माहिती आणि प्रसारण मंत्रालय
"शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सुरुवात, प्रियदर्शनच्या ‘अप्पाथा’ चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने होणार"
“तब्बल 28 वर्षांनंतर प्रियदर्शन आणि अभिनेत्री उर्वशी यांनी चित्रपटात एकत्र काम केलं”
एससीओ चित्रपट महोत्सव पुढील पाच दिवस विविध चैतन्यमय संस्कृती, निखळ कलात्मक सौन्दर्य आणि खिळवून ठेवणाऱ्या दर्जेदार सिनेमॅटिक अनुभवांचा मिलाफ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार : केन्द्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
Posted On:
26 JAN 2023 4:45PM by PIB Mumbai
मुंबई, 26 जानेवारी 2023
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सुरुवात उद्या तामिळ चित्रपट "अप्पाथा" च्या जागतिक प्रीमियरने होणार आहे. पद्म पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर जिओ स्टुडिओ आणि वाइड अँगल क्रिएशन्स हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उर्वशी मुख्य भूमिकेत आहेत. त्यांचा हा 700 वा चित्रपट असून त्या भारतीय चित्रपट उद्योगातील कारकिर्दीचे 51 वे वर्ष साजरे करत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन, 1993 मध्ये आलेल्या मिधुनम चित्रपटानंतर तब्बल 28 वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री उर्वशी यांच्यासोबत या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र काम केले आहे.
भारत, 2022-23 या काळाकरता एससीओचे अध्यक्षपद भूषवत आहे, यावेळी, एससीओ चित्रपट महोत्सवाचे यजमान म्हणून आयोजन करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे असे केन्द्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. अप्पथाने, या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य देश असलेल्या प्रदेशातील चित्रपटांची विविधता आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैलींचे प्रदर्शन करणे हे, महोत्सव आयोजित करण्यामागचे भारताचे उद्दीष्ट आहे. चित्रपटसृष्टीत भागीदारी निर्माण करणे, कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे, चित्रपट निर्मिती क्षेत्रातील तरुण प्रतिभेस पाठबळ देणे, त्यांना घडवणे आणि या अनोख्या प्रदेशातल्या संस्कृतींमधील पूल म्हणून काम करणे हे आमचे ध्येय आहे असे ठाकूर म्हणाले. प्रियदर्शन यांच्या अप्पाथा या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरसह महोत्सवाची सुरुवात करताना आम्हाला आनंद होत आहे. ही प्रेमाची आणि पाळीव प्राण्यांशी असलेल्या आपल्या बंधाची हृदयस्पर्शी कथा आहे.
एससीओ चित्रपट महोत्सव 27 जानेवारीपासून सुरु होत असून पुढील पाच दिवस विविध चैतन्यमय संस्कृती, निखळ कलात्मक सौंदर्य आणि खिळवून ठेवणाऱ्या दर्जेदार चित्रपटांचा अनुभव मिलाफ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ आपल्या अप्पाथा या चित्रपटानं होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले, “ या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात अप्पाथा या चित्रपटानं होणं ,हा आमचा सन्मान आहे. ही साधी आणि सुंदर कथा दिग्दर्शनासाठी माझ्याकडे सोपवल्याबद्दल, मी माझे निर्माते जिओ स्टुडिओज आणि वाईड अँगल क्रिएशन्स यांचे आभार मानतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन करतानाचा अनुभव खूप आनंददायी होता. आपल्या कारकिर्दीतील मोठा टप्पा गाठत 700 व्या चित्रपटात अभिनय करणाऱ्या उर्वशी सारख्या जबरदस्त प्रतिभावान अभिनेत्री सोबत काम करताना खूप छान वाटलं. या आधी केलेल्या कुठल्याही चित्रपटांपेक्षा ‘अप्पाथा’ वेगळा आहे आणि याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो याची मला उत्सुकता आहे.”
या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचे शो, मुंबईत दोन ठिकाणी होतील. पेडर रोड येथील फिल्म्स डिव्हिजन संकुलातील चार प्रेक्षागारं आणि वरळीच्या नेहरू तारांगण इमारतीमधील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC(National films development corporation) चं एक प्रेक्षागृह, अशी ही दोन ठिकाणं आहेत. या महोत्सवात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील एकूण 57 चित्रपट प्रदर्शित केले जातील. स्पर्धा विभागात, 14 चित्रपटांमध्ये स्पर्धा असून, स्पर्धेतर विभागात 43 चित्रपटांचा समावेश आहे. परीक्षक आणि स्थानिक प्रेक्षकांना समजावेत म्हणून चित्रपट इंग्रजीमध्ये डब केले आहेत किंवा सबटायटल्स(उपशीर्षकं)ची योजना करण्यात आली आहे.
प्रतिनिधी नोंदणी sco.nfdcindia.com या संकेतस्थळावर ऑनलाइन किंवा महोत्सवात प्रत्यक्ष करता येईल. संपूर्ण महोत्सवाच्या नोंदणीसाठी 300 भारतीय रुपये अधिक वस्तू सेवा कर (GST), तर प्रतिदिन नोंदणीसाठी 100 भारतीय रुपये एवढं मूल्य आहे. वैध ओळखपत्रधारक विद्यार्थ्यांसाठी नोंदणी विनामूल्य आहे.
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाबद्दल
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव, 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत होणार आहे. या संघटनेतील सदस्य राष्ट्रांच्या संयुक्त परिषदेच्या सहकार्यानं, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC अर्थात नॅशनल फिल्म्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमानं, हा चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. SCO चं भारताकडे असलेलं अध्यक्षपद सूचित करण्यासाठी, मुंबईत, या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Source : NFDC
R.Aghor/Vinayak/Ashutosh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1893928)
Visitor Counter : 246