संरक्षण मंत्रालय
नाविन्यपूर्ण संशोधन करा , अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करा आणि नवीन कंपन्या स्थापन करा: पश्चिम बंगालमध्ये विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तरुणांना संरक्षण मंत्र्यांचे आवाहन
Posted On:
24 FEB 2023 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
भारताला अधिक शक्तिशाली आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना नवीन गती देण्यासाठी तरुणांनी नवनवीन शोध लावावेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे तसेच नवीन कंपन्या, संशोधन संस्था आणि स्टार्ट-अप स्थापन करावेत असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 24 फेब्रुवारी 2023 रोजी पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना संरक्षण मंत्री बोलत होते.
संरक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच एक संघ म्हणून काम करण्यासाठी आणि जीवनातील यश आणि अपयशाने भरकटून न जाण्यासाठी प्रेरित करण्याची गरज व्यक्त केली. कोणत्याही संकटाने विचलित न होता संतुलित मार्गाने पुढे जाण्याची क्षमता हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये अहंकार किंवा गर्व येऊ देऊ नये असे त्यांनी आवाहन केले. चारित्र्य , ज्ञान आणि संपत्ती यांना समान महत्त्व दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. भारताच्या प्रगतीचा मार्ग तरुणांमधून जातो. त्यामुळे तरुण जितके बलवान असतील तितका आमचा देश मजबूत होईल,” असे सिंह यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपले नैतिक कर्तव्य असल्याचे समजून, ते जिथे जातील तिथे विश्व भारतीचा प्रसार करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. विश्व भारती विद्यापीठ हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या तात्विक वारशाचे भौतिक प्रकटीकरण तसेच त्यांच्या ज्ञान आणि सुज्ञपणाचे मूर्त स्वरूप असल्याचे सिंह यांनी म्हटले. “विश्व भारती हे भारतीय तसेच जागतिक ज्ञानाचे अनोखे मिश्रण आहे. हे विद्यापीठ जगभरातील ज्ञानाचा प्रवाह समजून भारतीय विचारांमध्ये अंतर्भूत करते आणि संपूर्ण जगाला प्रबुद्ध करते,” असे ते म्हणाले.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या राष्ट्रवादाची आणि वैश्विक मानवतावादाची कल्पना विशद करताना संरक्षण मंत्र्यांनी टागोर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि मूल्यांनी भारतीय समाज आणि राजकारणावर कसा खोलवर प्रभाव पाडला याबाबात विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. शतकानुशतके भारतीय राष्ट्रवाद हा सहकार आणि मानव कल्याणाच्या भावनेवर आधारित आहे हे त्यांनी अधोरेखित केले. “भारतीय राष्ट्रवाद हा सांस्कृतिक आहे, प्रादेशिक नाही. क्षेत्राआधी जाणिवेला महत्व आहे. भारतीय राष्ट्रवादात मानवी कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय राष्ट्रवाद हा निवडक नसून सर्वसमावेशक आहे आणि तो सार्वत्रिक कल्याणाने प्रेरित आहे. विश्व भारती ही याच भावनेची निदर्शक आहे,” असे ते म्हणाले.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902015)