माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात आयोजित मास्टरक्लासमध्ये 'भारतीय ॲनिमेशनचा इतिहास आणि भविष्य' या विषयावर सादरीकरण


भारतीय ॲनिमेशन उद्योगात सृजनशील नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता आहे: किरीट खुराना

Posted On: 30 JAN 2023 6:12PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जानेवारी 2023

 

मुंबईतील शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या दिवशी, भारतीय ॲनिमेशन: इतिहास आणि भविष्य या विषयावरच्या  मास्टरक्लासचे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते किरीट खुराना यांनी संचालन केले. किरीट खुराणा यांनी भारतात ॲनिमेशन चित्रपट निर्मितीच्या विकासाचे वर्णन करत प्रेक्षकांना सफर घडवली. किरीट यांनी भारतातील ॲनिमेशन उद्योगाच्या स्थापनेत क्लेअर वीक्स यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका तसेच त्यांचे शिष्य राम मोहन हे भारतीय ॲनिमेशन उद्योगाचे जनक कसे झाले, यावर प्रकाश टाकला.

1955 मध्ये मुंबईतील फिल्म विभाग संकुलात सरकारने कार्टून फिल्म केंद्राची स्थापना करून भारतीय ॲनिमेशनचा श्रीगणेशा केला. त्यानंतरच्या दशकांमध्ये राम मोहन यांनी बन्यान डीअर या पहिल्या ॲनिमेशन टेलिफिल्म सह विविध पुरस्कार विजेत्या ॲनिमेशन चित्रपटांची निर्मिती केली. भीम सेन आणि व्ही जी सामंत हे त्याच काळातील दुसरे प्रमुख चित्रपट निर्माते होते.

1992 मध्ये 'मीना' आणि पोपट 'मिठू' या कार्टून पात्राच्या निर्मितीद्वारे भारतीय ॲनिमेशन उद्योगाने मोठी झेप घेतली. युनेस्कोच्या सहकार्याने स्त्री भ्रूणहत्येबद्दल जनसामान्यांना जागृत करण्यासाठी या पात्रांची निर्मिती करण्यात आली होती. नंतर, मीनाच्या पात्राने आफ्रिकन संदर्भात साना नावाच्या दुसर्‍या पात्राच्या निर्मितीला प्रेरणा दिली. त्या काळातील आणखी एक महत्त्वाचा ॲनिमेशन चित्रपट ‘रामायण’ याची जपानच्या मदतीने सहनिर्मिती करण्यात आली. या दोन्ही चित्रपटांमध्ये राम मोहन यांनी मोठे योगदान दिले आहे. अर्जुन; गुपी गवैया आणि  बागा बजय्या सारख्या चित्रपटांनी त्यानंतरच्या दशकांमध्ये ॲनिमेशन उद्योग निरंतर विकसित होत राहिल्याचे दाखवून दिले.

आधुनिक काळात व्हीएफएक्स हा ॲनिमेशन उद्योगाचा नवा अवतार कसा बनला आहे हे किरीट खुराणा यांनी स्पष्ट केले. त्यांनी उपमन्यू भट्टाचार्य सारख्या भारतीय चित्रपट निर्मात्यांची उदाहरणे दिली, जे त्याच धर्तीवर ‘वाडा’ सारखे चित्रपट बनवत आहेत. गेमिंग आणि कॉमिक्स उद्योगांमध्ये देखील ॲनिमेशन उद्योगाचे आकर्षक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नसते, असे खुराणा यांनी ॲनिमेशन उद्योगासमोरच्या आव्हानांबाबत बोलताना सांगितले. लाइव्ह ॲक्शन चित्रपटांच्या तुलनेत ॲनिमेशन चित्रपट निर्मात्यांच्या योगदानाला फारशी प्रसिद्धी दिली जात नाही, असे ते म्हणाले. भारतात ॲनिमेशन उद्योग केवळ दुय्यम उद्योग म्हणून करत असून देशात ॲनिमेशन उद्योगाच्या वाढीसाठी फ्रान्समध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ॲनेसी या ॲनिमेशन महोत्सवाप्रमाणेच भारतातही महोत्सव आयोजित करावा असे खुराणा यांनी सुचवले. जगात प्रसिद्ध असलेल्या जपानच्या ॲनिमेशन उद्योगाचा मार्ग अवलंबण्याची भारताने आकांक्षा बाळगली पाहिजे, असेही ते म्हणाले. भारतीय ॲनिमेशन उद्योगामध्ये  सध्याच्या 1.3 अब्ज डॉलर्सवरून 2030 पर्यंत 40 अब्ज डॉलर्सपर्यंत वृद्धीची आणि 20 लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1894752) Visitor Counter : 191