पंतप्रधान कार्यालय
दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘वीर बाल दिनानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
“वीर बाल दिन हा देशासाठी एक नवी सुरुवात करण्याचा दिवस आहे”
“वीर बाल दिन आपल्याला भारत म्हणजे काय आणि भारताची नेमकी ओळख काय आहे हे सांगतो”
“वीर बाल दिन आपल्याला शीख समाजाच्या दहा गुरूंचे देशाप्रती मोठे योगदान आणि देशाच्या सन्मानाच्या संरक्षणार्थ बलिदान देण्याच्या महान शीख परंपरेचं स्मरण करून देईल”
“शहीदी सप्ताह आणि वीर बाल दिवस म्हणजे केवळ भावनिक प्रसंग नसून आपल्यासाठी अमर्याद प्रेरणेचा स्त्रोत आहे”
“भारतात एकीकडे प्रचंड दहशत आणि टोकाच्या धर्मांध शक्ती होत्या तर त्याचवेळी दुसरीकडे अध्यात्मिकता आणि मानवतेत देव शोधण्याची करुणामय मनोवृत्तीही शिखरावर होती”
“अशा प्रकारचा वैभवशाली इतिहास असणाऱ्या कोणत्याही देशामध्ये आत्मविश्वास तसेच आत्मसन्मान ओसंडून वाहिला पाहिजे मात्र इतिहासाच्या भेसळयुक्त लेखनाने आपल्यात न्यूनगंडाची भावना निर्माण केली.”
“आपली प्रगती साधण्यासाठी भूतकाळाविषयीच्या संकुचित अन्वयार्थाला दूर करण्याची गरज आहे.”
“वीर बाल दिन हा आपल्या पंच प्रणांसाठी एखाद्या प्राणशक्तीप्रमाणे आहे”
“शिखांची गुरु परंपरा म्हणजे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे”
“गुरु गोविंद सिंग जी यांची ‘देश सर्वप्रथम’ ही परंपरा आपल्यासाठी फार मोठी प्रेरणा ठरते आहे”
“विस्मृतीत गेलेल्या वारशाला पुनरुज्जीवित करून नवा भारत मागच्या दशकांत केलेल्या चुका सुधारत आहे”
Posted On:
26 DEC 2022 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘वीर बाल दिनानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी सादर केलेल्या ‘शबद कीर्तन’ या कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहिले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंतप्रधानांनी झेंडा दाखवून, दिल्लीतील सुमारे तीन हजार मुलांनी काढलेल्या संचलन फेरीचा (मार्च पास्ट) देखील शुभारंभ केला.
गुरु गोविंद सिंग जी यांचे पुत्र, साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर हा दिवस यापुढे ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी, गेल्या वर्षी 9 जानेवारी 2022 रोजी गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त केली होती.
आजच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत आज पहिला वीर बाल दिन साजरा करत आहे. हा दिवस म्हणजे देशासाठी एक नवी सुरुवात करण्याचा दिवस आहे. भूतकाळात ज्या बालकांनी देशासाठी आत्मसमर्पण केले त्यांच्या सन्मानार्थ या दिवशी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. “शहीदी सप्ताह आणि वीर बाल दिवस म्हणजे केवळ एक भावनिक प्रसंग नसून तो आपल्या सर्वांसाठी अमर्याद प्रेरणेचा स्त्रोत आहे,” पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आत्यंतिक शौर्य आणि आत्मसमर्पणाची वेळ येते तेव्हा वय हा मुद्दा महत्त्वाचा नसतो याची आठवण हा वीर बाल दिन आपल्याला करून देईल. हा दिवस आपल्याला शीख पंथाच्या दहा गुरूंनी देशासाठी प्रचंड योगदान आणि देशाच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी आत्मार्पण करण्याच्या शीख परंपरेची आठवण करून देईल. “वीर बाल दिन आपल्याला भारत म्हणजे काय आणि भारताची नेमकी ओळख काय आहे हे सांगेल आणि प्रत्येक वर्षी हा दिवस आपल्याला आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची ओळख करून घेण्यासाठी प्रेरित करेल. हा दिवस आपल्या युवा पिढीच्या सामर्थ्याची प्रत्येकाला जाणीव करून देईल,” ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी वीर साहिबजादे, गुरु आणि माता गुर्जरी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली. “26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा करण्याची संधी मिळणे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे असे मी समजतो,” पंतप्रधान म्हणाले.
