संरक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित; पथदर्शी अशा अग्निवीर योजनेचे आघाडीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
अग्नीपथ योजना महिलांचे सक्षमीकरण कशा प्रकारे करेल याविषयी केली चर्चा, महिला अग्निवीरांना देशाच्या तिन्ही सेना दलांमध्ये कार्यरत झालेले पाहण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त
ही योजना म्हणजे बलवान आणि संपन्न ‘नव भारताची’उभारणी करण्याच्या दिशेने टाकलेले अग्रगण्य पाऊल- संरक्षणमंत्री
Posted On:
16 JAN 2023 5:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 16 जानेवारी 2023 रोजी, तिन्ही सेना दलांतील प्राथमिक प्रशिक्षण सुरु केलेल्या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. पथदर्शी अशा अग्निवीर योजनेचे आघाडीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी या अग्निवीरांचे अभिनंदन केले आहे.
अग्नीपथ योजना कशा प्रकारे महिलांचे आणखी सक्षमीकरण करेल याविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. महिला अग्नीवीर आपल्या कामगिरीने ज्या प्रकारे देशाच्या नौदलाची शान वाढवत आहेत, त्याबद्दल आनंद व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की, महिला अग्निवीरांना देशाच्या तिन्ही सेना दलांमध्ये कार्यरत झालेले पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने चालवणाऱ्या महिलांची उदाहरणे देऊन महिला विविध आघाड्यांवर सशस्त्र दलांचे समर्थपणे नेतृत्व करत आहेत याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वागतपर संबोधनात पंतप्रधानांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेची प्रशंसा केली. ते म्हणाले की या संकल्पने अंतर्गत सर्वच क्षेत्रांमध्ये नवी ध्येये निश्चित केली जात असून त्यांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत.आपल्या देशाला सक्षम करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अनेक निर्णय घेतले असून, अग्निवीर योजनेची अंमलबजावणी ही त्यातील सर्वात महत्त्वाची आणि अभूतपूर्व सुधारणा आहे असे ते म्हणाले.
सतत बदलते जागतिक पटलावरील चित्र आणि भौगोलिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील संरक्षण दलांना सशक्त करण्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत, अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलांचा चेहेरा अधिक तरुण आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जाणकार होईल असे त्यांनी सांगितले.
या योजनेला देशभरातून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि यातील भर्तीसाठी मोठ्या संख्येने अर्ज पाठविण्यात आले या गोष्टीची केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. यावेळी पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने प्रशिक्षण घेत असलेल्या महिला अग्निवीरांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
संरक्षणमंत्री म्हणाले की केंद्रीय संरक्षण मंत्रालयासह अनेक मंत्रालये या अग्निवीरांच्या कल्याणासाठी पुढाकार घेत आहेत. “संरक्षण मंत्रालयाचे विविध विभाग, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच रेल्वे मंत्रालयातील अनेक पदांच्या भर्तीप्रक्रियेत, अग्निवीरांसाठी आरक्षण सुनिश्चित केले जात आहे. अग्निवीरांना योग्य शिक्षण मिळेल याची खात्री करून घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालय तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे व्यवस्था करत आहेत. सैन्यातील सेवेनंतर स्वयंरोजगार किंवा एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सहकार्याने किफायतशीर दरात कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था होत आहे. अग्निवीर हे सुरक्षावीर राहण्याबरोबरच समृद्धीवीरही होतील,” संरक्षणमंत्री म्हणाले.
देशातील सर्व अग्निवीर प्रशिक्षण केंद्रांमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891603)
Visitor Counter : 226