गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रशासित प्रदेशांच्या परिषदेचे आयोजन


केंद्रशासित प्रदेशांनी 2047 साठीचा आपला दृष्टीकोन तयार करावा असे अमित शाह यांचे निर्देश

केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या वारशाचा अभिमान बाळगावा: अमित शाह

आपले ध्येय निश्चित करा आणि देशाची सेवा करण्याच्या या संधीचा उपयोग करा, केंद्रशासित प्रदेशांमध्ये पर्यटनाच्या अफाट शक्यता विकसित केल्या जातील असे अमित शाह यांचे प्रतिपादन

केंद्रशासित प्रदेशांनी पर्यटन, विकास आणि कल्याणाचे केंद्र बनण्याचा प्रयत्न करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “व्होकल फॉर लोकल” आणि “एक भारत श्रेष्ठ भारत” या ब्रीदवाक्यापासून प्रेरणा घ्यावी असे अमित शाह यांचे आवाहन

परिषदेने केंद्रशासित प्रदेश आणि इतर भागधारकांना दिली परस्पर शिक्षण आणि ज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी, केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या आकांक्षा, कामगिरी, स्थानिक प्राधान्यक्रम आणि आगळ्या आव्हानांवर आवाज उठवण्यासाठी दिले व्यासपीठ

Posted On: 29 DEC 2022 10:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022

 

केंद्रशासित प्रदेश देशाच्या इतर भागांसाठी सुशासन आणि विकासाचे मॉडेल बनले पाहिजेत, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन समोर ठेवत, केंद्रीय गृह मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रशासित प्रदेशांवरील परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद अमृत काळाच्या पंच प्रणांनी प्रेरित आहे.

या परिषदेला गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, कॅबिनेट सचिव, केंद्रीय गृह सचिव, मुख्य सचिव/प्रशासकाचे सल्लागार आणि केंद्रशासित प्रदेशांचे इतर अधिकारी, गृह मंत्रालय आणि संबंधित केंद्रीय मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी केंद्रशासित प्रदेशांना देशाचे रोल मॉडेल (आदर्श) बनवण्यावर भर दिला आणि म्हणाले की केंद्रशासित प्रदेशांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला, तर भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठू शकेल. केंद्रशासित प्रदेशांनी 2047 साठीचा आपला दृष्टीकोन तयार करावा असे निर्देशही अमित शाह यांनी दिले. ते म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशांनी पर्यटन, विकास आणि कल्याणाचे केंद्र बनण्याचा प्रयत्न करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “व्होकल फॉर लोकल” आणि “एक भारत श्रेष्ठ भारत” या ब्रीदवाक्यापासून प्रेरणा घ्यावी.  

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, सर्व केंद्रशासित प्रदेशांनी एकत्र येऊन राष्ट्रीय उद्दिष्टे आणि दृष्टीकोन साध्य करण्यासाठी आणि देशाला विकासाच्या प्रवासात पुढे नेण्यासाठी समान व्यासपीठावर एकत्रितपणे काम केले पाहिजे. शाह म्हणाले की केंद्रशासित प्रदेश भौगोलिक आकाराने लहान आहेत आणि त्यांची प्रशासकीय रचना तुलनेने सोपी आहे, त्यामुळे केंद्रशासित प्रदेश हे प्रायोगिक कार्यक्रमांसाठी आदर्श उदाहरण आहेत.

या प्रयोगांची केंद्रशासित प्रदेशांमध्ये लहान प्रमाणात चाचणी केली जाऊ शकते आणि नंतर मोठ्या प्रदेशात आणि राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. ते म्हणाले की विकास आणि लोकसहभागासाठी सहकारावर, विशेषत: मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर भर द्यावा. त्याच वेळी, केंद्रशासित प्रदेशांनी बाह्य साधनसंपत्तीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी उत्पादन क्षेत्र वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणे करून या प्रक्रियेमधील महसुलाचे नुकसान कमी होईल. शाह म्हणाले की, अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी देशात पर्यटन सर्किट विकसित केले पाहिजेत.

या ‘अमृत काळा’त भारताचे ‘सर्वोत्तम भारता’त रुपांतर करण्याची प्रतिज्ञा सर्व भारतीयांनी केली पाहिजे, असे अमित शाह म्हणाले. वर्ष 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल; त्या वर्षातील भारत कसा असेल व एकुणातच त्याकडे जाण्याची दिशा ठरवण्याचे हे वर्ष आहे.

