मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

मत्स्यव्यवसाय विभागाने ‘सागर परिक्रमा’ टप्पा III साठी नियोजन बैठक आयोजित केली


‘सागर परिक्रमा’ टप्पा तीनचा कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित केला जात असून, राज्याच्या अधिकाऱ्यांनी अंदाजित योजना केली प्रस्तावित

परशोत्तम रुपाला यांनी मराठी भाषेतल्या “सागर परिक्रमा गीताचे” केले प्रकाशन

Posted On: 17 JAN 2023 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2023

 

भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातील  मत्स्यव्यवसाय विभागाने,  स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त,  स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत ‘सागर परिक्रमा’ कार्यक्रम सुरु केला. सागर परिक्रमा कार्यक्रम पूर्व-निर्धारित सागरी मार्गावर  आयोजित केला जात आहे ज्यामध्ये किनारपट्टीवरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.  

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री  परशोत्तम रुपाला यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्यव्यवसाय विभागाने (डीओएफ) नवी दिल्ली इथे ‘सागर परिक्रमा’ टप्पा III साठी नियोजन बैठक आयोजित केली होती.

रुपाला यांनी यावेळी मराठी भाषेतल्या “सागर परिक्रमा गाण्याचे”प्रकाशन केले. त्यानंतर, या बैठकीला उपस्थित राहून आपले विचार मांडल्याबद्दल आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.     

सागर परिक्रमा टप्पा III चा कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित केला जात असून, राज्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची अंदाजित योजना प्रस्तावित केली. हवामानाची अनुकुलता आणि कार्यक्रमावर प्रभाव टाकणारे अन्य घटक लक्षात घेऊन, अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची आयोजन स्थळे आणि त्याच्या तारखा याबाबत विचारमंथन केले. रॅली, स्थळ भेटी, गृहभेटी इत्यादी आयोजित करण्याच्या जागांबाबत व्यवहार्य पर्यायांवर चर्चा करण्यात आली. 

त्यानंतर, मच्छीमार समाज आणि भाजपाच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आणि विचारविनिमयासाठी त्यांचे मुद्दे मांडण्याकरता आमंत्रित करण्यात आले. खोल समुद्रातील मासेमारी किफायतशीर होण्यासाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांसाठी डिझेलवर अनुदान देण्याची राज्याची विनंती, खोल समुद्रात मासेमारी करताना शेजारी देशांनी ताब्यात घेतलेल्या  मच्छीमारांच्या मुद्द्यावर कार्यवाही, मिरकरवाडा टप्पा II  पूर्ण करणे, मासेमारी बंद असलेल्या काळात जास्तीतजास्त लाभार्थ्यांना शिधा आणि विमा कवच उपलब्ध करणे, या आणि अन्य मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

ही  नियोजन बैठक असून, प्रत्यक्ष आव्हाने आणि भागधारकांच्या अपेक्षा समजून घेत कार्यक्रमाचे नियोजन सुरु करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे. या संदर्भातल्या बैठकांच्या  आणि आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी, लाभार्थी  असायला हवे असे रुपाला यांनी  उपस्थित अधिकारी आणि सहभागींना सांगितले. 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना', किसान क्रेडिट कार्ड आणि एफआयडीएफ यांसारख्या भारत सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध मत्स्यपालन योजना आणि कार्यक्रमांद्वारे मच्छिमार आणि इतर भागधारकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीला सहाय्य करणे हे या परस्परसंवादाचे उद्दिष्ट आहे.

सर्व योजना महत्त्वाच्या आहेतच पण  सागर परिक्रमा भेटीदरम्यान मच्छिमार समुदायात किसान क्रेडिट कार्डबद्दल जागरूकता निर्माण करणे हे  प्रमुख उद्दिष्ट असल्याचे परशोत्तम रुपाला यांनी यावेळी अधोरेखित केले.

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891798) Visitor Counter : 196