गृह मंत्रालय

हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या 74 आरआर आयपीएस तुकडीच्या दीक्षांत समारंभाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी  केले संबोधित


उत्तम कायदा आणि सुव्यवस्था आणि अभेद्य अंतर्गत सुरक्षेशिवाय कोणताही देश महान होऊ शकत नाही

Posted On: 11 FEB 2023 9:42PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज हैदराबाद इथे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या 74  आरआर आयपीएस (RR IPS) तुकडीच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. अमित शाह यांनी हुतात्मा स्मारक इथे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या 36,000 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001O7CW.jpg

ते म्हणाले की, या तुकडीतील बहुतांश प्रशिक्षणार्थींनी तांत्रिक क्षेत्रातील मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आपल्या देशातील सर्व पोलीस संस्थांना तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जागतिक तांत्रिक आव्हानांसाठी सुसंगत आणि सक्षम बनवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पोलीस तंत्रज्ञान मिशनस्थापन केले आहे.

शाह म्हणाले की, यामुळे कॉन्स्टेबल ते पोलीस महासंचालकांपर्यंतची संपूर्ण पोलिस यंत्रणा तांत्रिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम तर बनेलच, पण तंत्रज्ञान कुशल देखील होईल. हे पोलीस तंत्रज्ञान मिशन  आपल्या देशातील सर्व पोलीस संस्थांना तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जागतिक तांत्रिक आव्हानांशी सुसंगत बनवेल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002ZOSJ.jpg

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी एक ध्येय ठेवले आहे. ते म्हणजे, 2047 मध्ये आपण स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करू, तेव्हा आपला देश जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरेल. या ध्येयाची पूर्तता करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्यही आहे. इथे उपस्थित असलेल्या भारतीय पोलीस दलाच्या (आयपीएस) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी आहे, कारण उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, तसेच अभेद्य अंतर्गत सुरक्षेशिवाय कोणताही देश महान होऊ शकत नाही.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003HVJD.jpg

शहा पुढे म्हणाले की, सर्वात दुर्बल नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, त्याच्या/तिच्या प्रति व्यवस्थेची संवेदनशीलता आणि सर्व आव्हानांना तोंड देऊ शकणारी पोलीस यंत्रणा, हे विकसित देशाचा पाया घालण्यासाठी आवश्यक घटक आहेत. ते म्हणाले की 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर बनवण्याचे आणि 2047 पर्यंत भारत हा एक पूर्ण विकसित देश बनण्याचे आपले ध्येय आहे. हे उद्दिष्ट साध्य करणे निश्चितच शक्य आहे, कारण 2014 मध्ये आपण जागतिक आर्थिक क्रमवारीत 11व्या स्थानावर होतो आणि अवघ्या आठ वर्षांच्या कालावधीत आपण पाचव्या स्थानावर पोहोचू शकलो आहोत. मॉर्गन स्टॅन्लेच्या अंदाजानुसार, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, असे ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004JIX4.jpg

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, जेव्हा आपण आठ वर्षांपूर्वीच्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या परिस्थितीचे मूल्यांकन करतो, तेव्हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना, ईशान्येकडील बंडखोरी आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेक प्रवण भागातील वाढता हिंसाचार ही तीन प्रमुख आव्हाने आपल्या समोर होती हे लक्षात येते. आता, 8 वर्षांनंतर या तिन्ही आव्हानांचा सामना करण्यात सरकारला मोठ्या प्रमाणात यश आले आहे असे ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008AE91.jpg

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898398) Visitor Counter : 167