श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिसेंबर 2022 मध्ये कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत 14.93 लाख सदस्यांची भर

Posted On: 20 FEB 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 फेब्रुवारी 2023

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची  (ईपीएफओ)तात्कालिक वेतनपट  आकडेवारी आज प्रसिद्ध झाली. ईपीएफओमध्ये डिसेंबर 2022 मध्ये 14.93 लाख  सदस्य जोडले गेल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे. वार्षिक तत्वानुसार तुलना केली तर डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये  सदस्य संख्येत 32,635 इतकी वाढ झाल्याचे दिसून येते.

डिसेंबर महिन्यात ईपीएफओमध्ये सहभागी झालेल्या  14.93 लाख सदस्यांपैकी सुमारे 8.02 लाख नवीन सदस्य प्रथमच ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आले आहेत. नव्याने सहभागी  झालेल्या सदस्यांमध्ये, 18-21 वर्षे वयोगटातील 2.39 लाख सदस्यांची सर्वाधिक नोंदणी झाली आहे, त्याखालोखाल 22-25 वयोगटातील 2.08 लाख   सदस्यांची नोंदणी झाली आहे. एकूण नवीन सदस्यांपैकी 55.64% सदस्य 18-25 वयोगटातील आहेत. यावरून हे दिसून येते की ईपीएफओमध्ये सहभागी होणारे बहुसंख्य सदस्य प्रथमच रोजगाराच्या कक्षेत आले आहेत आणि देशाच्या संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये समाविष्ट  होत आहेत.

अंदाजे 3.84 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले तर 10.74 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडून  पुन्हा यात सहभागी  झाले असे ही आकडेवारी अधोरेखित करते.  या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि ईपीएफओ अंतर्गत समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा सामील झाले आणि तसेच नोकरी सोडताना सदस्यत्वापोटी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढून घेण्याऐवजी ती हस्तांतरित करण्याचा पर्याय त्यांनी निवडला, यामुळे त्यांची सामाजिक सुरक्षाही अधिक बळकट झाली आहे.

या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केल्यानंतर, त्यात असे आढळून आले की, डिसेंबर  2022 मध्ये नवीन महिला सदस्यांची नोंदणी 2.05 लाख झाली आहे एकूण नवीन सदस्यांमध्ये नवीन महिला सदस्यांची टक्केवारी नोव्हेंबर 2022 मधील  25.14% वरून डिसेंबर महिन्यात 25.57% पर्यंत वाढली आहे. या महिला सदस्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा, 1952 अंतर्गत सामाजिक सुरक्षा कवच प्रथमच  उपलब्ध झाले  आहे.

निव्वळ सदस्य जोडणीच्या बाबतीत महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, हरियाणा ही पाच राज्ये आघाडीवर आहेत. या राज्यांनी या महिन्यात एकत्रितपणे 60.08% निव्वळ सदस्य जोडले. या राज्यांमध्ये, एकूण सदस्यसंख्येच्या 24.82% सदस्य जोडणीसह  महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि त्याखालोखाल 10.08% नोंदणीसह तामिळनाडू आघाडीवर आहे.

उद्योग-निहाय वेतनश्रेणी आकडेवारीचे  वर्गीकरण  सूचित करते की 'तज्ञ सेवा' (मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, सुरक्षा सेवा, इतर उपक्रम इ.) या महिन्यातील एकूण सदस्यांच्या 38.22% इतकी आहे. मागील महिन्यातील उद्योगनिहाय आकडेवारीची तुलना केल्यास, ‘वित्तपुरवठा आस्थापना’, ‘विडी बनवणारे ’, ‘व्यापार-व्यावसायिक आस्थापने’, ‘ट्रॅव्हल एजन्सी’ इत्यादी उद्योगांमध्ये अधिक नावनोंदणी दिसून आली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा, 1952 च्या कक्षेत समाविष्ट असलेल्या देशातील संघटित कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि विमा निधीच्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी ईपीएफओ वचनबद्ध आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900836) Visitor Counter : 218