मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुजरात ते महाराष्ट्र दरम्यान सागर परिक्रमा टप्पा III कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
18 FEB 2023 10:14PM by PIB Mumbai
आपले महान स्वातंत्र्यसैनिक, खलाशी आणि मच्छिमार यांना अभिवादन करून 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किनारपट्टी लगतच्या भागातील सर्व मच्छीमार, मत्स्यपालक आणि संबंधित भागधारकांसोबत एकजुटतेचे दर्शन घडवणारा सागर परिक्रमा हा एक उत्क्रांतीचा प्रवास आहे. हा भारत सरकारचा एक उपक्रम असून त्याचा उद्देश मच्छिमार आणि इतर भागधारकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि भारत सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सारख्या विविध मत्स्यपालन योजना आणि कार्यक्रमांद्वारे त्यांची आर्थिक उन्नती सुलभ करणे हा आहे.
‘सागर परिक्रमा’ च्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात गुजरातच्या सुरत, हझिरा बंदर येथून 19 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसारमाध्यमांशी संवादाने होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरु होईल. 20-21 फेब्रुवारी 2023 या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील सातपाटी, वसई, वर्सोवा, ससून डॉक आणि मुंबईच्या किनारपट्टीलगतच्या इतर भागांना भेट देईल.
ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या 5 जिल्ह्यांचा समावेश असलेला 720 किमीचा समुद्रकिनारा महाराष्ट्र राज्यात आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासामध्ये मच्छीमार बांधव , विक्रेते आणि उद्योग यांचा आर्थिक मूल्याच्या बाबतीत विशेषतः निर्यातीत थेट वाटा आहे.
मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचा मत्स्यव्यवसाय विभाग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ, गुजरात सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र सरकार, भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण , गुजरात मेरीटाईम बोर्ड आणि मच्छिमार प्रतिनिधी या कार्यक्रमात भाग घेतील. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, केंद्रीय (मत्स्यव्यवसाय) सचिव जतींद्र नाथ स्वैन आणि मत्स्यव्यवसाय विभाग, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ, गुजरात सरकार, महाराष्ट्र सरकार, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमादरम्यान, प्रगतीशील मच्छिमार, विशेषतः किनारपट्टीवरील मच्छिमार आणि मत्स्यपालन करणारे शेतकरी , तरुण मत्स्य उद्योजकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, केसीसी आणि राज्य योजनेशी संबंधित प्रमाणपत्रे/मंजुरी प्रदान केली जातील. शेतकऱ्यांपर्यंत योजनांच्या व्यापक प्रचारासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, राज्यांच्या योजना, ई-श्रम, एफआयडीएफ , केसीसी इत्यादींबाबत माहिती प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हिडिओ, डिजिटल मोहिम, जिंगलद्वारे लोकप्रिय केली जाईल. सागर परिक्रमेवर मराठीतील गाणेही प्रकाशित केले जाणार आहे.
सागर परिक्रमेच्या प्रवासात देशाच्या अन्न सुरक्षेसाठी सागरी मत्स्यपालन संसाधनांचा वापर आणि किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायांची उपजीविका यातील शाश्वत संतुलन, सागरी परिसंस्थांचे संरक्षण, मच्छीमार समुदाय आणि त्यांच्या अपेक्षा यांच्यातील तफावत दूर करणे , मासेमारी केली जाणाऱ्या गावांचा विकास, परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून शाश्वत आणि जबाबदार विकास सुनिश्चित करण्यासाठी मासेमारी बंदर आणि लँडिंग केंद्रांसारख्या पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणे आणि निर्मिती यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सागर परिक्रमा कार्यक्रम गुजरात, दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, आणि लक्षद्वीप बेटे या पूर्व-निर्धारित सागरी मार्गाने सर्व किनारी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरा केला जाईल. या दरम्यान मच्छीमार, मच्छीमार समुदाय आणि भागधारकांशी संवाद कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येतील. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान आणि आर्थिक उन्नती सुधारण्यासाठी आणि उपजीविकेच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबला आहे.
भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने 16 आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) बद्दल जागृती करण्यासाठी प्रचार मोहीम आयोजित केली होती. भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक, डॉ. नियती जोशी, निखिल कुमार,आणि सागर कुवेसकर आणि डॉ. संदीप पी. जाधव, महाराष्ट्र शासनाकडून, यांची 16 फेब्रुवारी 2023 रोजी वसई इथल्या शिबिरामध्ये बैठक झाली. मच्छिमार समुदाय आणि मत्स्यशेती करणाऱ्यांना मत्स्यपालन, नोंदणी आणि त्याचे फायदे यासाठी किसान क्रेडिट कार्डची माहिती यावेळी दिली.
देशाला 8118 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे, ज्यामध्ये 9 सागरी राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे आणि किनारपट्टीलगतच्या 2.8 दशलक्ष मच्छिमार बांधवाना उपजीविका पुरवली जाते. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा 8% असून तो जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे.
***
N.Chitale/S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900436)
Visitor Counter : 223