रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते अपघातांचे प्रमाण निम्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन


अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण आणि आपत्कालीन खबरदारी या रस्ता सुरक्षेच्या सर्व चार सूत्रांवर भर देऊन 11 ते 17 जानेवारी दरम्यान पाळण्यात आला रस्ता सुरक्षा सप्ताह

Posted On: 18 JAN 2023 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

 

वर्ष  2025 च्या अखेरपर्यंत  रस्ते अपघातांचे प्रमाण  50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान, 4 तासांच्या टेलिथॉन आणि रस्ते  सुरक्षा अभियान जनजागरूकता ( आउटरीच) मोहिमेमध्ये ते  सहभागी झाले. ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी देशात लवकरच कायदा आणला जाईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु आणि इतर अनेक संबंधितांनी रस्ता सुरक्षेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली.

रस्ते अपघात आणि त्यात बळी आणि जखमी व्यक्तींचे प्रमाण  कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वचनबद्ध आहे तसेच रस्ते सुरक्षेच्या सर्व 4 ई  म्हणजेच इंजिनियरिंग (अभियांत्रिकी), एन्फोर्समेंट (अंमलबजावणी), एजुकेशन (शिक्षण )आणि इमर्जन्सी केअर ( आपत्कालीन खबरदारी) या अंतर्गत   अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

या सप्ताहादरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  दिल्लीतील विविध ठिकाणी पथनाट्य  (स्ट्रीट  शो), जागरूकता मोहीम, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, कॉर्पोरेट्सच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा प्रदर्शनासह  वॉकथॉन, चर्चासत्र तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योजकांसोबत  पॅनल चर्चा यांसारखे उपक्रम राबवले.

याशिवाय, रस्त्यांची मालकी ज्यांच्याकडे आहे , त्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण , राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ इत्यादी संस्थांनी देखील वाहतूक नियम आणि नियमनाचे  पालन, पादचाऱ्यांची सुरक्षा, पथकर नाक्यांवर वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरे आणि इतर रस्ते अभियांत्रिकी उपक्रमांशी संबंधित विशेष मोहिमा राबवल्या. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे परिवहन आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्या आणि देशभरातील सामान्य जनतेनेही जागरुकता मोहिमा , प्रथम प्रतिसाद प्रशिक्षण आयोजित करून , नियम आणि नियमनाची तळागाळापर्यंत काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करून तसेच  रस्ते सुरक्षेशी संबंधित इतर उपक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

रस्ता सुरक्षा सप्ताहाला दूरचित्रवाणी , मुद्रित माध्यमे आणि समाजमाध्यमांवर  व्यापक वृत्तांकन  मिळाले आणि ही मोहीम लाखो लोकांपर्यंत पोहोचली.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1892061) Visitor Counter : 229