आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय वैद्यक संस्थेचे डॉक्टर्स आणि प्रतिनिधींसोबत साधला संवाद


कोविड-19 बरोबर दोन हात करण्याच्या कार्यात सहभागी होऊन भीती दूर करण्यासाठी तसेच अफवांचा महापूर रोखण्यासाठी कोविडबद्दल अचूक माहिती पुरवण्याचे केले आवाहन

सावधगिरी बाळगून कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यासोबतच, खात्रीशीर नसलेली माहिती सार्वजनिक न करणेही महत्वाचे

Posted On: 26 DEC 2022 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2022

 

“कोविड-19 संदर्भात सावधगिरी बाळगणे आणि मास्क वापर यासारखे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन याबरोबरच माहितीसंसर्ग रोखणे आणि फक्त योग्य व खात्रीशीर माहितीच शेअर करणे हे महत्वाचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविड19 ला अटकाव आणि व्यवस्थापन याबाबत वेळोवेळी माहिती सार्वजनिक करते. सर्वांना माझी विनंती आहे की प्रमाणित असलेली सत्य माहितीच शेअर करावी आणि इतरांनाही ते करण्यास प्रोत्साहन द्यावे. “ असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी आज देशभरातील 100 डॉक्टर आणि भारतीय वैद्यक संस्था म्हणजे IMA च्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधतांना केलं.

Image

कोविड19 संदर्भातील केवळ सत्य माहिती आणि तथ्येच  सार्वजनिक करावी असे आवाहन मांडविया यांनी डॉक्टर आणि भारतीय वैद्यक संस्था म्हणजे IMA च्या प्रतिनिधींना केले. “ कोविड19 शी देशाच्या लढ्यात आपण सर्व आमचे दूत राहिला आहात. तुमच्या योगदानाची आम्ही यथोचित दखल घेतली आहे, आपल्या निस्वार्थी योगदानाला तसेच आरोग्यव्यावसायिकांच्या सेवेला मी सलाम करतो. कोविड 19 या आजाराच्या विविध पैलूंची माहिती देऊन तसेच त्याला रोखण्याचे आणि व्यवस्थापनाचे उपाय यावर सर्वसामान्यांना शिक्षित करुन गैरमाहितीचा संसर्ग रोखण्यातही आपण  सहभागी आणि आमचे दूत व्हावे अशी माझी विनंती आहे”. या लढ्यात डॉक्टर आतापर्यंत करत आले तसेच  समर्पण भावनेने काम करतील  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Image

विनाकारण अंदाज बांधणे टाळावे आणि लोकांपर्यंत फक्त योग्य तेवढी माहिती पोचवावी अशी विनंती मांडविया यांनी सहभागी मंडळींना केली. आपले नागरीक कोविड योध्यांकडे सल्ला विचारतात आणि जगभरात पुन्हा वाढू लागलेल्या कोविड-19 च्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अफवा , चुकीची माहिती पसरुन परिणामी भीती वाढू नये म्हणून  योग्य माहिती सार्वजनिक करणे ही आपल्या तज्ञांची जबाबदारी आहे, असेही मांडविया म्हणाले.

नागरिकांना देशातील कोविड-19 आजारासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती, लसीकरण कार्यक्रम आणि सरकारचे प्रयत्न यांची माहिती देऊन त्यांच्यात निर्माण झालेली भीती कमी करण्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर दिला. मात्र, आत्मसंतुष्टीच्या विरोधात त्यांनी इशारा दिला. चाचणी-मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड संदर्भातील योग्य वर्तणूक तसेच कोविडचा अधिक धोका असलेल्या गटांसाठी खबरदारीची मात्रा घेतली जाणे या उपाययोजनांचे कठोरतेने पालन करावे अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. “केवळ याच मार्गाने आपण गेल्या काळात सुरु ठेवलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा फायदा मिळवू शकू,” ते म्हणाले.

उद्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रील बाबत माहिती देताना, केंद्रीय मंत्री डॉ.मांडविया यांनी अधिक भर देत सांगितले की, “या महामारीच्या व्यवस्थापनासंदर्भात आमच्या भूतकालीन अनुभवांवरून, आम्ही अनेक उपक्रम हाती घेत आहोत. मॉक ड्रील हा असाच एक उपक्रम उद्या देशभरात आयोजित करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आपली परिचालन विषयक सज्जता समजण्यास मदत होते, यंत्रणेत काही कच्चे दुवे राहून गेले असल्यास त्यांची पूर्तता करता येते आणि परिणामी, आपला सरकारी आरोग्य यंत्रणाविषयक प्रतिसाद अधिक सशक्त होत जातो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी वेळोवेळी बैठका घेऊन दिलेल्या पाठिंब्याबद्दल, कोविड-19 संसर्गाची सुरुवात झाल्यापासून या आजाराविरुद्धच्या आपल्या लढ्यात आघाडीवर असलेल्या डॉक्टर्स आणि तज्ञांनी प्रशंसा केली आहे. कोविड-19 विरुद्धच्या सामूहिक लढ्यात यापुढेही योगदान देण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन, या संदर्भातील सर्व भागधारकांच्या सूचना आणि कल्पना यावर विचारमंथन करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या काही दिवसांत विविध बैठका घेतल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव्ह अग्रवाल, आरोग्य सेवा महासंचालक डॉ.अतुल गोयल, भारतीय आरोग्य संघटनेचे सदस्य, वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि तज्ञ या बैठकीला उपस्थित होते.

 

* * *

R.Aghor/S.Chitnis/V.Sahjrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886752) Visitor Counter : 182