अर्थ मंत्रालय
प्रतिकूल जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही भारताच्या परराष्ट्र व्यवहार क्षेत्राची परिस्थिती भक्कम
Posted On:
31 JAN 2023 10:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
सक्षम मूलभूत तत्वे आणि सुसज्जतेमुळे भारत जागतिक स्तरावरील प्रतिकूल परिस्थीतीला ठामपणे तोंड देऊ शकला आहे असे मत, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022-23 सादर करताना व्यक्त केले. भरमसाठ वाढलेल्या, तथापि आता आटोक्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठांमधली अस्थिरता, भांडवलाचा तुटवडा, भांडवलाचे अवमूल्यन तसेच जागतिक विकास आणि व्यापारातील मंदी यावरून भारतीय विदेशी अर्थ व्यवहार क्षेत्राला ग्रासलेले दिसून आले आहे.
2021-22 या आर्थिक वर्षातील निर्यातीच्या विक्रमी पातळीच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात (डिसेंबर 2022 पर्यंत) भारताच्या निर्यातीत लवचिकता दिसून आली, असे आर्थिक सर्वेक्षणात ठळकपणे नमूद केले आहे. पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि अलंकार, सेंद्रिय आणि अजैविक रसायने, औषधे आणि फार्मास्युटिकल्स बाबींची प्रामुख्याने निर्यात झाली. मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्था आणि परिणामी मंदावलेला जागतिक व्यापार या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातीतील मंदी अपरिहार्य ठरते. परराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांमधील लवचिकता सुधारण्यात निर्यातीच्या मोलाच्या भूमिकेची दखल घेत, मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोन समोर ठेवून निर्यात संबंधी विविध प्रोत्साहनपर उपाययोजनांचा विचार तसेच त्यानुसार अंमलबजावणी केली जात असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. या उपाययोजनांमुळे आधीपासूनच सकारात्मक असलेल्या भारतीय निर्यातीला पाठबळ मिळेल.
राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत देशांतर्गत वाहतुकीची किंमत कमी करून निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे देशांतर्गत संकट कमी होईल, असे आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे. युएई आणि ऑस्ट्रेलियासोबत अलिकडच्या काळात केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे सवलतीच्या दरात तसेच कररहित निर्यातीसाठी संधी निर्माण करून परराष्ट्रीय आर्थिक व्यवहारा संबंधीच्या संघर्षांची धार बोथट करता येईल, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. अशा प्रकारे कालांतराने ही संपूर्ण यंत्रणाच निर्यातीला अनुकूल पद्धतीने विकसित होऊ शकेल.
कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींबरोबरच वाढत्या आर्थिक घडामोडींमुळे आयातीत वाढ झाल्याचे निरीक्षण, आर्थिक सर्वेक्षणात नोंदवले आहे. सर्वाधिक आयात केलेल्या वस्तूंमध्ये पेट्रोलियम, कच्चे तेल आणि उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा कोक आणि ब्रिकेट, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल वस्तू तसेच सोने या बाबींचा समावेश होता. जागतिक स्तरावर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात घट होत राहिल आणि परिणामी आयातीच्या वाढीला हातभार लागेल, मात्र सोने किंवा तेल वगळता इतर वस्तूंच्या आयातीत लक्षणीय घट होणार नाही, असेही या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात भारताने 422 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याच्या व्यापारी वस्तूंची निर्यात केली आहे, जी आतापर्यंतची सर्वोच्च आहे, असे सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत व्यापारी मालाची निर्यात 305 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती, त्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत व्यापारी मालाची निर्यात 332 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली. औषधे आणि फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सेंद्रिय तसेच अजैविक रसायन क्षेत्रातील निर्यातीत, 2022 या आर्थिक वर्षात लक्षणीय प्रगतीची नोंद झाली. याच वर्षात भारताने जागतिक सेवा क्षेत्रातही आपले वर्चस्व अबाधित राखले. 2022-23 या आर्थिक वर्षात सेवा क्षेत्रातील भारताची निर्यात 254.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ 23.5% इतकी जास्त होती. तसेच एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीत, मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 32.7% वाढ नोंदवली गेली. एप्रिल ते डिसेंबर 2022 या अवधीतील वस्तू आणि सेवांच्या निर्यातीचे एकत्रित मूल्य 568.6 अब्ज अमेरिकन डॉलर अब्ज होती, असा अंदाज आहे, अर्थात त्यात एप्रिल ते डिसेंबर 2021 च्या तुलनेत 16% ची वाढ दिसून आली आहे.
* * *
G.Chippalkatti/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895296)
Visitor Counter : 348