आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन आवश्यक औषधे आणि औषधांच्या स्थितीचा औषध कंपन्यांसोबत घेतला आढावा


औषध कंपन्यांना जागतिक पुरवठा साखळीच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना

कोविड औषधांसह सर्व औषधांचा पुरेसा साठा आणि उपलब्धता सुनिश्चित कराण्याचे आदेश

Posted On: 29 DEC 2022 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज दूरदृश्य प्रणाली मार्फत औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत कोविड व्यवस्थापन, औषधांची स्थिती, उपलब्धता आणि उत्पादन क्षमता यांचा आढावा घेतला. भारत कोणत्याही परिस्थितीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी सुसज्ज राहावा हा या मागचा उद्देश्य होता.  जगातील काही देशांमध्ये कोविड 19 रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही आढावा बैठक घेण्यात आली.

केंद्रीय मंत्र्यांना एका सादरीकरणाद्वारे वर्तमान जागतिक परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील कोविड महामारीच्या काळात औषध कंपन्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. “भारताचा औषध निर्माण उद्योग मजबूत आणि त्वरित प्रतिसाद देणारा आहे. त्यांच्या ताकदीमुळेच आम्ही महामारीच्या काळात केवळ आमची कमी झालेली मागणीच पूर्ण करू शकलो नाही तर 150 देशांना औषधांचा पुरवठा करू शकलो असे ते म्हणाले.” गुणवत्तेत कोणतीही घसरण न करता आणि औषधांच्या किमतीत कोणतीही वाढ न करता हे साध्य झाले, यावर त्यांनी भर दिला.

औषध कंपन्यांना जागतिक पुरवठा साखळीच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. त्यांना एपीआयचे उत्पादन आणि उपलब्धता तसेच कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक औषधांच्या सूत्रीकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले होते. किरकोळ स्तरापर्यंतच्या पुरवठा साखळीमध्ये कोविड औषधांसह सर्व औषधांचा पुरेसा साठा आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यास त्यांना सांगण्यात आले.

औषध कंपन्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या आढावा बैठकीचे स्वागत केले आणि त्यांना सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कोविड औषधांच्या पुरवठा साखळीचे व्यवस्थापन करण्यास सक्षम राहतील असेही त्यांनी आश्वस्त केले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, सचिव (औषध निर्माण) एस अपर्णा, एनपीपीएचे अध्यक्ष कमलेश पंत, डीसीजीआय डॉ व्ही जी सोमाणी आणि औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आढावा बैठकीला उपस्थित होते.

 

* * *

G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887367) Visitor Counter : 189