पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

सम्मेद शिखरजी पर्वत क्षेत्र येथे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांसाठीच्या अधिसूचनेतील तिसऱ्या कलमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात यावी – केंद्रीय पर्यावरण मंत्रालय

Posted On: 05 JAN 2023 11:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023

 

पारसनाथ वन्यजीव अभयारण्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या काही कृत्यांमुळे जैन धर्माच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या असून जैन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांतर्फे गेल्या काही दिवसात या समस्येविषयी माहिती देणारे विविध  अर्ज केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सादर करण्यात आले आहेत.

पारसनाथ वन्यजीव अभयारण्यात झारखंड सरकारतर्फे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांसाठीच्या अधिसूचनेतील तरतुदींची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे अशा आशयाच्या तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या अधिकारी व्यक्तींकडून झालेल्या अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत असे या तक्रारींमध्ये म्हटले आहे.

 या संदर्भात, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या संपूर्ण समस्येबाबत चर्चा करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी जैन समुदायाच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित केले. सदर बैठकीला जैन समुदायाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सम्मेद शिखरजी येथील सद्य परिस्थिती मांडली तसेच या स्थानाची पवित्रता राखण्यासाठी समाजाने केलेल्या मागण्यांची माहिती मंत्र्यांना दिली.

पारसनाथ वन्यजीव अभयारण्य परिसरात सुरु असलेल्या ज्या घटनांमुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी अभयारण्य व्यवस्थापन योजनेत पुरेशा तरतुदी आहेत असे यावेळी सर्वांच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच या संदर्भात जैन समुदायाने मोठ्या प्रमाणात व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेऊन कोणत्याही विशिष्ट समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार विविध मार्गदर्शक सूचना देखील जारी करू शकते.

सम्मेद शिखरजी पर्वत क्षेत्र हे जैन धर्मियांचे पवित्र स्थळ केवळ जैन समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी पवित्र स्थान आहे हे तथ्य जाणून या स्थळाची पवित्रता राखण्यासाठी हे मंत्रालय कटिबद्ध आहे असे यादव म्हणाले.

 या बैठकीनंतर असा निर्णय घेण्यात आला की पारसनाथ वन्यजीव अभयारण्यसंबंधी व्यवस्थापन योजनेतील संबंधित तरतुदींची कठोरतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात यावे. या तरतुदींनुसार संदर्भित ठिकाणचे पशुपक्षी तसेच वनस्पती विश्वाचे नुकसान करणे, या ठिकाणी पाळीव प्राणी घेऊन येणे, मोठमोठ्याने संगीत लावणे तसेच लाउडस्पीकरचा वापर करणे, पवित्र स्मारके,तलाव, खडक,गुहा आणि देवस्थाने यांच्यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा अवमान होईल असे वागणे, मद्य,अंमली पदार्थ किंवा इतर नशा आणणाऱ्या पदार्थांची विक्री करणे यांसह पारसनाथ टेकडीवर अनधिकृत कँम्पिंग आणि ट्रेकिंग करणे अशा सर्व कृत्यांवर बंदी घालण्याचे आदेश झारखंड राज्य सरकारला देण्यात यावेत असा निर्णय झाला आहे. अधिकृत सूचनेत म्हटल्यानुसार राज्य सरकारने पारसनाथ टेकडी परिसरात मद्य तसेच मांसाहारी अन्नपदार्थांच्या विक्रीवर तसेच सेवनावर घालण्यात आलेल्या निर्बंधाचे कठोरतेने पालन होत आहे याची खात्री करून घ्यावी असे देखील आदेशात म्हटले आहे. 

या प्रकरणी महत्त्वाच्या भागधारकांचा योग्य सहभाग तसेच लक्ष असावे या उद्देशाने निरीक्षण समितीमध्ये स्थायी निमंत्रित सदस्य म्हणून जैन समुदायाचे दोन सदस्य तसेच स्थानिक आदिवासी समुदायातील एक सदस्य यांचा समावेश करावा अशा सूचना  राज्य सरकारला देण्यात आला आहे.

इंग्रजी भाषेतील अधिकृत आदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

हिंदी भाषेतील अधिकृत आदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

   

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889032) Visitor Counter : 620