राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिल्ली विद्यापीठाचा 99 वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2023 3:22PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 फेब्रुवारी 2023) दिल्ली विद्यापीठाच्या 99 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, दिल्ली विद्यापीठ भारताची समृद्धता आणि विविधता प्रतिबिंबित करते. तसेच भारत आणि परदेशातल्या सर्वच क्षेत्रांच्या कामगिरीमधून दिल्ली विद्यापीठाची थोडीफार झलक दिसून येते. मात्र, कोणतीही संस्था आपल्या गौरवशाली परंपरेवर विसंबून राहू शकत नाही. आजच्या वेगवान बदलांच्या जगात, एखाद्या संस्थेला सतत स्वतःचा पुन्हा नव्याने शोध घ्यावा लागतो.
राष्ट्रपती म्हणाल्या की आपण सर्व भाषा आणि संस्कृतींचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण नेहमी आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले राहायला हवे. भारतीय मातीशी जोडलेले राहून जगात उपलब्ध असलेले उत्कृष्ट ज्ञान मिळवण्यासाठी युवा पिढीने गांधीजींच्या सल्ल्याचे पालन करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या गावामधून शहरात शिक्षणासाठी जाणारी आपल्या गावातली पहिली मुलगी, त्या स्वतः होत्या. त्यांच्या वर्गमित्रांमध्येही असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांच्या कुटुंबातील किंवा गावातील कोणालाही त्यांच्या आधी विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणे शक्य झाले नसेल. असे विद्यार्थी अत्यंत प्रतिभाशाली आणि कष्टाळू असतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते विद्यापीठात मोठ्या उत्साहाने येतात. कधी-कधी ते न्यूनगंडाचे बळी ठरतात. हे कोणत्याही संवेदनशील समाजात घडू नये. विद्यापीठातील अशा पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांची आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट एक चांगला माणूस घडवणे हे आहे. आयुष्यात मोठ्या गोष्टी मिळवणं चांगलं, पण चांगलं माणूस बनणं त्याहून अधिक चांगलं आहे. मंगळावरील जीव सृष्टीचा शोध घेणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु चांगला हेतू ठेवून, जीवनात स्व-कल्याणाचा शोध घेणे, हे त्याहून अधिक महत्वाचे आहे. नवा भारत आणि नवे जग निर्माण करण्यासाठी नवीन स्वप्न पहा आणि मोठी स्वप्ने पाहा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902291)
आगंतुक पटल : 248