आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासंबंधी भारताच्या पथदर्शी आराखड्यावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन


भारतासाठी, हत्तीरोग हा दुर्लक्षित नव्हे तर उच्चाटनासाठी प्राधान्य असलेला आजार आहे: डॉ मनसुख मांडविया

Posted On: 13 JAN 2023 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जानेवारी 2023

 

“भारतासाठी, लिम्फॅटिक फायलेरियासिस म्हणजे हत्तीरोग हा  इतर देशांप्रमाणे दुर्लक्षित आजार नाही, तर त्याचे कालबद्ध पध्दतीने निर्मूलन करण्याला प्राधान्य असलेला आजार आहे. भारत  युद्ध पातळीवर, बहु -भागीदारी, बहु -क्षेत्र, लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी 2027 पर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध असून त्यासाठी आम्ही पथदर्शी आराखडा तयार केली  आहे "असे  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे . आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली हत्तीरोगाच्या  उच्चाटनासाठी भारताच्या आराखड्यावर आधारित  राष्ट्रीय परिसंवाद झाला, त्यावेळी ते बोलत होते.  नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

डॉ. मांडविया म्हणाले की, इतर रोगांचे उच्चाटन करण्यातील देशाच्या व्यापक अनुभवातून शिकून, आम्ही हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी नव्याने पाच-सूत्री  धोरण तयार केले आहे. हे पाच स्तंभ खालीलप्रमाणे -

  • वर्षातून दोनदा (10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट) बहु-औषध प्रशासन  मोहीम  राष्ट्रीय कृमीनाशक दिनाबरोबर एकाच वेळी आयोजित  केली जाते.
  • लवकर निदान आणि उपचार; विकार व्यवस्थापन आणि अपंगत्व सेवा बळकट करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांचा सहभाग
  • बहुक्षेत्रीय समन्वयित प्रयत्नांसह एकात्मिक रोग  नियंत्रण
  • संबंधित विभाग आणि मंत्रालयांसह आंतरक्षेत्रीय अभिसरण
  • हत्तीरोगासाठी विद्यमान डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ घेणे आणि पर्यायी निदान पद्धती शोधणे

हत्तीरोगाचे कालबद्ध रीतीने उच्चाटन करण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना, डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की भारताच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीतही  प्रत्येक प्रदेश आणि भागीदाराचे स्वतःचे सामर्थ्य आहे , ज्याचा उपयोग करून आम्ही उच्चाटनाच्या शेवटच्या टप्प्याकडे  जात आहोत. जन-भागीदारीच्या माध्यमातून आपण पोलिओमुक्त होऊ शकतो हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. हत्तीरोगाच्या  निर्मूलनासाठी तसाच दृष्टीकोन आवश्यक आहे, ज्यात  विविध मंत्रालये, केंद्र आणि राज्यांमधील विभाग, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व  द्वारे खाजगी क्षेत्र, धार्मिक  नेते, प्रभावशाली व्यक्ती  सेवा आणि सहकार्याच्या भावनेने एकत्र येतात. आपले प्राधान्यक्रम ओळखून तसेच आपल्या योजना कार्यक्षमतेने अंमलात आणण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा वापर करून आपले स्वतःचे “इंडिया मॉडेल” तयार करूया, असे ते म्हणाले.

 

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1890985) Visitor Counter : 319


Read this release in: English , Urdu , Odia , Tamil , Telugu