अर्थ मंत्रालय
डीआरआयने दोन छुप्या अंमली पदार्थ निर्मिती केंद्रांवर टाकलेल्या छाप्यामध्ये 50 कोटी रुपये किमतीचे 25 किलो मेफेड्रोन केले जप्त, दोघांना अटक
Posted On:
26 DEC 2022 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील दोन छुप्या मेफेड्रोन निर्मिती केंद्रांवर धाडी टाकून तेथील अंमली पदार्थविषयक जाळे उध्वस्त केले आणि ही केंद्रे चालविणारा आणि त्यासाठी पैसा पुरविणारा मुख्य मनुष्य ताब्यात घेतला. या धाडीत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काळ्या बाजारात 49.77 कोटी रुपयांची किंमत असणारे, वापरास तयार स्वरूपातील 24.885 किलो मेफेड्रोन, या निर्मिती प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले 18.90 रुपये, महत्त्वाचा कच्चा माल, यंत्रे आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त केली.
विशिष्ट गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेगवान तसेच उत्तम प्रकारच्या समन्वयासह 21 डिसेंबर 2022 रोजी ही मोहीम राबविली आणि अंमली पदार्थ निर्मिती करणारी दोन केंद्रे उध्वस्त केली. या दोन्ही ठिकाणी काम करत असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर तात्काळ केलेल्या पाठपुराव्यातून, ही केंद्रे चालविणारा आणि त्यासाठी पैसा पुरविणारा मुख्य मनुष्य 60 लाख रुपयांच्या रोख रकमेसह नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गोरखपूर येथून ताब्यात घेण्यात आला.
अंमली पदार्थ तस्करीविषयक प्रकरणांमधील मुख्य सूत्रधार आणि कारस्थानी तसेच यासाठी पैसा पुरविणारे यांना पकडण्यावर जोर देत, केंद्रीय गृह मंत्री तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही समन्वयीत मोहीम पार पाडण्यात आली.
* * *
R.Aghor/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886741)
Visitor Counter : 180