सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी उद्योगाशी संबंधित कामगारांचे वेतन वाढवण्याचा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा निर्णय
Posted On:
09 FEB 2023 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि कापूस-विणकरांचे योगदान लक्षात घेऊन, गुजरातमध्ये कच्छ येथे 30 जानेवारी , 2023 रोजी मनोज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) 694 व्या बैठकीत, विणकरांचे उत्पन्न वाढावे या हेतूने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. विणकरांचे वेतन आता प्रति हँक रुपये 7.50 वरून रुपये 10 इतके होणार आहे. ज्यामुळे, कारागिरांच्या मासिक उत्पन्नात सुमारे 33% आणि विणकरांच्या वेतनात 10% वाढ होईल. हा निर्णय 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.
आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर सतत आवाहन करत आहेत. गरीबात गरीबाच्या हाताला काम मिळावे आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागचा हेतू असून, परिणामी, आपल्या कारागीरांच्या उत्पन्नात वाढ होईल.
यावेळी केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की 2021-2022 या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योगाचे 84,290 कोटी रुपयांचे उत्पादन होते, तर विक्री 1,15,415 कोटी होती. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या नवी दिल्ली मधल्या कनॉट प्लेस (CP) इथल्या विक्री केंद्राने एका दिवसात रु. 1.34 कोटी खादी विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याचे संपूर्ण श्रेय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. खादी उत्पादन आणि विक्रीच्या कामात लाखो कारागीर आणि खादी कामगारांच्या अथक परिश्रमांचे मोल लक्षात घेऊन, देशाच्या जनतेने खादीची उत्पादने खरेदी करावीत असे कळकळीचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
खादी कामगार आणि खादी संघटनांच्या या मागणीचा विचार करून केव्हीआयसी ने आपल्या 694 व्या बैठकीत खादी-ग्रामोद्योग कार्यक्रमाशी संबंधित कामगारांच्या हातात जास्तीत जास्त पैसा देण्याचा, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयामुळे सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत निर्माण व्हायला मदत होईल.
खादीला स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये, आपल्या खादी बद्दलच्या प्रेमाने आणि खादीच्या वापरासाठीच्या आवाहनाने खादीचे पुनरुज्जीवन केले आहे. परिणामी, भारतामधल्या खादीसह अन्य स्वदेशी उत्पादनांची मागणी वाढली आहे. या निर्णयामुळे खादी क्षेत्रात आनंदाची लाट उसळली असून, खादी क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण व्हायला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897655)
Visitor Counter : 215