इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांच्यासमोर डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅनचे प्रात्यक्षिक


व्हॅन लखनौला रवाना, लखनौत 13 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाची पहिली बैठक होणार

Posted On: 03 FEB 2023 3:56PM by PIB Mumbai

 

भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांच्यासमोर काल दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर लगेच, मोबाईल व्हॅन लखनौला रवाना करण्यात आली. लखनौत G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाची (डीईडब्ल्यूजी) पहिली बैठक 13-15 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आहे.  जी 20 डीईडब्ल्यूजी आणि डिजिटल इंडियाच्या प्रमुख उपक्रमांबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी ही डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅन देशातील इतर शहरांमध्ये देखील फेरफटका मारणार आहे.

जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटासाठी डिजिटल इंडिया मोबाइल व्हॅन

डिजिटल इंडियाच्या उल्लेखनीय प्रवासात आपल्या नागरिकांना माहितीयुक्त, सक्षम आणि अद्ययावत ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या अतुलनीय बांधिलकीची ही व्हॅन एक अभिनव निर्मिती आहे.  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना आहे. पंतप्रधान जनधन योजना, डिजीलॉकर, आधार, उमंग, ई-वे बिल, ई-औषधी, आरोग्य सेतू, को-विन, ई-रुपी आणि इंडिया स्टॅक ग्लोबलया डिजिटल इंडियाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांबद्दल ज्ञान आणि अंतर्दृष्टीने ही  व्हॅन परिपूर्ण आहे.

भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी या प्रात्यक्षिकानंतर त्यांच्या निरीक्षणांबद्दल सांगितले, ही फिरती सुविधा भारताने तयार केलेल्या सर्व डिजिटल सार्वजनिक वस्तू आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा समोर आणते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) ते डिजिलॉकर ते को- विन ते फास्टॅग ते दीक्षा ते स्वयम् यासह इतर उपक्रमाची झलक पहायला मिळते. प्रत्येकजण ही उल्लेखनीय व्हॅन पाहू शकेल. या डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा वापर कसा करायचा हे लोक शिकतील. जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि जनआंदोलन निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जी 20 म्हणजे जन भागीदारी, भारतातील नागरिकांना कशा प्रकारे सामावून घ्यावे याविषयी आहे.

भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (मेईटी) सचिव, अल्केश कुमार शर्मा म्हणाले, पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारताने डिजिटल सार्वजनिक वस्तू आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भरीव काम केले आहे आणि हे अतिशय सहज सोप्या पद्धतीने डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅनद्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. ही व्हॅन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने काय प्रगती केली आहे हे मुलांना आणि लोकांना कळेल. तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने कशी झेप घेतली आहे हे जाणून घेता येईल.

देशात डिजिटल सेवांचा वापर करण्यास चालना देण्यासाठी आणि डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, मोबाईल व्हॅन नागरिकांना तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्याची अनोखी संधी देईल. डिजिटल इंडियाच्या प्रतिष्ठित प्रवासाचे भव्य प्रदर्शन 2014 पासूनचे डिजिटल इंडियाचे प्रमुख टप्पे दाखवेल आणि डिजिटल क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा मागोवा घेईल.

मेईटीच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग यांनी उपस्थितांना माहिती दिली डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅनमधील प्रदर्शन जी 20 डीईडब्ल्यूजी आणि डिजिटल इंडिया बद्दल जनतेशी संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. एखाद्या सेवेविषयी माहिती वाचण्याऐवजी, लोक फक्त QR कोड स्कॅन करू शकतात आणि असंख्य डिजिटल इंडिया सेवांचा अनुभव घेऊ शकतात आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकतात.

व्हर्च्युअल रिअॅलिटी सेटअप अभ्यागतांना कार सिम्युलेटरद्वारे गावात आभासी प्रवास करण्याची आणि त्यांच्या प्रवासादरम्यान विविध कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ॲप्लिकेशन्सचा अनुभव घेण्याची उत्तम संधी देईल. डिजिटल इंडियाने ग्रामीण भागातील व्यक्तींचे जीवन कसे बदलले आहे, एकेकाळी त्यांच्या आवाक्यात नसलेले मानले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे उपलब्ध झाले आहे याचा अभ्यागतांना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.

व्हॅनच्या बाहेरील भागात ठेवलेल्या दोन स्क्रीनवर एक संवादात्मक प्रश्नमंजुषा नागरिकांचे मनोरंजन करेल आणि त्यांना शिक्षित करेल, त्यामुळे त्यांना डिजिटल इंडिया आणि जी 20 डीईडब्ल्यूजी विषयी त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेता येईल.

नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक प्रगतीचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल इंडिया मोबाईल व्हॅन नागरिकांना एक अद्वितीय आणि आकर्षक अनुभव देते. ती देशाच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रदर्शन करते. भारतातील नागरिकांना डिजिटल इंडियाचा प्रवास पुन्हा अनुभवण्याची ही एक प्रकारची संधी मेईटी देत आहे.

ही व्हॅन नवी दिल्लीहून लखनौला रवाना करण्यात आली. 3 ते 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ती तिथेच असेल. व्हॅनच्या पहिल्या दौऱ्याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होईल.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896012) Visitor Counter : 268