अर्थ मंत्रालय
दर्जेदार बागायती पिकांसाठी उत्तम दर्जाची रोपे उपलब्ध होण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्चाचा आत्मनिर्भर स्वच्छ रोपे कार्यक्रम सुरु करण्यात येणार
Posted On:
01 FEB 2023 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2023
उच्च मूल्याच्या बागायती पिकांसाठी निरोगी, दर्जेदार रोपे उपलब्ध व्हावीत म्हणून चालना देण्याच्या दृष्टीने 2200 कोटी रुपये खर्चाचा 'आत्मनिर्भर स्वच्छ रोपे' कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केली.
ग्रामीण भागात युवा उद्योजकांना कृषी स्टार्टअप्स उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता 'कृषी गतिवर्धक निधी' स्थापन करण्यात येणार असल्याचे वित्त मंत्र्यांनी अर्थ संकल्पीय भाषणात सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांवर किफायतशीर व कल्पक उपाय प्राप्त व्हावेत, कृषी पद्धतीत बदल घडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, उत्पादकता व फायदा यात वाढ व्हावी, या उद्देशाने हा निधी उभारण्यात येणार असल्याचे वित्त मंत्र्यांनी सांगितले.
भरड धान्यांचा ‘श्री अन्न’ असा उल्लेख त्यांनी केला. ‘भरड धान्य लोकप्रिय करण्यामध्ये भारत आघाडीवर आहे, या धान्यांमुळे पोषण, अन्न सुरक्षा व कृषी कल्याण वाढीला लागते’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्गारांचा उल्लेख वित्त मंत्र्यांनी केला. भारत हा 'श्री अन्ना'चा जगातला सर्वात मोठा उत्पादक देश असून दुसऱ्या क्रमांकाचा मोठा निर्यातदार आहे. ज्वारी,नाचणी, बाजरी, कुटू, राजगिरा, कंगणी, कुटकी, कोद्रा, वरई अशी विविध प्रकारची धान्ये आपल्या देशात पिकवली जातात. आहारात ही धान्ये असल्याने आरोग्याला त्याचा फायदा होतो, असे सांगून शतकानुशतके भारताच्या खाद्य संस्कृतीत यांचा अविभाज्य समावेश असल्याचे वित्तमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
या धान्यांची लागवड करून देशातील नागरिकांचे आरोग्य राखण्यात हातभार लावून छोटे शेतकरी मोठी सेवा करत असल्याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. भारत भरड धान्यांचे जागतिक केंद्र ठरावे, यासाठी हैदराबादमधील भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेला उत्कृष्टता केंद्र म्हणून आवश्यक सहाय्य पुरवले जाईल. याद्वारे उत्तम प्रथा, संशोधन व तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय स्तरावर सामायिक करता येईल, असे त्यांनी अधोरेखित केले.
कृषी क्षेत्रासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची मुक्त स्रोत, मुक्त मानक आणि आंतर परिचालन सार्वजनिक ढाचा म्हणून उभारणी करण्यात येईल, असे सीतारामन यांनी सांगितले. यामुळे पिक नियोजन आणि वृद्धी यासाठी संबंधित माहिती समावेशक व शेतकरी केन्द्री होऊ शकेल. कृषी क्षेत्राशी संबंधित कच्चा माल, कर्ज, विमा, पिक अंदाज, बाजार विषयक माहिती तसेच कृषी- तंत्रज्ञान उद्योग व स्टार्ट अप्स याच्या वाढीला सहाय्यही मिळेल.
पशु पालन, दुग्धविकास आणि मत्स्योद्योग यावर लक्ष केंद्रित करत कृषी कर्ज उद्दिष्टात 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल. मच्छिमार, मच्छी विक्रेते तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या सक्षमीकरणा साठी, मूल्य साखळीची क्षमता सुधारण्यासाठी आणि बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी, पीएम मत्स्य संपदा योजनेची नवी उप योजना आणणार, यासाठी 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक नियोजित आहे.
लांब धाग्याच्या कापसाच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर क्लस्टर आधारित व मूल्य साखळी दृष्टीकोन स्वीकारण्यात येईल. म्हणजेच कच्च्या मालाचा पुरवठा, सेवा विस्तार आणि बाजाराशी संलग्नता यासाठी शेतकरी, राज्ये आणि उद्योग क्षेत्र यांच्यात सहयोग वाढेल असे वित्त मंत्र्यांनी सांगितले.
* * *
Shilpa N/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895448)
Visitor Counter : 284