गृह मंत्रालय
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील नामकरण न झालेल्या सर्वात मोठ्या आकाराच्या 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्या वीरांची नावे प्रदान करण्यासाठी आयोजित समारंभात पंतप्रधान सहभागी; नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप येथे उभारण्यात येणाऱ्या आणि नेताजींना समर्पित केलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या लघु-प्रतिकृतीचे केले अनावरण
या ऐतिहासिक प्रसंगी, पोर्ट ब्लेयर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह झाले सहभागी
देशाच्या तिन्ही सैन्य दलांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जगातील इतर कोणत्याही देशाने शूर सैनिकांची नावे बेटांना देऊन त्यांच्या शौर्याचा असा सन्मान केलेला नाही
Posted On:
23 JAN 2023 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2023
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील नामकरण न झालेल्या सर्वात मोठ्या आकाराच्या 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्या वीरांची नावे प्रदान करण्यासाठी आयोजित समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप येथे उभारण्यात येणाऱ्या आणि नेताजींना समर्पित केलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या लघु-प्रतिकृतीचे देखील अनावरण केले.
या ऐतिहासिक प्रसंगी, पोर्ट ब्लेयर येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भाग घेतला. परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर (निवृत्त) (ऑनररी कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव, सुभेदार मेजर संजय कुमार, नायब सुभेदार बना सिंह यांचे कुटुंबीय तसेच इतर सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार केला. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल अॅडमिरल डी.के.जोशी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, देशाच्या तिन्ही सैन्य दलांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जगातील इतर कोणत्याही देशाने शूर सैनिकांची नावे बेटांना देत त्यांच्या शौर्याचा असा सन्मान केलेला नाही. आपल्या सैन्यातील परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाची कायमची आठवण राहण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रयत्न तिन्ही सेना दलांचा उत्साह वाढविणारे आहेत. ते म्हणाले की, आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126वी जयंती, देशभर पराक्रम दिन म्हणून साजरी केली जात आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्या बेटावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वास्तव्य केले होते त्या सुभाष बेटावर नेताजींचे स्मारक उभारण्याचा देखील निर्णय या प्रसंगी घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या दोन निर्णयांमुळे अंदमान आणि निकोबार द्वीपांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणींशी संपूर्ण देश जोडला जाईल आणि या निर्णयांच्या माध्यमातून भारताच्या तरुण पिढ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि धैर्य ही मूल्ये बिंबवली जातील. सेल्युलर तुरुंगामुळे अंदमान आणि निकोबार बेटे याआधीच स्वातंत्र्याची तीर्थस्थळे झाली होती आणि मग नेताजींनी या पवित्र भूमीवर आपला तिरंगा फडकाविला असे उद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी काढले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, सेल्युलर तुरुंगात शिक्षा भोगलेल्या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या अमर ज्योतीचे बांधकाम अर्ध्यावरच सोडण्यात आले होते या क्रांतीकारकांना श्रद्धांजली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ते काम पूर्ण केले. ते म्हणाले की आज मेजर सोमनाथ शर्मा यांच्यापासून ते सुभेदार मेजर योगेंद्र सिंग पर्यंत देशाच्या सर्व शूर सैनिकांच्या स्मृती पंतप्रधान मोदी यांनी अविस्मरणीय करून ठेवल्या आहेत आणि येणाऱ्या अनेक पिढ्या त्यातून प्रेरित होतील आणि देशप्रेम तसेच शौर्याची मूल्ये त्यांच्यात रुजतील.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893091)
Visitor Counter : 231