गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे कर्नाटकातील हुबळी येथील बी. व्ही. भूमारेड्डी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मार्गदर्शन
युवा वर्गाने पारंपरिक विचारसरणी आणि चौकटीमधून बाहेर पडले पाहिजे आणि नवे विचार आणि धाडसाने पुढे गेले पाहिजे, धाडस असलेल्यांवरच नशीबाची कृपा होते
एका वर्षात पेटंटसाठी येणाऱ्या लाखो अर्जांवरून भारत संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात किती वेगाने पुढे जात आहे ते दिसत आहे
Posted On:
28 JAN 2023 10:04PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकातील हुबळी येथील बी. व्ही. भूमारेड्डी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या 75 वर्षांच्या वाटचालीत भारताने निर्विवादपणे आपले स्थान बळकट केले आहे आणि संपूर्ण जगाला आपल्या क्षमतेचे दर्शन घडवले आहे, असे अमित शाह म्हणाले. मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाचे उत्पादन केंद्र बनवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि याचाच परिणाम म्हणून आज भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत 11 व्या स्थानावरून 5व्या स्थानावर पोहोचला आहे आणि 2027 पर्यंत तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. पेटंटसाठी होणाऱ्या नोंदणीवरून एखाद्या देशाचे भवितव्य दिसून येते. 2013-14 या वर्षात पेटंटसाठी 3000 अर्ज येत असत, ज्यांची संख्या 2021-22 मध्ये 1.5 लाखांवर पोहोचली आहे, यातून आपला युवा वर्ग संशोधनाच्या क्षेत्रात कुठे पोहोचला आहे ते दिसून येते, असे ते म्हणाले. 2013-14 मध्ये 3000 पेटंटपैकी 211 पेटंट्सची नोंदणी झाली. ही संख्या 2021-22 मध्ये 24,000च्या वर गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा वर्गासाठी प्रत्येक क्षेत्रात अमाप संधी खुल्या केल्या आहेत, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी नमूद केले. आज देशातील आयआयटींची संख्या 16 वरून 23वर पोहोचली आहे, आयआयएम ची संख्या 13 वरून 20 वर पोहोचली आहे, आयआयआयटीज 9 वरून 25 वर पोहोचल्या आहेत, एम्सची संख्या 7 वरून 22वर पोहोचली आहे, वैद्यकीय महाविद्यालये 387 वरून 596 वर पोहोचली आहेत आणि विद्यापीठांची संख्या 723 वरून 1043 इतकी झाली आहे. यावरून हे दिसते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शिक्षणाचा पाया आणि वाव यामध्ये वाढ केली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविद्यालयांची संख्या 36,000 वरून 48,000 वर नेली आहे.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की 2022 मध्ये भारताने 400 अब्ज डॉलर्सची विक्रमी निर्यात केली. पंतप्रधानांनी देशात अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. यापूर्वी स्टार्टअप्सच्या क्षेत्रात कोणताही पुढाकार घेण्यात आला नव्हता. 2014 मध्ये देशात केवळ तीनच युनिकॉर्न स्टार्ट अप्स होते. आज देशात 70,000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स तयार झाले आहेत. ज्यामध्ये 75 पेक्षा जास्त युनिकॉर्न स्टार्ट अप्स आहेत आणि 30% पेक्षा जास्त स्टार्ट अप्स महिला विद्यार्थ्यांनी सुरू केले आहेत. 45% स्टार्ट अप्स द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आहेत ज्यामधून देशाच्या युवा वर्गात उत्साह आणि क्षमता ओसंडून वाहत असल्याचे आणि ते कोणत्याही भागात असले तरी त्यांना यशापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे दिसून येत आहे.

देशासाठी मरण्याचे भाग्य प्रत्येकालाच लाभत नाही मात्र देशासाठी जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात आपण सर्वांनी ही प्रतिज्ञा केली पाहिजे की आपण आयुष्यात कितीही यशस्वी का होईना, आपल्या सर्वांचे उद्दिष्ट एकच म्हणजे आपल्याला एका महान भारताची निर्मिती करायची आणि त्याला जगात अव्वल स्थानावर न्यायचे आहे हे असले पाहिजे, असे अमित शाह यांनी सांगितले.

***
S.Kakade/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1894393)