पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्‍ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सवाचे केले उद्‌घाटन


"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्‍ये भारताच्या आदिवासी वारशाचे भव्य चित्र आदि महोत्सवात सादर होत आहे"

‘सबका साथ सबका विकास’हा मंत्र जपत भारत 21 व्या शतकामध्‍ये वाटचाल करत आहे.

"आदिवासी समाजाचे कल्याण हा माझ्यासाठी वैयक्तिक नातेसंबंध आणि भावनांचा विषय आहे"

"आदिवासी परंपरा मी जवळून पाहिल्या आहेत, त्या जगल्या आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे"

"आदिवासी गौरवाबाबत अभूतपूर्व अभिमान बाळगूनच देशाची वाटचाल सुरू आहे"

“देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, आदिवासी मुलांच्या शिक्षणाला माझे प्राधान्य”

“सरकार वंचितांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याने देश नव्या उंचीवर जात आहे”

Posted On: 16 FEB 2023 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील मेजर ध्यानचंद रा‍ष्ट्रीय क्रीडा मैदानावर आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महा- महोत्सवाचे उद्‌घाटन केले. आदि महोत्सव हा राष्ट्रीय मंचावर आदिवासी संस्कृतीचे  दर्शन घडवण्याचा  एक प्रयत्न आहे. या महोत्सवामध्‍ये आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपरिक कला यांचे सादरीकरण केले आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ  लिमिटेड  (टीआरआयएफईडी – ट्रायफेड) चा हा  वार्षिक उपक्रम आहे.

महोत्सवाच्या स्थानी आल्यावर पंतप्रधानांनी भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली वाहिली आणि प्रदर्शनामध्‍ये फेरफटका मारून स्टॉलची पाहणी केली.

यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन  करताना पंतप्रधान म्हणाले कीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान  आदि महोत्सव भारताच्या आदिवासी वारशाचे भव्य चित्र सादर करत आहे. पंतप्रधानांनी भारतातील आदिवासी समाजांच्या प्रतिष्ठित कला चित्ररथांवर प्रकाश टाकला आणि विविध स्वाद, रंग, सजावट, परंपरा, कला आणि अनेक कलाप्रकार , रूचकर पदार्थ आणि संगीत यांना अनुभवण्‍याची एकत्रित संधी देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आदि महोत्सव भारताच्या  खांद्याला खांदा लावून उभे असलेल्या भारतातील विविधतेचे  आणि भव्यतेचे चित्र प्रदर्शित करतो. "आदी महोत्सव हा एका अनंत आकाशासारखा आहे जिथे भारताची विविधता इंद्रधनुष्याच्या रंगांसारखी प्रक्षेपित केली जाते", असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. ज्याप्रमाणे विविध रंगांनी इंद्रधनुष्य बनते, अगदी त्याचप्रमाणे देशाची भव्यता  समोर येते. अशावेळीच  देशाची असीम विविधता 'एक भारत श्रेष्ठ भारत' च्या धाग्यामध्ये जोडली जाते आणि  भारत संपूर्ण जगाला  मार्गदर्शक ठरतो असे  पंतप्रधान म्हणाले.  आदिमहोत्सवामुळे  भारतातील विविधतेतील एकतेला बळ मिळत असूनवारशासह विकासाच्या विचाराला चालना देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

21व्या शतकातील भारत ‘सबका साथ सबका विकास’ असा मंत्र जपत वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जी गोष्‍ट  दुर्गम, अवघड समजली जात होते, तीच गोष्‍ट  आता सरकार स्वबळावर करत आहे आणि दुर्गम, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आदिमहोत्सवासारखे कार्यक्रम ही देशात एक चळवळ बनली असून त्यात मी स्वतः सहभागी होत आहे, असे ते म्हणाले. आदिवासी समाजाचे कल्याण हा माझ्यासाठी वैयक्तिक नातेसंबंधाचा  आणि भावनांचाही विषय आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  आपण ज्यावेळी  सामाजिक कार्याला प्रारंभ केला त्यावेळी  आदिवासी समाजाशी आपला  अतिशय जवळचा संबंध आला होता, याचे स्मरण त्यांनी केले. मी तुमच्या परंपरा खूप जवळून पाहिल्या आहेत, त्या अनुभवल्या आहेत आणि आदिवासी समाजाकडून मी खूप काही शिकलो आहे.’’  असेही प्रंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  उमरगाम ते अंबाजी या आदिवासी पट्ट्यात आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे घालवल्याची आठवण सांगून, पंतप्रधान पुढे म्हणाले,  ‘’ आदिवासींच्या बरोबर घालवलेल्या काळाने मला देश आणि त्याच्या परंपरांबद्दल खूप काही शिकवले आहे.’’

