युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
वाय 20 शिखर संमेलनाच्या पूर्वावलोकन कार्यक्रमात उद्या, 6 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते वाय 20 संमेलनाची संकल्पना, बोधचिन्ह तसेच संकेतस्थळाचे होणार उद्घाटन
वाय-20 संमेलनानिमित्त होणाऱ्या उपक्रमांमध्ये जागतिक पातळीवरील युवा नेतृत्व आणि भागीदारी यांवर लक्ष केंद्रित करणार
Posted On:
05 JAN 2023 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023
ठळक वैशिष्ट्ये :
- आगामी आठ महिन्यांच्या कालावधीत, पाच Y 20 (युथ 20) संकल्पनांवर आधारित शिखर संमेलनपूर्व परिषदा आयोजित करण्यात येतील तसेच अंतिम युथ-20 शिखर संमेलनाच्या तयारीच्या दृष्टीने देशभरातील अनेक राज्यांतील विद्यापीठांमध्ये विविध चर्चात्मक कार्यक्रम तसेच चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येईल.
- जगभरातील युवा नेत्यांना एकत्र आणून अधिक उत्तम भविष्यासाठी त्यांच्या मनात असलेल्या कल्पना जाणून घेणे आणि त्यावर आधारित कृती कार्यक्रमाचा मसुदा निश्चित करणे यावर भारताचा भर आहे.
उद्या, 6 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथील आकाशवाणी रंगभवन येथे होणाऱ्या वाय-20 शिखर संमेलनपूर्व कार्यक्रमात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते वाय-20 संमेलनाची संकल्पना, बोधचिन्ह तसेच संकेतस्थळ यांचे उद्घाटन होणार आहे. भारत प्रथमच वाय-20 शिखर संमेलनाचे यजमानपद भूषवणार आहे.
उद्या होणारे कार्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागलेले असतील:- कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण, संकेतस्थळाची सुरुवात तसेच संमेलनाची संकल्पना जाहीर करण्यात येईल. दुसऱ्या सत्रात, यशस्वी युवकांच्या गटचर्चा होतील.भारतात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या तरुण लोकसंख्येचा वापर करून भारत कशा पद्धतीने महासत्ता होऊ शकेल या मुद्द्याबाबत या गटचर्चेत विचारमंथन होईल तसेच चर्चेत सहभागी युवकांच्या व्यक्तिगत यशोगाथांची देखील माहिती देण्यात येईल.
युथ-20 संमेलनात सहभागी गटामध्ये, जगभरातील युवा नेत्यांना एकत्र आणून अधिक उत्तम भविष्यासाठी त्यांच्या मनात असलेल्या कल्पना जाणून घेणे आणि त्यावर आधारित कृती कार्यक्रमाचा मसुदा निश्चित करणे यावर भारताचा भर राहील.
भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात वाय-20 संमेलनानिमित्त होणाऱ्या उपक्रमांमध्ये जागतिक पातळीवरील युवा नेतृत्व आणि भागीदारी यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आगामी आठ महिन्यांच्या कालावधीत, पाच वाय-20 संकल्पनांवर आधारित शिखर संमेलनपूर्व परिषदा आयोजित करण्यात येतील तसेच अंतिम युथ-20 शिखर संमेलनाच्या तयारीच्या दृष्टीने देशभरातील अनेक राज्यांतील विद्यापीठांमध्ये विविध चर्चात्मक कार्यक्रम तसेच चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात येईल.
भारताच्या “अमृत काळा”च्या सुरुवातीला जोडून म्हणजेच, 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्यापासून, स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकमहोत्सवी वर्धापनदिनापर्यंतच्या 25 वर्षांच्या काळाची सुरुवात होताना भारताकडे जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे आणि हा काळ मानवतावादी दृष्टीकोन केंद्रस्थानी ठेवून भारतासाठी भविष्याबाबत आशावादी, समृध्द, समावेशक आणि विकसित समाज निर्मिती करण्याचा काळ आहे. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेला मूर्त स्वरूप देऊन सामूहिक हिताची सुनिश्चिती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार्य उपाययोजना शोधण्यात भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888873)
Visitor Counter : 291