आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृष्य माध्यमातून केले संबोधित


"सरकार आणि समाजाच्या संपूर्ण पाठिंब्याने, सोबतीने आणि सहकार्याने, एसडीजीच्या तीन वर्षे अगोदर 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारताचे लक्ष्य आपण साध्य करू शकतो"

लवकर निदान करणे, अपंगत्व आणि व्यंग रोखण्यासाठी मोफत उपचार तसेच सध्या कुष्ठरोगामुळे व्यंग असलेल्यांचे वैद्यकीय पुनर्वसन यावर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो: डॉ भारती प्रवीण पवार

कुष्ठरोगाबद्दलच्या लोकापवादासंदर्भात जागरूकता वाढवण्याची गरज: डॉ भारती प्रवीण पवार

Posted On: 30 JAN 2023 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2023

 

“नव्या  कुष्ठरुग्णांच्या संख्येत दरवर्षी घट होत असून भारत प्रगतीपथावर आहे. सरकार आणि समाजाच्या संपूर्ण पाठिंब्याने, सोबतीने आणि सहकार्याने, एसडीजीच्या म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्टांच्या तीन वर्षे अगोदर, 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारताचे लक्ष्य आपण साध्य करू शकतो” असे  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज संबोधित करत होते. “चला कुष्ठरोगाशी लढूया आणि कुष्ठरोग इतिहासजमा करुया” ही यावर्षीची संकल्पना होती.

राष्ट्रीय स्तरावर प्रति 10,000 लोकसंख्येमागे एक रुग्ण दर गाठण्यात आपण 2005 मध्ये यशस्वी झालो आहोत. कुष्ठरोगाच्या उच्चाटनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नाची गरज आहे. हा बरा होण्याजोगा रोग आहे. मात्र, सुरवातीच्या  अवस्थेतच याचे निदान झाले नाही आणि उपचार झाले नाहीत, तर तो बाधित व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आणि व्यंग निर्माण करू शकतो. दुर्दैवाने अशा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो. 

“लवकर निदान करणे, अपंगत्व आणि व्यंग रोखण्यासाठी मोफत उपचार तसेच सध्या कुष्ठरोगामुळे व्यंग असलेल्यांचे वैद्यकीय पुनर्वसन यावर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. व्यंग दूर करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी कल्याण भत्ता 8,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्यात आला आहे,” अशी माहिती  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत दिली.

कुष्ठरुग्ण दर 2014-15 मध्ये 0.69 प्रति 10,000 लोकसंख्येवरून 2021-22 मध्ये 0.45 वर आला आहे.  दरम्यान, प्रति 100,000 लोकसंख्येचा वार्षिक नवीन रुग्ण निदान दर 2014-15 मधील 9.73 वरून 2021-22 मध्ये 5.52 वर आला आहे, असे त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकताना सांगितले.

“जनजागृती आणि रोगाशी संबंधित दुर्भावना कमी करण्यावर देखील हा  कार्यक्रम काम करतो. कुष्ठरोग संशयितांसाठी आशा-आधारित देखरेख  (एबीएसयुएलएस) ठेवली जाते.   तळागाळात काम करणारे कर्मचारी सातत्याने अशा संशयितांची तपासणी आणि अहवालाच्या कामी सक्रीय असतात. लक्ष्यित कुष्ठरोग मोहीमे (एफएलसी) अंतर्गत ज्या भागात जाणे कठीण असते किंवा बालक आणि अपंग रुग्ण आहेत अशा भागांवर विशेष भर देण्यात आला आहे. एनएलईपी अंतर्गत 2015 पासून, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, बऱ्याच प्रकरणांमध्ये  कुष्ठरोगामुळे येणारे  अपंगत्व टाळणे आपल्याला शक्य झाले आहे,”, असे त्या म्हणाल्या. कुष्ठरोगाशी संबंधित मानसिक दुर्भावने संदर्भात जनजागृती करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

निकुष्ठ 2.0 पोर्टलचे यावेळी अनावरण करण्यात आले. यासोबतच, कुष्ठरोगासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना आणि पथदर्शी आराखडा (2023-27) तसेच कुष्ठरोगावरील  औषधांना न जुमानणाऱ्या विषाणू  (एएमआर) देखरेखीसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली.  

कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेला पुढे नेण्यात, संक्रमण थांबवणे, रुग्ण निदानाला गती देणे आणि मजबूत देखरेख पायाभूत सुविधा राखण्यासाठी ही धोरणात्मक योजना आणि पथदर्शी आराखडा मदत करेल. भारत कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने प्रगती करत असताना, मजबूत एएमआर देखरेख प्रणाली सज्ज ठेवण्याची गरज आहे.  ही मार्गदर्शक तत्त्वे कुष्ठरुग्णांमध्ये एएमआर देखरेख ठेवण्यासाठी एक मजबूत प्रणाली विकसित करणे आणि टिकवून ठेवणे यासाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करतील. निकुष्ठ 2.0 हे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा (एनएलईपी) अंतर्गत कुष्ठरोग व्यवस्थापनासाठीचे एकात्मिक पोर्टल आहे. केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावर माहिती/आकडेवारीची कार्यक्षम नोंदणी, विश्लेषण आणि निर्देशकांच्या स्वरूपात माहिती अहवाल आणि त्याचे रिअल टाइम डॅशबोर्डमध्ये प्रसारण करण्यात हे मदत करेल.

देशव्यापी जनजागृती मोहिमे अंतर्गत कुष्ठरोगाशी निगडित मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी डॉ भारती प्रवीण पवार यांनी एक  चित्रफीतही जारी केली.

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1894763) Visitor Counter : 249