पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांशी साधला संवाद


"जय हिंद चा मंत्र सर्वांना प्रेरणा देतो": पंतप्रधान

“तरुणांशी संवाद साधणे हे माझ्यासाठी नेहमीच खास असते”,पंतप्रधानांनी व्यक्त केले मनोगत

"एनसीसी आणि एनएसएस युवा पिढीला राष्ट्रीय ध्येय आणि देशापुढील समस्यांशी जोडतात" पंतप्रधानांचे प्रतिपादन

"विकसित भारता'चे तुम्ही सर्वात मोठे लाभार्थी होणार आहात आणि तो निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमची आहे", पंतप्रधानांचे युवा पिढीला आवाहन

“जग भारताच्या यशामध्ये स्वतःसाठी नवे भविष्य पाहत आहे”,पंतप्रधानांचा विश्वास

“तुमची ध्येये जेव्हा देशाच्या उद्दिष्टांशी जोडली जातात, तेव्हा तुमच्या यशाची व्याप्ती वाढते. जग तुमच्या यशाकडे भारताचे यश म्हणून पाहील”,पंतप्रधानांचे प्रतिपादन

"भारतातील तरुणांना कधी न पाहिलेल्या शक्यतांचा वापर करावा लागेल, अकल्पित उपायांचा शोध घ्यावा लागेल", पंतप्रधान

“तुम्ही तरुण आहात, तुमचे भविष्य घडवण्याची हीच वेळ आहे. तुम्ही नवीन विचार आणि नवीन मानकांचे निर्माते आहात. तुम्ही नवीन भारताचे मार्गदर्शक आहात”,पंतप्रधानांचा विश्वास

Posted On: 25 JAN 2023 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कॅडेट कोअरचे (NCC)कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)स्वयंसेवकांना संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत असंख्य मुले पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. जय हिंदचा मंत्र सर्वांना प्रेरणा देतो, पंतप्रधान म्हणाले.

गेल्या आठवड्यात देशातील तरुणांशी झालेल्या संवादाचे स्मरण करून, पंतप्रधान म्हणाले कीएका महिन्यापूर्वी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला, ज्या वेळी देशभरात वीर ‘साहेबजादें’च्या शौर्याचा आणि धैर्याचा गौरव करण्यात आला होता. कर्नाटकातील राष्ट्रीय युवा महोत्सव, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीशी, उत्तर प्रदेश इथल्या खेल महाकुंभ मधील युवा क्रीडापटू, संसदेत आणि त्यांच्या निवासस्थानी आणि  बाल पुरस्कार विजेत्या बालकांबरोबर झालेला संवाद याचाही त्यांनी उल्लेख केला. 27 जानेवारी रोजी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात मुलांशी होणारा संवाद याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

तरुणांबरोबरच हा संवाद महत्त्वाचा का आहे, याची दोन कारणे पंतप्रधानांनी सांगितली. पहिले, तरुणाईची ऊर्जा, ताजेपणा, नाविन्य आणि उत्कटता, यामुळे मिळणारी सकारात्मकता त्यांना रात्रंदिवस कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देत राहते. दुसरे, पंतप्रधान म्हणाले, तुम्ही सर्वजण या ‘अमृत काळात’ स्वप्नांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहात, आणि ‘विकसित भारताचे’ तुम्ही सर्वात मोठे लाभार्थी असाल, आणि तो निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमची आहे.

सार्वजनिक जीवनाच्या विविध आयामांमध्ये तरुणांची वाढती भूमिका पाहणे उत्साहवर्धक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पराक्रम दिवस आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये तरुणांच्या मोठ्या स्मरण करून ते म्हणाले की तरुणांच्या स्वप्नांचे आणि देशाप्रति त्यांच्या समर्पणाचे हे प्रतिबिंब आहे.

