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे 27-28 फेब्रुवारी, 2023 रोजी आरंभीची पहिली बैठक आयोजित केली जाईल. त्यानंतर 13-14 एप्रिल रोजी राजस्थानातील जयपूर येथे आणि 15- 16 जून रोजी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे आणखी दोन डब्ल्यू 20 आंतरराष्ट्रीय संमेलने होतील. औरंगाबाद शहर डब्ल्यू 20 ची पहिली बैठक आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी लिंग समानता, समानता आणि प्रतिष्ठेचा पाठपुरावा’ ही या पहिल्या बैठकीची संकल्पना आहे आणि लिंग-संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी चर्चा करणे, विचारविनिमय करणे आणि एक ठोस धोरण विकसित करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे. या बैठकीत जी 20 राष्ट्रे, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
W20 च्या उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, स्मृती झुबिन इराणी उपस्थित राहणार असून, उपस्थित मान्यवरांसमोर त्या लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडतील. भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित राहतील. त्याशिवाय, या बैठकीला भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत, W20 चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्डन तुर्कतान आणि W20 इंडोनेशिया 2022 च्या अध्यक्ष उली सिलाही या बैठकीला उपस्थित राहतील.
सुरुवातीच्या बैठकीत विविध विषयांवर आयोजित पॅनल चर्चासत्रांमध्ये सहभागी सदस्य आपले विचार मांडतील. नॅनो, मायक्रो आणि स्टार्ट अप उद्योगांमधील महिलांचे सक्षमीकरण, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या कृतीसाठी बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका, तळागाळामधील महिला नेतृत्वासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करणे, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासाद्वारे डिजिटल क्षेत्रातील लिंगाधारित विभाजन दूर करणे, शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी मार्ग तयार करणे आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास, या विषयांचा यात समावेश असेल.
भारतीय नौदल, तळागाळातील उद्योजकता यासह महिलांसाठी अडथळे ठरणाऱ्या विविध अपारंपरिक क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिध्द करणाऱ्या भारतातील महिलांच्या कथाही प्रतिनिधींसमोर सादर केल्या जातील. त्याशिवाय, प्रारंभिक बैठकीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच, महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यासाठी, औरंगाबादमधल्या वारसा स्थळांची आणि प्राचीन एलोरा लेण्यांची भेट आयोजित केली जाईल.
आज भारत महिलांच्या विकासापासून, ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासापर्यंतचे वेगाने होत असलेले स्थित्यंतर पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, शाश्वत विकासामध्ये महिलांची समान भागीदारी असलेल्या नवीन भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून देश पुढे जात आहे. सक्षम महिला सन्मानाने जगतात, आणि समान भागीदार म्हणून आपले योगदान देतात, असा समाज घडवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
W20 बैठकी, सदस्य देशांमधील सहकार्याला चालना देण्यामध्ये आणि लिंग समानता आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणखी प्रोत्साहन देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील.
***
S.Patil/R.Aghor/P.Jambhekar/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902375)
Visitor Counter : 809