संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे - एअरो  इंडिया 2023 या आशियातील सर्वात मोठ्या एअरो शो चे करणार उद्घाटन


पाच दिवसांच्या या कार्यक्रमादरम्यान 809 कंपन्या देशाच्या एअरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांचे दर्शन घडवतील; सामायिक जागतिक समृद्धीसाठी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन भागीदारी  केली जाणार

एअरो  इंडिया 2023 मध्ये नवीन भारताचा विकास आणि उत्पादन कौशल्य दिसणार ; ‘आत्मनिर्भरता’  साध्य करण्यासाठी देशात जागतिक तोडीचा  संरक्षण उद्योग निर्माण करणे हे  उद्दिष्ट आहे: संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह

Posted On: 12 FEB 2023 9:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकमधील बंगळुरू येथे 14 व्या एअरो इंडिया 2023 चे उदघाटन करणार आहेत. हा आशियातील सर्वात मोठा एअरो शो आहे.  "एक अब्ज संधींची धावपट्टी' ही यंदाच्या एअरो इंडिया 2023 ची संकल्पना असून पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात एअरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांमधील भारताची प्रगती  प्रदर्शित करून एक मजबूत आणि स्वयंपूर्ण  अशा नवभारताचा उदय प्रकाशमान होईल. सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्डया संकल्पनेनुसार स्वदेशी उपकरणे/तंत्रज्ञानाचे दर्शन घडवण्यावर आणि परदेशी कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यावर भर राहील.

बंगळुरू येथे 12 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्वावलोकन  पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, एअरो  इंडिया 2023 देशाचे निर्मिती कौशल्य आणि पंतप्रधानांच्या कल्पनेतील  आत्मनिर्भर भारतसाकार करण्याच्या दिशेने झालेली प्रगती यांचे दर्शन घडवेल.  हा कार्यक्रम एअरोस्पेस आणि विमान वाहतूक  क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे ते म्हणाले.

 

आतापर्यंतचा सर्वात मोठा एअरो इंडिया

13 ते 15 फेब्रुवारी हे दिवस व्यावसायिकांसाठी असतील, तर 16 आणि 17 तारखेला जनतेला हा  शो पाहता येईल.

येलाहंका हवाई तळ येथे सुमारे 35,000 चौरस मीटर परिसरात आतापर्यंतचा सर्वात मोठा एअरो  इंडिया शो आयोजित करण्यात आला असून  98 देश यात  सहभागी होण्याची  शक्यता आहे. 32 देशांचे संरक्षण मंत्री, 29 देशांचे हवाई दल प्रमुख आणि मूळ उपकरणांची निर्मिती करणाऱ्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांचे 73 मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससह आठशे नऊ (809) संरक्षण उत्पादन  कंपन्या महत्वपूर्ण  तंत्रज्ञानातील प्रगती आणि एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील वाढ यांचे दर्शन घडवतील.

संरक्षण मंत्र्यांनी हा विक्रमी आंतरराष्ट्रीय सहभाग भारताच्या विविध देशांसोबतच्या ग्राहक -विक्रेता संबंधांचेच नव्हे तर जागतिक समृद्धीच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले.

एअरो  इंडिया 2023 संरक्षण क्षेत्रात तसेच राष्ट्राच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी आत्मनिर्भरताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात एक मजबूत आणि जागतिक दर्जाचा  संरक्षण उद्योग निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना नव्याने चालना देईल यावर  राजनाथ सिंह यांनी भर दिला .  एक मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण क्षेत्र  आगामी काळात भारताला जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयाला येण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. असे ते म्हणाले.

 

संरक्षण मंत्र्यांची परिषद

संरक्षण मंत्री  14 फेब्रुवारी रोजी संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचे यजमानपद भूषवतील.

 

द्विपक्षीय बैठका

एअरो इंडिया 2023 च्या निमित्ताने, संरक्षण  मंत्रीसंरक्षण राज्य मंत्री, संरक्षण दलांचे प्रमुख तसेच संरक्षण सचिव स्तरावर अनेक द्विपक्षीय बैठका आयोजित केल्या जातील. भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी नवीन संधींचा शोध घेऊन मित्र देशांसोबत संरक्षण आणि एअरोस्पेस संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद

संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद 13 फेब्रुवारी रोजी होणार असून  आकाश ही मर्यादा नाही :सीमांच्या  पलीकडे संधी ही  संकल्पना  आहे.

 

बंधन सोहळा

15 फेब्रुवारी रोजी बंधन समारंभात सामंजस्य करार/करारांवर स्वाक्षरी, तंत्रज्ञान हस्तांतरण, उत्पादन प्रारंभ आणि इतर प्रमुख घोषणा केल्या जाणार आहेत. संरक्षण मंत्री या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. 75,000 कोटी रुपयांच्या अपेक्षित गुंतवणुकीसह 251 सामंजस्य करारांवर विविध भारतीय/परदेशी  संरक्षण कंपन्या आणि संघटना यांच्यातील भागीदारी संबंधी करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमातून देश आणि परदेशातील संस्थांसोबत नवीन भागीदारी केली जाईल  आणि एकत्रितपणे वाटचाल करत  सामूहिक विकास साधला जाईल असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी  व्यक्त केला .

 

मंथन

15 फेब्रुवारी रोजी होणारा मंथन हा वार्षिक संरक्षण नवोन्मेष कार्यक्रम हा महत्वाकांक्षी तंत्रज्ञान प्रदर्शन कार्यक्रम असेल.

 

इंडिया पॅव्हेलियन

फिक्स्ड विंग प्लॅटफॉर्मया संकल्पनेवर  आधारित इंडिया पॅव्हेलियनमध्ये भविष्यातील शक्यतांसह या क्षेत्रातील भारताच्या विकासाचे दर्शन घडेल. एकूण 115 कंपन्या 227 उत्पादने प्रदर्शित करतील.

 

परिसंवाद

पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अनेक परिसंवाद आयोजित केले आहेत.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898592) Visitor Counter : 182