अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

प्राथमिक इक्विटी मार्केटमध्ये एसएमईचे योगदान वाढले

Posted On: 31 JAN 2023 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2023

 

आर्थिक सर्वेक्षण 2022-2023 मध्ये मागील वर्षातील भारतीय भांडवली बाजाराची  उत्तम कामगिरी अधोरेखित करण्यात आली आहे. लघु आणि मध्यम उद्योगांचे ( एसएमई) वाढलेले योगदान आणि देशांतर्गत संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे हे शक्य झाले. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत हे सर्वेक्षण सादर केले. विमा बाजारपेठेचे डिजिटायझेशन आणि विदेशी थेट गुंतवणुकीच्या  मर्यादेतील वाढ भारताच्या विमा क्षेत्राच्या वाढीला चालना देईल असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. भारताच्या निवृत्तीवेतन  क्षेत्रातही  निवृत्तीवेतन संबंधी साक्षरता वाढविण्यासाठी सरकारी उपक्रम राबवले जात आहेत आणि तरुण प्रौढांना निवृत्तीवेतन योजनांमध्ये सहभागी  होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

भांडवली बाजारपेठेतील घडामोडी

सर्वेक्षणात आढळून  आले आहे की जागतिक आर्थिक अनिश्चितता, अभूतपूर्व चलनवाढ, चलनविषयक कठोर धोरण, अस्थिर बाजार असूनही भारताच्या भांडवली बाजारासाठी हे वर्ष चांगले होते. आर्थिक वर्ष 2022 (नोव्हेंबर 2021 पर्यंत) च्या तुलनेत आयपीओसह येणार्‍या एसएमईची संख्या जवळजवळ दुप्पट होती आणि त्यांनी उभा केलेला एकूण निधी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत त्यांनी उभारलेल्या निधीच्या जवळपास तिप्पट होता.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0012NFC.jpg

या वर्षी भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आपण पाहिला  - मे 2022 मध्ये, केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी ) मधील आपली हिस्सेदारी कमी केली आणि शेअर बाजारात  सूचीबद्ध केली, त्यामुळे एलआयसीचा आयपीओ  हा आतापर्यंतचा भारतात सर्वात मोठा आणि 2022 मध्ये  जागतिक स्तरावरचा  सहावा सर्वात मोठा आयपीओ ठरला. 

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक

भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वांमुळे आणि वेळोवेळी बाजारातील जोखीम सुधारल्यामुळे, भारत हे एक आकर्षक गुंतवणूक स्थान राहिले आहे, असे आर्थिक सर्वेक्षण 2022-2023 मध्ये अधोरेखित केले आहे. जागतिक घटकांद्वारे गुंतवणूक काढून घेत जात असूनही  ताब्यात असलेल्या मालमत्तेमध्ये (जी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकीचे  कस्टोडिअल होल्डिंग्ज एकूण बाजार मूल्य प्रतिबिंबित करते) वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकीच्या ताब्यात असलेल्या एकूण मालमत्तेत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केलेल्या एकूण निव्वळ गुंतवणुकीपैकी  डिसेंबर 2022 च्या अखेरीस 16,153 कोटी रुपये काढून घेतले गेले. आर्थिक वर्ष 2022 मध्ये डिसेंबर 2021 अखेर 5,578 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती.

विमा क्षेत्र

आर्थिक सर्वेक्षण 2022-2023 मध्ये नमूद  केले आहे की, भारत येत्या दशकात सर्वात वेगाने वाढणारी विमा बाजारपेठ म्हणून उदयाला येण्यासाठी सज्ज आहे. 2021 मध्ये भारतातील आयुर्विमा व्याप्ती  3.2 टक्के होती, जी उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा जवळजवळ दुप्पट आणि जागतिक सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे. आयुर्विमा प्रीमियमने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 10.2 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली, ज्यामध्ये नवीन व्यवसायांचा वाटा आयुर्विमाला  मिळालेल्या एकूण प्रीमियमच्या 45.5 टक्के आहे.

आर्थिक वर्ष 2022  मध्ये, बिगर-आयुर्विमा कंपन्यांच्या एकूण थेट प्रीमियमने (भारतात आणि भारताबाहेर) वार्षिक 10.8 टक्के वाढ नोंदवली, जी प्रामुख्याने आरोग्य आणि मोटर विभागांमुळे आहे. आर्थिक वर्ष 2022  मध्ये  बिगर-आयुर्विमाचे  निव्वळ दावे 1.4 लाख कोटी रुपये होते, याला  प्रामुख्याने वाढणारे दरडोई उत्पन्न, उत्पादन विषयक अभिनव कल्पना आणि सानुकूलीकरण, मजबूत वितरण वाहिन्यांचा विकास आणि वाढती आर्थिक साक्षरता कारणीभूत ठरली.

आर्थिक वर्ष 2021 मध्ये,  355.3 कोटी रुपये नवीन व्यवसाय प्रीमियमसह (आयुर्विमा  विभागात)  10.7 लाख नवीन सूक्ष्म-विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या तर सामान्य विमा विभागामध्ये (स्वतंत्र आरोग्य विमाधारक वगळून ) 53,046 नवीन सूक्ष्म-विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या. प्रधानमंत्री फसल विमा योजना सारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी  योजनांमुळे पीक विम्याच्या प्रीमियम उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे, तर आयुष्मान भारत (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) (AB PM-JAY) ने देखील आपल्या क्षेत्रात विम्याचा अवलंब आणि प्रसार  वाढवला आहे.

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895257) Visitor Counter : 89