आदिवासींच्या   गौरवाविषयी  देश  अभूतपूर्व अभिमान बाळगूनत्‍याच्‍यासह देश पुढची वाटचाल करत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. परदेशी अतिथी, प्रति‍ष्ठित यांना आपण  दिलेल्या भेटवस्तूंमध्ये आदिवासींच्या  उत्पादनांचा समावेश असतो आणि या उत्पादनांबद्दल  अभिमान वाटतो, त्यांना मानाचे स्थान मिळते, अशी माहिती त्यांनी दिली. जागतिक व्यासपीठावर आदिवासी परंपरा ही भारतीय अभिमान आणि वारशाचा अविभाज्य भाग म्हणून भारताने मांडली आहे. पंतप्रधान म्हणाले की, ‘ग्लोबल वार्मिंग’  आणि हवामान बदल यासारख्या समस्यांवर भारत आदिवासींच्या जीवनशैलीतील उपाय सांगतो. शाश्वत विकासाबाबत भारतातील आदिवासी समुदायाकडून  प्रेरणा घेण्‍यासारखे  आणि त्यांच्याकडून शिकवण्यासारखे बरेच काही आहेयावर पंतप्रधानांनी भर दिला.

आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आदिवासी उत्पादने जास्तीत जास्त बाजारपेठांमध्ये पोहोचली पाहिजेत तसेच त्या उत्पादनांची ओळख आणि मागणी वाढली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. बांबूचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले की, पूर्वीच्या सरकारने बांबूची पैदास आणि वापरावर बंदी घातली होती, परंतु सध्याच्या सरकारने बांबूचा गवताच्या श्रेणीत समावेश केला आणि त्याच्या वापरावरील बंदी रद्द केली. विविध राज्यांमध्ये 3000 हून अधिक वन धन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत असे वन धन अभियानाबाबतचे तपशील विशद करताना पंतप्रधानांनी सांगितले. सुमारे 90 किरकोळ वन उत्पादने किमान आधारभूत किंमतीच्या कक्षेत आणण्यात आली आहेत, जी 2014 मधील संख्येपेक्षा 7 पट अधिक आहे. त्याचप्रमाणे देशातील बचत गटांच्या वाढत्या जाळ्याचा आदिवासी समाजाला फायदा होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशात कार्यरत असलेल्या 80 लाखांहून अधिक बचत गटांमध्ये 1.25 कोटी आदिवासी सदस्य आहेत, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी तरुणांच्या आदिवासी कला आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात पारंपरिक कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या योजनेत पारंपरिक कारागिरांचा कौशल्य विकास आणि त्यांच्या उत्पादनांच्या विपणनासाठी पाठबळ  देण्यासोबतच आर्थिक मदत दिली जाणार आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. .

