इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी 20 अंतर्गत प्रमुख कार्यक्रम असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डिजिटल कौशल्य विकास परिषदेचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन


डिजिटल कौशल्य विकास, कौशल्य वृद्धी आणि -कौशल्य पुनर्विकास हा, व्यक्तीची क्षमता आणि रोजगार-सक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महत्वाचा असल्याचे अल्केश कुमार शर्मा यांचे प्रतिपादन

Posted On: 11 FEB 2023 6:40PM by PIB Mumbai

 

वेगाने बदलत्या  अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीची क्षमता आणि रोजगार सक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी डिजिटल कौशल्य विकास  (स्किलिंग), कौशल्य वृद्धी (अप-स्किलिंग) आणि कौशल्य पुनर्विकास    (री-स्किलिंग) महत्वाचा असल्याचे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली इथे जी 20 अंतर्गत प्रमुख कार्यक्रम असलेल्या, माहिती, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञान- NICE-DT 2023 आणि डिजिटल कौशल्य विकास यावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT), अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेने या परिषदेचे आयोजन केले आहे.

आपल्या उद्घाटनपर भाषणात अल्केश कुमार शर्मा म्हणाले की, प्रगत होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेला भविष्य काळासाठी तयार मनुष्यबळ आणि डिजिटल सक्षम जनता (नागरिक) दोन्हीची आवश्यकता आहे. क्षमता विकास आणि कौशल्य विकास यामध्ये प्रचंड वाढ नोंदवल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की आपल्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था, ट्रिलियन-डॉलर डिजिटल अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेच्या अनुषंगाने दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत  आहे. देशाच्या शेवटच्या टोकाला जोडणारी  डिजिटल कनेक्टिविटी त्यांनी अधोरेखित केली.

एआय एसएचएस युनेस्कोच्या संचालक डॉ. एम. स्क्विचियारिनी यांनी सांगितले की, डिजिटल युगात जगण्यासाठी, काम करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आपल्याला शिक्षण, उद्योग, कामगार आणि कौशल्ये आणि समावेशन धोरणे यांची माहिती घ्यावी लागेल. सर्वांना डिजिटल कौशल्ये साध्य होण्यासाठी हेच निर्णायक ठरेल. त्या म्हणाल्या की कौशल्यांची मागणी आणि काय आहे, हे समजून घेणे आणि डिजिटल युगात कौशल्यांचा विकास होणे आवश्यक असून, त्यामुळे कौशल्यांचे मुल्यांकन करायला आणि त्यामधील त्रुटी भरून काढायला मदत होईल.

डिजिटल तंत्रज्ञानावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी, नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडेशनचे अध्यक्ष, प्रा. के.के. अग्रवाल, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात, त्यांनी सांगितले की तंत्रज्ञानामध्ये योग्य संतुलन असेल, त्याच्या वापराचा आपल्या जीवनावर आणि समाजावर सकारात्मक परिणाम होतो. ते पुढे म्हणाले की कौशल्य विकासाचा ज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर मेळ घातला, तर ते दर्जेदार शिक्षणासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करते. 

पहिल्या दिवसाच्या उद्घाटन सत्रानंतर तंत्रज्ञान विषयक सत्रे आणि लेखकांच्या शोधनिबंधांचे सादरीकरण झाले. दुसर्‍या दिवशी, कौशल्यांच्या परस्पर पूरकतेसाठी चौकट, सर्वांसाठी डिजिटल कौशल्ये आणि प्रगत आणि उदयोन्मुख कौशल्ये या विषयांवर चर्चा सत्रे झाली. 

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेचे (NIELIT) महासंचालक डॉ. मदन मोहन त्रिपाठी म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य विकास यावरील दोन दिवसीय परिषदेत जगभरातील संशोधकांकडून ज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला. ज्यायोगे, जी20 चे अध्यक्षपद भारताकडे असताना कुशल मनुष्यबळ आणि उद्योगाची मागणी यामधील अंतर भरून निघणार आहे”.   

या परिषदेत 60 लेखकांनी आपले शोध निबंध सादर केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि न्यायवैद्यक विज्ञान, प्रगत संगणन- क्लाउड कॉम्प्युटिंग आणि क्वांटम कॉम्प्युटिंग VLSI आणि सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम, दिव्यांगजनांसाठी (अपंग व्यक्ती) सहाय्यक तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, भविष्य/जैवतंत्रज्ञानासाठी डिजिटल तंत्रज्ञान, जागतिक स्तरावर भविष्यासाठी तयार मनुष्यबळ तयार करण्यासाठी डिजिटल कौशल्य विकासाचे धोरण या आणि अन्य विषयांचा यात समावेश होता.  

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898343) Visitor Counter : 212