पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 13 जानेवारी रोजी जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार तसेच वाराणसी येथे टेंट सिटीचे उद्‌घाटन देखील करणार


दोन्ही प्रकल्पांमुळे या भागातील पर्यटन क्षमतेला मोठी चालना मिळणार

पंतप्रधान 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर देशांतर्गत अनेक जलमार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करणार

पंतप्रधान हल्दियामध्ये मल्टी मोडल टर्मिनलचे उद्‌घाटनही करणार

Posted On: 11 JAN 2023 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-MV गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवतील आणि वाराणसी मध्ये टेंट सिटीचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान ते 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर अनेक देशांतर्गत  जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील.

एमव्ही गंगा विलास

एमव्ही गंगा विलास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आपला प्रवास सुरू करेल आणि भारत, बांगलादेशातील 27 नदी प्रणाली ओलांडून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढला पोहोचण्यासाठी 51 दिवसांत सुमारे 3,200 कि.मीचा प्रवास करेल. एमव्ही गंगा विलासमध्ये सर्व लक्झरी सुविधांसह 36 पर्यटकांच्या क्षमतेचे तीन डेक आणि 18 सुइट्स आहेत. गंगा विलासच्या पहिल्या प्रवासाच्या संपूर्ण कालावधीसाठी स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक सहभागी होणार आहेत.

देशातील सर्वोत्कृष्ट सुविधा जगासमोर आणण्यासाठी  एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या 51 दिवसांच्या प्रवासात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. या प्रवासामुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्मात सहभागी होण्याची आणि शानदार प्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे रिव्हर क्रूझची वापरात न आलेली क्षमता उपयोगात येईल. तसेच ही भारताच्या नदी क्रूझ पर्यटनाच्या नवीन युगाची सुरुवात ठरेल.

वाराणसी येथे टेंट सिटी

या प्रदेशातील पर्यटनाच्या क्षमतांचा  फायदा घेण्यासाठी गंगा नदीच्या काठावर टेंट सिटीची संकल्पना साकार करण्यात आली आहे. हा प्रकल्प शहरातील घाटांच्या समोर  विकसित केला गेला आहे. या प्रकल्पात पर्यटकांना निवास सुविधा प्रदान केली जाईल. यामुळे विशेषत: काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानंतर वाराणसीमध्ये वाढलेल्या पर्यटकांच्या निवासाची पूर्तता होईल. हा प्रकल्प वाराणसी विकास प्राधिकरणाने सरकारी-खाजगी भागिदारी (पीपीपी मोड) पद्धतीने विकसित केला आहे. पर्यटक परिसरातील विविध घाटांवरून बोटीने टेंट सिटीमध्ये पोहोचू शकतील. दरवर्षी ऑक्‍टोबर ते जून या कालावधीत टेंट सिटी कार्यान्वित राहील तसेच पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने तीन महिन्यांसाठी हा प्रकल्प बंद ठेवला जाईल.

अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्प

पंतप्रधान पश्चिम बंगालमधील हल्दिया मल्टी मोडल टर्मिनलचे उद्घाटन करतील. जलमार्ग विकास प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या, हल्दिया मल्टी मॉडेल टर्मिनलची मालहाताळणी  क्षमता सुमारे 3 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (MMTPA) आहे. येथील बर्थ सुमारे 3000 डेडवेट टनेज (DWT) पर्यंत जहाजे हाताळू शकतील असे बांधण्यात आले आहेत.

पंतप्रधान गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर, चोचकपूर, झामानिया आणि उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील कानसपूर येथे चार तरंगत्या सामुदायिक जेटींचे उद्घाटन करतील. याशिवाय,पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील दिघा, नक्त दियारा, बाड, पानापूर आणि बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर येथे पाच कम्युनिटी जेटींची पायाभरणी केली जाईल. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गंगा नदीकाठी 60 हून अधिक सामुदायिक जेटी बांधल्या जात आहेत. या जेट्टींमुळे आर्थिक घडामोडींना चालना मिळेल आणि या प्रदेशातील स्थानिक समुदायांचे जीवनमान सुधारेल. या सामुदायिक जेटी लहान शेतकरी, मत्स्यपालन केंद्र, असंघटित शेत उत्पादक संघ, बागायतदार, फुलविक्रेते यांना गंगा नदीच्या काठावर चालणाऱ्या आर्थिक घडामोडींवर लक्ष केंद्रित करून साधे लॉजिस्टिक उपाय प्रदान करतील आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

पंतप्रधान गुवाहाटी येथे ईशान्येकडील राज्यांसाठीच्या सागरी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करतील. हे केंद्र ईशान्येकडील प्रदेशातील समृद्ध प्रतिभा भांडाराला  सन्मानित करण्यात मदत करेल आणि वाढत्या लॉजिस्टिक उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देईल.

या व्यतिरिक्त, पंतप्रधान गुवाहाटी येथील पांडू टर्मिनल येथे जहाज दुरुस्ती सुविधा आणि उन्नत रस्त्याची पायाभरणी करतील. पांडू टर्मिनलवरील जहाज दुरुस्ती सुविधेमुळे मौल्यवान वेळेची बचत होईल कारण एक जहाज कोलकाता दुरुस्ती सुविधेपर्यंत नेण्यासाठी आणि परत जाण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो. शिवाय, त्यामुळे पैशांची देखील मोठी बचत होणार असल्याने जहाजाचा वाहतूक खर्चही वाचणार आहे. पांडू टर्मिनलला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 ला जोडणाऱ्या समर्पित रस्त्यामुळे 24 तास संपर्क सुविधा उपलब्ध होईल.

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890463) Visitor Counter : 246