आदिवासी मुले मग ती देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील असो, त्यांचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य यालाच मी प्राधान्य देतो , असे पंतप्रधान म्हणाले. एकलव्य आदर्श  निवासी शाळांची संख्या 2004-2014 मधील 80 शाळांवरून 2014 ते 2022 पर्यंत 500 शाळांपर्यंत 5 पटीने वाढली आहे. 400 हून अधिक शाळा या आधीच कार्यरत झाल्या असून या शाळांतून सुमारे 1 लाख मुलांना शिक्षण दिले जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या शाळांसाठी  38   हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुपटीने वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधानांनी भाषेच्या अडथळ्यामुळे आदिवासी तरुणांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले. तसेच तरुणांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेता येईल अशा नवीन शैक्षणिक धोरणावर त्यांनी प्रकाश टाकला. आपली आदिवासी मुले आणि तरुण त्यांच्या भाषेत शिकत आहेत आणि प्रगती करत आहेत, हे वास्तवात आले  आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सरकार वंचितांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याने देश नवे विक्रम  स्थापन करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. देश सर्वात मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देतो तेव्हा प्रगतीचा मार्ग आपोआप खुला होतो, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आकांक्षी जिल्हे आणि तालुका  योजनेचे उदाहरण देऊन हे स्पष्ट केले आहे जेथे बहुतेक लक्ष्यित भागात आदिवासी बहुसंख्य आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमातींसाठी देण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 2014 च्या तुलनेत 5 पटीने वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. ज्या तरुणांना एकटेपणा आणि दुर्लक्षामुळे फुटीरतावादाच्या जाळ्यात अडकवले जात होते, ते आता इंटरनेट आणि इन्फ्राद्वारे मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हा विचार प्रवाह देशाच्या दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहे. हा आदि आणि आधुनिकता (आधुनिकता) यांच्या संगमाचा हा नाद असून यावरच नव्या भारताची उत्तुंग इमारत उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या  8-9 वर्षांतील आदिवासी समाजाच्या प्रवासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि देश समता आणि समरसतेला प्राधान्य देत असल्याच्या बदलाचा साक्षीदार असल्याचे सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये देशाचे नेतृत्व एका आदिवासी महिलेच्या हातात आहे, जी राष्ट्रपतींच्या रूपात भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन राष्ट्राभिमान वाढवत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात प्रथमच आदिवासी इतिहासाला अधिकृत मान्यता मिळत आहे, असेही ते म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान अधोरेखित करत, इतिहासातील  बलिदान आणि शौर्याचे गौरवशाली अध्याय अनेक दशके दडवून ठेवण्याचे  प्रयत्न झाले त्याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.  भूतकाळातील हे विस्मृतीत गेलेले अध्याय उलगडण्यासाठी राष्ट्राने अखेर अमृत महोत्सवात पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाने प्रथमच भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.  झारखंडमधील रांची येथे भगवान बिरसा मुंडा यांना समर्पित संग्रहालयाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली त्याचे स्मरण करून विविध राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित संग्रहालये सुरू होत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.  हे पहिल्यांदाच घडत असले तरी, त्याचा प्रभाव येणाऱ्या अनेक पिढ्यांवर दिसेल आणि ते अनेक शतके देशाला प्रेरणा आणि दिशा देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्याला आपल्या भूतकाळाचे रक्षण करावे लागेल, वर्तमानकाळात आपल्या कर्तव्याची जाणीव सर्वोच्च पातळीवर न्यावी लागेल आणि भविष्यासाठी आपली स्वप्ने साकार करावी लागतील, असे पंतप्रधान म्हणाले.  आदि महोत्सवासारखे कार्यक्रम हे संकल्प पुढे नेण्याचे एक सशक्त माध्यम आहे. या मोहिमेची लोकचळवळ व्हावी, असे सांगून विविध राज्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यावर त्यांनी भर दिला.

साजऱ्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला. भरडधान्य शतकानुशतके आदिवासींच्या आहाराचा भाग आहेत.  येथील महोत्सवातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर श्रीअन्नाची चव आणि सुगंधाचा दरवळ उपलब्ध असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  आदिवासी भागातील खाद्यपदार्थांबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याचा फायदा लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी तर होईलच शिवाय आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल असे ते म्हणाले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सिंह सुरुता आणि बिश्वेश्वर तुडू, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  डॉ.भारती प्रवीण पवार आणि ट्रायफेडचे अध्यक्ष रामसिंह राठवा यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशातील आदिवासींच्या कल्याणासाठी पावले उचलण्यात पंतप्रधान आघाडीवर राहिले असून देशाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी त्यांच्या योगदानाचाही ते उचित सन्मान करत आहेत. आदिवासी संस्कृतीचे राष्ट्रीय मंचावर प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये ‘आदि  महोत्सव’ या भव्य राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन केले.

आदिवासी संस्कृती, हस्तकला, पाककृती, वाणिज्य आणि पारंपारिक कलेचा उत्सव साजरा करणारा आदि महोत्सव हा आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेडचा (TRIFED) वार्षिक उपक्रम आहे. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये 16 ते 27 फेब्रुवारी दरम्यान याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी 200 हून अधिक स्टॉल्समध्ये देशभरातील आदिवासी जमातींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा दाखवला जाईल. महोत्सवात सुमारे 1000 आदिवासी कारागीर सहभागी होणार आहेत.  2023 हे  आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याने हस्तकला, हातमाग, मातीची भांडी, दागिने इत्यादी नेहमीच्या आकर्षणांसह महोत्सवात आदिवासींनी पिकवलेल्या श्रीअन्नाचे प्रदर्शन करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

 

S.Kulkarni/Suvarna/Shraddha/Vinayak/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1899840) Visitor Counter : 229