संरक्षण मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते एअरो इंडिया 2023 चे उद्घाटन; विशेष टपाल तिकिटाचे केले प्रकाशन
“बेंगळूरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत आहे. ही नवी उंची म्हणजे नव्या भारताचे वास्तव आहे”
भारतातील उद्योग-स्नेही वातावरण आणि किमतीच्या बाबतीतील स्पर्धात्मकता यामुळे भारत आता खात्रीलायक निर्मिती केंद्र झाले आहे: केंद्रीय संरक्षण मंत्री
Posted On:
13 FEB 2023 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 13 फेब्रुवारी 2023 रोजी, बेंगळूरूमधील येलहांका येथील हवाई दलाच्या तळावर 14 व्या एअरो इंडिया 2023 या आशियातील सर्वात मोठ्या हवाई प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी एका विशेष टपाल तिकिटाचे देखील पंतप्रधानांनी प्रकाशन केले. “अब्जावधी संधींकडे नेणारी धावपट्टी” या संकल्पनेवर आधारित हा पाच दिवसीय कार्यक्रम भारताचा हवाई क्षेत्रातील विकास तसेच संरक्षण क्षमता यांचे दर्शन घडवेल. देशाच्या सुरक्षित तसेच समृद्ध भविष्यासाठी, ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वदेशी बनावटीची सामग्री आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचे सादरीकरण होईल तसेच परदेशी कंपन्यांशी भागीदारी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, पंतप्रधान म्हणाले की बेंगळूरूचे आकाश नव्या भारताच्या क्षमतांची साक्ष देत आहे. “ही नवी उंची म्हणजे नव्या भारताचे वास्तव आहे, आज भारत नवनवी उंची गाठत आहे आणि त्याही पलीकडचा विचार करत आहे,” पंतप्रधान म्हणाले.
जगाच्या राजकीय आणि आर्थिक नकाशावर स्थान मिळविण्याच्या दृष्टीने भारताला मार्गदर्शन करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात, प्रशंसा केली. देशाच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाप्रती पंतप्रधानांच्या अविचल वचनबद्धतेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. एअरो इंडिया म्हणजे त्यांच्या त्याच निर्धाराची अभिव्यक्ती आहे असे ते म्हणाले.
भारतातील उद्योग-स्नेही वातावरण आणि किमतीच्या बाबतीतील स्पर्धात्मकता यामुळे भारत आता संरक्षण सामग्रीचे खात्रीलायक निर्मिती केंद्र झाले आहे असे ठाम प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी केले. “आपल्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे आणि निश्चयामुळे भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे.येत्या 4-5 वर्षांच्या काळात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने अत्यंत योग्य मार्गावरून देशाची वाटचाल सुरु आहे,” त्यांनी सांगितले. भारतीय संरक्षण क्षेत्राच्या विकास गाथेवर देखील केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की भारतीय संरक्षण क्षेत्राने गेल्या काही वर्षांत मोठा पल्ला गाठला असून हे क्षेत्र आता संपूर्ण उत्साह आणि समर्पण भावनेसह देशाला सक्षम करण्याच्या मार्गावर प्रगती करत आहे. एअरो इंडिया हा उपक्रम म्हणजे संरक्षण क्षेत्राला बळकट करणाऱ्या आधारस्तंभांपैकी एक असून या उपक्रमाने भारताला नवी ओळख दिली आहे असे त्यांनी सांगितले.
पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात देश-परदेशांतील 800 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने तसेच तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक व्यक्त केले. या प्रदर्शनात देशी-विदेशी कंपन्यांचा प्रचंड प्रमाणातील सहभाग म्हणजे भारताच्या झपाट्याने पुढे येणाऱ्या व्यापारी क्षमतेवर देशांतर्गत आणि जागतिक व्यापारी समुदायाच्या असलेल्या नव्या विश्वासाची साक्ष आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाचे मोठे केंद्र म्हणून स्थापित होण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासाचा एक भाग होण्याचे आवाहन त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना केले.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898830)
Visitor Counter : 282