सर्व केंद्रशासित प्रदेशांना वर्ष 2047 साठी दिशादर्शक आराखडा आणि पुढील पाच वर्षांसाठी ध्येयनिश्चिती करून ती गाठण्यासाठी कृती आराखडा दिला आहे. त्यातून त्यांनी वार्षिक आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. त्यावर अंमल करताना केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला पाहिजे आणि ध्येय गाठताना जास्तीतजास्त लाभ मिळवले पाहिजेत.

तळागाळापर्यंत विकास पोहोचला पाहिजे; केवळ ‘जीडीपी’ अर्थात ‘सकल देशांतर्गत उत्पादना’ची वाढती आकडेवारी विकासाचे परिमाण म्हणून पाहण्याऐवजी समाजातील सर्वाधिक वंचित घटकांवर विकासाचा सकारात्मक परिणाम दिसून आला पाहिजे, असे गृहमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळाचे पंचप्राण ठरवले असून प्रत्येक केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने त्यामागील भावना समजून आपापल्या कर्तव्यांची पूर्तता करावी, असे त्यांनी सांगितले. ‘सुरक्षित केंद्रशासित प्रदेश’, ‘महत्त्वपूर्ण सरकारी योजनांच्या अंमलबजावणी संपृक्तता’, ‘शासनाचा किमान हस्तक्षेप मात्र कमाल सुशासन’, ‘भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशक्ती’ आणि ‘सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम व्यवस्था’ या पाच तत्त्वांना अनुसरून केंद्रशासित प्रदेशांची वाटचाल असावी, असे गृहमंत्री म्हणाले.

ही पाच तत्त्वे देशातील भावी पिढ्यांच्या अंगी बाणवण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे एक महत्त्वाचे माध्यम आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. श्री अरविंद यांचे प्रेरणादायी जीवन आपल्याला प्रशासनाचा अर्थ सांगते व त्याविषयी विविध धडे देते. केंद्रशासित प्रदेशांनी, विशेषतः पुद्दुचेरीने त्यांच्या जीवनातील धड्यांचे प्रलेखन करून त्यांचा प्रसार करावा, असे ते म्हणाले.

केंद्रशासित प्रदेशात सुरक्षितता निर्माण करण्यावर भर देत या प्रदेश प्रशासनांनी आपापल्या सर्वोत्तम प्रशासकीय व्यवस्थांबाबत माहितीची देवाणघेवाण करावी, असे अमित शाह यांनी सांगितले. प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाने आपापल्या वारशाचा अभिमान बाळगावा आणि स्वयंपूर्णतेचे उदाहरण म्हणून उभे राहावे, असे ते म्हणाले. केंद्रशासित प्रदेशांमध्ये पर्यटनाच्या विकासाला वाव असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. आजवर केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीची प्रशंसा त्यांनी केली आणि सर्वच भागीदारांनी ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्यासाठी एकत्र यावे, असे सांगितले.

माहितीची देवाणघेवाण व परस्परांकडून शिकण्याची संधी या परिषदेने केंद्रशासित प्रदेश व अन्य भागीदारांना दिली. तसेच, आपापल्या भूमिका, यश, स्थानिक पातळीवरील प्राधान्ये आणि आव्हाने मांडण्यासाठी केंद्रशासित प्रदेशांना व्यासपीठही उपलब्ध करून दिले. या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी नोव्हेंबर महिन्यात पुद्दुचेरी इथे गृह मंत्रालयाच्या व आठ केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला. त्यावेळी आर्थिक विकास, पर्यटन, महत्त्वपूर्ण योजना आणि सर्वोत्तम व्यवस्था या तीन क्षेत्रांबाबत सविस्तर चर्चा होऊन परिषदेचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला.

केंद्रीय गृह सचिवांच्या स्वागताच्या भाषणाने परिषदेची सुरुवात झाली. त्यांनतर झालेल्या सादरीकरणांमध्ये उपरोल्लेखित तीन क्षेत्रांबाबत माहिती मांडण्यात आली व त्यावर सखोल चर्चा झाली. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी केंद्रशासित प्रदेशांच्या आकांक्षा, ध्येयनिश्चिती मांडण्यात आली. मंत्रिमंडळ सचिवांनी आपल्या भाषणात केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शनपर सादरीकरणाबद्दल सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या भाषणाने परिषदेचा समारोप झाला.

केंद्रशासित प्रदेशांची धोरणे व यश (इथे क्लिक करा)

* * *

S.Patil/R.Agashe/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887419) Visitor Counter : 182