सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मध्य प्रदेशात खजुराहो इथे महाराजा छत्रसाल सभागृहात सुरू असलेल्या जी 20 सांस्कृतिक कार्य गटाच्या पहिल्या बैठकीचे उद्‌घाटन सत्र आज पार पडले

Posted On: 23 FEB 2023 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023

 

मध्य प्रदेशात खजुराहो इथे महाराजा छत्रसाल सभागृहात जी 20 सांस्कृतिक कार्य गटाच्या पहिल्या बैठकीचे आज उद्घाटन  झाले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार आणि सांस्कृतिक राज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांनी या सत्राला संबोधित केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ वीरेंद्र कुमार म्हणाले, आपल्या समूह आणि देशांमध्ये शाश्वत आणि समावेशक विकासाचा मार्ग तयार करण्यासाठी, परस्पर संबंध विकसित करण्यासाठी संस्कृती हा एक प्रभावी मंच आहे. जी 20 च्या कार्यक्रम पत्रिकेत संस्कृतीचा समावेश करणे ही महत्वाची उपलब्धी आहे आणि आर्थिक विकास, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्कृती हे प्रभावी हत्यार म्हणून वापरता येऊ शकते, असेही ते म्हणाले. विविध संस्कृतींमध्ये सामंजस्य आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी याचा मोठा उपयोग होऊ शकतो, जे आज जगासमोर असलेल्या किचकट आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे.

ते असेही म्हणाले की भारताचा जी 20 संस्कृती मार्ग शाश्वत जीवनशैलीसाठीच्या ‘लाईफसाठी संस्कृती’या संकल्पनेवर आधारित आहे. पर्यावरणस्नेही कृषी पद्धती, जल संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या भारताच्या  समृद्ध संस्कृती वारशात खोलवर रुजलेल्या मूल्यांना प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना आहे.

मीनाक्षी लेखी आपल्या भाषणात म्हणाल्या जी 20 चा सांस्कृतिक कार्य गट दोन देशांदरम्यान पुलाचे काम करतो आणि हा समूह मानवी प्रयत्न आणि मानवतेकडे सांस्कृतिक दृष्टीकोनातून बघतो कारण संस्कृती आपल्या सर्वांना जोडून ठेवते. त्या म्हणाल्या की आजच्या काळात, महिला समानता आणि लैंगिक अधिकारांवर खूप भर दिला जात आहे. पण हडप्पा संस्कृतीतील नर्तकीचा तांब्याचा पुतळा हा लैंगिक समानता म्हणजे काय हे स्पष्टपणे समजावून सांगतो. तो पुतळा हेच सांगतो की हजारो वर्षांपूर्वी देखील आपल्या देशात, महिलांच्या लैंगिक समानतेला केवळ मान्यताच नव्हती तर, शक्तीची देवता म्हणून महिलांचे पूजन देखील केले जात होते,असे  लेखी म्हणाल्या. भारतीय संस्कृतीचे बारकावे समजावून सांगताना त्या म्हणाल्या भारतीय तत्वज्ञान हे नेहमी महिला समानता, सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वतता यांच्या बाजूने उभे राहिले आहे, आज जगापुढे याच समस्या आहेत.

या जी-20 कार्यगटाच्या बैठकीत ही मौल्यवान संपत्ती, हा खजिना मायदेशी परत आणण्यात येत असलेल्या अडथळ्यांवर देखील चर्चा होईल, असेही मीनाक्षी लेखी यांनी सांगितले. हे मानवजातीचे खजिने आहेत आणि ते केवळ आर्थिक दृष्ट्याच महत्वाचे नाही, तर त्या त्या देशाशी जोडल्या गेलेल्या सांस्कृतिक परंपरा आणि तत्वज्ञानाशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. आणि म्हणूनच, जी-20 गटांनी आता केवळ चर्चेच्या फेऱ्यामधून बाहेर पडत देशातून बाहेर नेण्यात आलेल्या ऐतिहासिक वारसा आणि संपत्ती भारतात परत आणण्यासाठी, एक कृती आराखडा तयार करण्याची, हीच योग्य वेळ आहे, असे लेखी यावेळी म्हणाल्या.

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1901708) Visitor Counter : 150