पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट’ मध्ये पर्यावरण मंत्र्यांचे सत्र
जगभरात पर्यावरण पूरक जीवनशैलीचा व्यापक अवलंब पर्यावरण ऱ्हासापासून जगाला वाचवण्यात महत्त्वपूर्ण सकारात्मक योगदान देऊ शकेल : भूपेंद्र यादव
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विकसित देशांकडून तातडीच्या आर्थिक आणि तांत्रिक सहाय्याच्या गरजेवर भर
Posted On:
13 JAN 2023 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
दोन दिवसीय ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट’ चा भाग म्हणून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पर्यावरण मंत्र्यांचे सत्र काल पार पडले. "पर्यावरणपूरक जीवनशैलीसह विकासाचा समतोल राखणे" हा या परिषदेचा विषय होता. ग्लोबल साउथच्या चौदा देशांचे मंत्री या सत्रात सहभागी झाले होते.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी उद्घाटनपर भाषण केले. आपल्या भाषणात यादव म्हणाले की असमानता कमी करण्यासाठी तसेच लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरणे विकसित करण्याची गरज आहे.
विकसनशील देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात विकसित देशांची भूमिका यादव यांनी अधोरेखित केली. जगभरात मोठ्या प्रमाणावर पर्यावरण-अनुकूल कृती आपल्या सामायिक आणि एकमेव जगाचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण सकारात्मक योगदान देऊ शकतात यावर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी भर दिला. हवामान बदलाच्या जागतिक समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी मिशन लाईफ (पर्यावरणपूरक जीवनशैली) चे महत्त्व अधोरेखित केले.
ग्लोबल साउथच्या मंत्र्यांनी छोट्या विकसनशील द्वीपकल्पना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. अन्न सुरक्षा, समुद्र पातळीत वाढ, किनारपट्टीची धूप, कोविड 19 साथीच्या आजारामुळे आर्थिक मंदी सारखे काही सामायिक मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते.
सर्व देशांनी जी 20 अध्यक्षपदाबद्दल भारताचे अभिनंदन केले आणि नील अर्थव्यवस्था , चक्राकार अर्थव्यवस्था आणि जमिनीचा ऱ्हास या विषयांवर सकारात्मक फलनिष्पत्तीची अपेक्षा केली. हवामान बदलाची समस्या विकसित आणि विकसनशील अशा सर्व देशांसाठी समान आहे परंतु विकसनशील राज्यांकडे तांत्रिक आणि आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांच्यासाठी उपाययोजना सोप्या नाहीत असे त्यांनी नमूद केले. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी साउथ- साउथ सहकार्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891025)
Visitor Counter : 170