पंतप्रधान कार्यालय
व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटच्या नेते सत्र समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारोपाचे भाषण
Posted On:
13 JAN 2023 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
तुमच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल धन्यवाद! हे खरोखरच विचार आणि कल्पनांचे उपयुक्त आदान-प्रदान ठरले आहे. यातून ग्लोबल साउथच्या सामायिक आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या.
हे स्पष्ट आहे की जगाला भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत विकसनशील देशांचा समान दृष्टिकोन आहे.
हे केवळ आज रात्रीच्या चर्चेतच नाही, तर या ‘व्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट’ च्या गेल्या दोन दिवसांतही दिसून आले
ग्लोबल साउथमधील सर्व देशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या यापैकी काही कल्पना संक्षिप्तपणे मांडण्याचा मी प्रयत्न करतो .
आपण सर्व दक्षिणेकडील देशांमधील सहकार्याच्या महत्त्वावर आणि जागतिक अजेंडाला एकत्रितपणे आकार देण्याबाबत सहमत आहोत.
आरोग्याच्या क्षेत्रात, आपण पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देणे, आरोग्यसेवेसाठी प्रादेशिक केंद्रे विकसित करणे आणि आरोग्य व्यावसायिकांची गतिशीलता सुधारणे यावर भर देतो. डिजिटल आरोग्य उपाययोजना त्वरीत उपयोजित करण्याच्या संभाव्यतेबाबत देखील आपण जागरूक आहोत.
शिक्षणाच्या क्षेत्रात, व्यावसायिक प्रशिक्षणातील तसेच दूरस्थ शिक्षण देण्यासाठी विशेषत: दुर्गम भागात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आपल्या सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक केल्यास आपण सर्वांना फायदा होऊ शकतो.
बँकिंग आणि वित्त क्षेत्रात, डिजिटल सार्वजनिक वस्तू तैनात केल्यास विकसनशील देशांमध्ये आर्थिक समावेशकता मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने वाढू शकते. भारताच्या स्वतःच्या अनुभवाने हे दाखवून दिले आहे.
कनेक्टिव्हिटी संबंधी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीच्या महत्त्वाबाबत आपण सर्व सहमत आहोत. आपल्याला जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्याची आणि विकसनशील देशांना या मूल्य साखळींशी जोडणारे मार्ग शोधण्याची गरज आहे.
विकसित देशांनी हवामान वित्त आणि तंत्रज्ञानाबाबत आपली जबाबदारी पार पाडली नाही, यावर विकसनशील देशांचे एकमत आहे.
आपण हे देखील मान्य करतो की उत्पादनातील उत्सर्जन नियंत्रित करण्याबरोबरच,अधिक पर्यावरणपूरक शाश्वत जीवनशैलीकडे वळण्यासाठी ‘वापरणे आणि फेकणे’ या वृत्तीपासून दूर जाणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
भारताच्या ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ किंवा LiFE उपक्रमामागील हे मध्यवर्ती तत्त्वज्ञान आहे – जे विवेकपूर्ण उपभोग आणि चक्राकार अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करते.
महामहिम,
व्यापक ग्लोबल साउथने सामायिक केलेल्या या सर्व कल्पना भारताला जी 20 चा अजेंडा तसेच तुमच्या सर्व राष्ट्रांसोबतच्या आमच्या विकास भागीदारीला आकार देण्यासाठी प्रेरक ठरतील.
पुन्हा एकदा, व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिटच्या आजच्या समारोपाच्या सत्रात तुमच्या आनंददायी उपस्थितीबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो.
धन्यवाद.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891150)
Visitor Counter : 175
Read this release in:
Assamese
,
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam