वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
व्यवसाय पद्धतींमध्ये शाश्वत आणि हरित दृष्टिकोनाचा अवलंब करण्याचे पीयूष गोयल यांचे उद्योजकांना आवाहन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पीयूष गोयल यांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2023 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2023
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी उद्योजकांना व्यवसाय पद्धतींमध्ये शाश्वत आणि हरित दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. शाश्वत आणि न्याय्य भविष्यातील ध्येयपूर्तीच्या अजेंडासाठी आपण एकत्रितपणे कसे कार्य करू शकतो हे पाहण्यासाठी त्यांनी G20 सोबत B20 च्या मंचाचा वापर करण्यास सांगितले. ते आज गांधीनगरमध्ये जागतिक व्यापारी समुदायासोबत अधिकृत जी 20 संवाद मंच, बिझनेस 20 (B20) च्या आरंभीच्या बैठकीला संबोधित करत होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त गोयल यांनी आदरांजली वाहिली, नेताजी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक दीपस्तंभ होते, असे ते म्हणाले. “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या संकल्पनेनुसार आम्ही संपूर्ण जगाला एकमेकांची काळजी घेण्यास प्रेरित करू इच्छितो, अधिक संवाद साधू इच्छितो आणि आपली पृथ्वी आणि भावी पिढीच्या भविष्याबद्दल अधिक जागरूक राहू इच्छितो, असे गोयल यांनी सांगितले.
भारत नेहमीच शाश्वत विकासाचा पुरस्कर्ता राहिला आहे. पर्यावरणीय उद्दिष्टे स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत आपण जगातील अव्वल 5 देशांपैकी एक राहिल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या विकासाच्या विलक्षण यशोगाथेबद्दल त्यांनी सांगितले की अनेक संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती असून देखील भारताने गेल्या तीन दशकांमध्ये 12 पटींनी विकास केला आहे. सर्वसमावेशक विकासाचा लाभ समाजातील कोणताही भेदभाव न करता सर्व स्तरांना आणि देशातील दुर्गम भागातील जनतेला व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने परिवर्तनकारी पावले उचलली आहेत, असे गोयल म्हणाले.

नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या जीवनाच्या मुलभूत गरजा पुरवण्यात, त्यांना सक्षम बनवण्यात, प्रोत्साहित करण्यात आणि जीवनातील चांगल्या गोष्टींची आकांक्षा बाळगण्यासाठी प्रेरित करण्यात सरकार यशस्वी झाले आहे, यावर त्यांनी भर दिला. देशात कोविड संकटाचा परमोच्च बिंदू असताना देखील कोणाचाही भूकबळी गेला नाही असे गोयल म्हणाले.
आपल्यातील स्पर्धात्मकतेमुळे भारतात आलेले व्यवसाय नेहमीच यशस्वी झाले आहेत, असे ते म्हणाले. भारताने कायद्याचे राज्य,, प्रेरणादायी आणि निर्णायक नेतृत्व, पारदर्शक सरकारी योजना प्रदान केल्या आहेत तसेच कोणतेही अपारदर्शक प्रारूप आणि छुपे अनुदान देऊ केले नाही असे ते म्हणाले.
आमच्याकडे येत्या ऑगस्टपर्यंत B 20 साठी एक मजबूत फ्रेमवर्क असेल आणि भारतापासून जगापर्यंत, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण जबाबदारी, काळजी, देखभाल , एकता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी एकत्र काम करू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारताने 1 डिसेंबर 2022 पासून जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारले. जी 20 हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे. 2010 मध्ये स्थापित झालेला , B20 हा जी 20 मधील सर्वात प्रमुख प्रतिबद्धता गटांपैकी एक आहे, ज्यामध्ये कंपन्या आणि व्यावसायिक संस्था सहभागी आहेत. B20 हा मंच जागतिक आर्थिक आणि व्यापार प्रशासनाच्या मुद्द्यांवर कृती करण्यासाठी जागतिक स्तरावरच्या व्यावसायिक नेत्यांना चालना देण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करतो ज्यायोगे जी 20 च्या एकत्रित व्यावसायिक समुदायात एकवाक्यता येते.
जी 20 ला सहमती-आधारित धोरण शिफारशी निश्चित करण्यासाठी मदत म्हणून B 20 मंच 7 कृती दल आणि 2 कृती परिषदांच्या माध्यमातून कार्य करेल.
रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, G20 इंडियाचे शेर्पा अमिताभ कांत, आणि B20 इंडियाचे अध्यक्ष, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अनुराग जैन, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते. B20 इंडिया इनसेप्शन मीटिंगमध्ये 200 हून अधिक परदेशी प्रतिनिधींसह जी 20 सदस्य देश आणि आमंत्रित देशांमधील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यावसायिक अधिकारी, यांच्या व्यतिरिक्त देशातील 400 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.
B20 दरम्यान आयोजित बैठकांमध्ये हवामान कृती, नवोन्मेष, डिजिटल जागतिक सहकार्य, लवचिक जागतिक मूल्य साखळी, आर्थिक समावेशनाला चालना देणे, सामाजिक सक्षमीकरण इत्यादी विस्तृत क्षेत्रांवर चर्चा होईल. B20 इनसेप्शन मीटिंग 24 जानेवारी 2023 रोजी संपेल.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1893121)
आगंतुक पटल : 313