नौवहन मंत्रालय
नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग मंत्री जन ख्रिश्चन वेस्ट्रे यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली
द्विपक्षीय चर्चेत हरित बंदरे, हरित नौवहन, हरित जहाज बांधणी आणि नील अर्थव्यवस्था यावर विशेष भर
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2023 9:02AM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरूवारी नवी दिल्ली इथे नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग मंत्री जॉन ख्रिश्चन वेस्ट्रे यांच्या बरोबर बैठक घेतली. मंत्र्यांनी द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
हरित बंदरे आणि जहाज बांधणी, खलाशांचे प्रशिक्षण, भविष्यातील जहाज बांधणी आणि जहाजांच्या शाश्वत पुनर्वापरासाठी हरित अमोनिया आणि हायड्रोजन सारख्या पर्यायी इंधनांचा वापर, या मुद्द्यांचा चर्चेत समावेश होता. भारतामध्ये हरित किनारपट्टी जहाजबांधणी कार्यक्रम उपायांच्या अंमलबजावणीवर देखील चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांनी बंदरे आणि जहाजबांधणी क्षेत्रात शून्य कार्बन उत्सर्जन उपाययोजना लागू करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये, दोन्ही देश द्विपक्षीय आर्थिक आणि तांत्रिक परस्पर पूरकता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत-नॉर्वे द्विपक्षीय संबंध दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय भेटींच्या नियमित देवाणघेवाणीद्वारे मजबूत होत आहेत. दोन्ही देशांच्या नौवहन कार्यकारी गटाची संयुक्त बैठक नोव्हेंबर 2022 मध्ये झाली होती. एमओपीएसडब्ल्यू ने जून 2022 मध्ये नील अर्थव्यवस्थेवरील भारत-नॉर्वे कृती दलाच्या 5 व्या बैठकीतही भाग घेतला होता. भारत ग्रीन व्होएज 2050 चा देखील एक भाग आहे. जहाज बांधणी उद्योगाला भविष्यात कमी कार्बन उत्सर्जन करणारा उद्योग बनवण्याच्या उद्देशाने नॉर्वे सरकार आणि आयएमओ ने मे 2019 मध्ये हा कार्यक्रम सुरु केला होता.

बैठकीदरम्यान सर्बानंद सोनोवाल म्हणाले की नॉर्वेच्या मंत्र्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील जहाज बांधणी आणि बंदरांदरम्यानच्या वाढत्या सागरी सहकार्याला चालना मिळेल. ते म्हणाले, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हरित बंदरे आणि हरित जहाज बांधणीचा दृष्टीकोन साकार व्हावा, यासाठी नॉर्वे कडून, हायड्रोजन इंधनावरील प्रवासी बोटी, ऑटोनॉमस सरफेस वेसल्स, कमी उत्सर्जन करणाऱ्या एलएनजी-हायब्रीड बोटी, शून्य उत्सर्जन सोलर बॅटरी रो-रो प्रवासी बोटी, अंतर्गत आणि किनारपट्टी एलपीजी/एलएनजी बोटी याबाबातचे त्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”.
नॉर्वेच्या शिष्टमंडळात व्यापार आणि उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, नॉर्वेचे भारतातील राजदूत आणि नॉर्वेच्या विविध कंपन्यांचा समावेश होता. भारताकडून राष्ट्रीय जहाजबांधणी मंडळाचे अध्यक्ष, पीएसडब्ल्यू चे अतिरिक्त सचिव आणि पीएसडब्ल्यू मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी केंद्रीय मंत्र्यांबरोबर होते.
***
Gopal C /R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1897877)
आगंतुक पटल : 210