पंतप्रधानांनी कोरोना महामारीच्या काळातील एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांच्या योगदानाची नोंद घेतली आणि अशा संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांवर  प्रकाश टाकला. देशाच्या सीमावर्ती आणि किनारपट्टीच्या प्रदेशांसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी तरुणांना सज्ज करण्याच्या सरकारच्या तयारीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी माहिती दिली की, देशभरातील डझनभर जिल्ह्यांमध्ये विशेष कार्यक्रम राबविले जात आहेत जेथे लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या मदतीने तरुणांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी नमूद केले की हा सराव तरुणांना भविष्यासाठी तयार तर करेलच, पण गरजेच्या वेळी प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून काम करण्याची त्यांची क्षमताही वाढवेल. पंतप्रधानांनी सीमा भागात राबवल्या जात असलेल्या ‘ऊर्जामय सीमा’ कार्यक्रमावर प्रकाश टाकला, ज्यामध्ये देशाच्या सीमा भागातील गावांचा विकास केला जात आहे. "सीमावर्ती भागातील तरुणांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून या ठिकाणी शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील आणि कुटुंबे गावांमध्ये परत येऊ शकतील", पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी कॅडेट्सना सांगितले की, त्यांच्या सर्व यशामध्ये त्यांच्या पालकांचे आणि कुटुंबांचे योगदान आहे आणि त्यासाठी ‘सबका साथ’ सबका विश्वास, सबका प्रयास’ गरजेचा आहे. जेव्हा तुमची ध्येये देशाच्या उद्दिष्टांशी जोडली जातात तेव्हा तुमच्या यशाची व्याप्ती वाढते. हे जग तुमच्या यशाकडे भारताचे यश म्हणून पाहील, असे पंतप्रधान म्हणाले. डॉ एपीजे अब्दुल कलाम, होमी जहांगीर भाभा आणि डॉ. सी.व्ही रमण यांसारखे शास्त्रज्ञ आणि मेजर ध्यानचंद आणि इतर क्रीडा व्यक्तिमत्त्वांचे दाखले देऊन पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जग या व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातल्या टप्प्यांकडे आणि यशाकडे भारताचे यश म्हणून पाहते. ते म्हणाले की, जगाला भारताच्या यशस्वितेमध्ये स्वतःसाठी नवीन भविष्य दिसते आहे. सबका प्रयास या भावनेची ताकद लक्षात घेता पंतप्रधान म्हणाले की, ऐतिहासिक यशस्विता ती असते जी संपूर्ण मानवतेच्या विकासाची पायरी बनते.

सध्याच्या कालमर्यादेचे आणखी एक वेगळेपण पंतप्रधानांनी अधोरेखित केले, ते म्हणजे तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या अभूतपूर्व संधी. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या मोहिमा आणि मानवतेच्या भविष्यासाठी भारताचे सुरू असलेले प्रयत्न, या सर्व आपल्यासाठी नवीन प्रेरणा आहेत, असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की, देश कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय), मशीन लर्निंग आणि इतर भविष्यवादी तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर आहे. खेळ आणि तत्सम उपक्रमांसाठी राबवत असलेल्या मजबूत यंत्रणेकडेही त्यांनी लक्ष वेधले. तुम्ही या सगळ्याचा भाग व्हायला हवे. तुम्हाला न पाहिलेल्या शक्यतांचा शोध घ्यावा लागेल, न पाहिलेल्या क्षेत्रांचा शोध घ्यावा लागेल आणि अकल्पित असे उपाय शोधावे लागतील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

भविष्यातील उद्दिष्टे आणि संकल्प हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला सध्याच्या प्राथमिकतेच्या क्षेत्रांवर समान भर द्यायला हवा. त्यांनी तरुणांना देशात होत असलेल्या बदलांविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले आणि सध्या सुरु असलेल्या मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यास सांगितले. स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक तरुणाने ही मोहीम जीवन मिशन म्हणून आत्मसात केली पाहिजे आणि आपला परिसर, गाव, नगरे आणि शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी त्यांना अमृत महोत्सवादरम्यान स्वातंत्र्यसैनिकांवरील एक तरी पुस्तक वाचण्यास सांगितले. त्यांनी युवकांना, स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित कविता, कथा किंवा व्लॉगिंगसारखे काही सर्जनशील उपक्रम हाती घेण्यास सांगितले आणि त्यांच्या शाळांना या उपक्रमांसाठी स्पर्धा घेण्यास सांगितले. युवकांनी त्यांच्या जिल्ह्यात बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरांजवळ वनीकरणाचे काम हाती घ्यावे आणि त्यांची देखभाल करण्याबाबत जागरूकता निर्माण करावी, असेही पंतप्रधानांनी सुचवले. त्यांनी तरुणांना फिट इंडिया चळवळीत भाग घेण्यास सांगितले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यात सहभागी होण्यास सांगितले. प्रत्येक घरात योग संस्कृती रुजविण्यावर त्यांनी भर दिला.

जी -20 (G-20) शिखर परिषदेबद्दल तरुणांनी जागरूक राहावे आणि भारताच्या अध्यक्षपदाबद्दल सक्रिय संभाषणात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी तरुणांना केले.

‘आपल्या वारशाचा अभिमान’ आणि ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य’ या संकल्पांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी या संकल्पात असलेल्या तरुणांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर तरुणांनी त्यांच्या प्रवासात वारसा स्थळांचा समावेश करावा असे सुचवले. तुम्ही तरुण आहात, तुमचे भविष्य घडवण्याची हीच वेळ आहे. आपण नवीन विचार आणि नवीन मानकांचे निर्माते आहात. तुम्ही नव्या भारताचे मार्गदर्शक आहात, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

संरक्षण मंत्री, राजनाथ सिंह, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट, रेणुका सिंग सरुता, निशीथ प्रामाणिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

 

S.Patil/Rajashree/Vikas/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893784) Visitor Counter : 163