हजारो वर्षांचा जागतिक इतिहास भीषण क्रौर्याच्या प्रसंगांनी भरलेला आहे याकडे पंतप्रधानांनी निर्देश केला. जेव्हा जेव्हा आपल्याला हिंसक क्रौर्याला तोंड द्यावे लागले तेव्हा आपल्या शूरवीरांच्या चारित्र्याने त्यांच्यावर मात केली आहे हे इतिहासाच्या पानांतून दिसून आले आहे हे त्यांनी नमूद केले. चमकौर आणि सिरहिंदच्या लढायांमध्ये जे घडले ते कोणीही विसरू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले. या घटना केवळ तीन शतकांपूर्वी या भूमीवर घडल्या अशी माहिती त्यांनी पुढे दिली. “एकीकडे धर्मांधतेच्या वेडाने झपाटलेली शक्तिशाली मुघल सल्तनत होती तर दुसरीकडे ज्ञानाच्या तेजाने चमकणारे आणि भारताच्या प्राचीन तत्त्वांनुसार जीवन व्यतीत करणारे गुरु होते,” पंतप्रधान सांगत होते. ते म्हणाले, “एकीकडे पराकोटीची दहशत आणि धर्मांध शक्ती होत्या तर त्याचवेळी दुसरीकडे अध्यात्मिकता आणि प्रत्येक मनुष्यामध्ये देव बघण्याची करुणामय मनोवृत्तीही भारतात होती.” अशा सर्व परिस्थितीत, मुगलांकडे लाखो सैनिकांचे सैन्य होते तर गुरूंच्या साहिबजाद्यांकडे अमाप धैर्य होते. ते एकटे असूनही मुगलांसमोर त्यांनी मान तुकविली नाही. अशा वेळी मुगलांनी त्यांना जिवंतपणी भिंतीत चिणले. या शूर वीरांचे धैर्य अनेक शतके आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत बनून राहिले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “अशा प्रकारचा वैभवशाली इतिहास असणाऱ्या कोणत्याही देशामध्ये आत्मविश्वास तसेच आत्मसन्मान ओसंडून वाहिला पाहिजे. मात्र इतिहासाच्या नावावर आपल्याला जे ‘भेसळयुक्त नेरेटीव्ह’ सांगितलं गेलं आणि संपूर्ण देशात भारतीयत्वाबद्दल न्यूनगंडाची भावना निर्माण केली,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असे असूनही, या स्थानिक परंपरा आणि समाजाने शौर्याचे वैभव जिवंत ठेवले असे ते म्हणाले. प्रगती करण्यासाठी भूतकाळात झालेल्या या इतिहासाच्या संकुचित अन्वयार्थापासून दूर जाण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. आणि म्हणूनच या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेचे सर्व अंश निपटून काढण्याची शपथ घेतली आहे असे ते म्हणाले. “वीर बाल दिन हा आपल्या पंच निर्धारांसाठी एखाद्या प्राणशक्तीप्रमाणे आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
युवाशक्ती जुलूम सहन करणार नाही आणि देशाचे धैर्यरक्षण करण्यास सदैव तयार राहील, हे दाखवून देणे हेच औरंगजेब आणि त्याच्या लोकांचा जुलूमावर वीर साहिबजादे यांनी दाखवलेल्या निर्धार आणि शौर्याचे महत्व आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला यावरुन देशाचे भवितव्य ठरवण्यात तरुण पिढीची भूमिका महत्वाची असल्याचे सिदध होते, असं सांगत आजची युवा पिढीही याच निर्धाराने देशाला पुढे नेत आहे. यामुळेच 26 डिसेंबरच्या वीर बाल दिवसाचे महत्व अधोरेखित होती असे पंतप्रधान म्हणाले.
शिख गुरु परंपरेला अभिवादन करत पंतप्रधान म्हणाले, ही फक्त अध्यात्म व त्यागाची परंपरा नाही तर ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा प्रेरणास्रोत आहे. श्री गुरु ग्रंथसाहिबमधील विश्वबंधुता आणि सर्वसमावेशकता यांचे महत्वाचे उदाहरण म्हणजे त्यामध्ये भारतभरातील संतांची शिकवण आणि वाणी यांचा समावेश केला आहे. गुरु गोविंदसिंगजी यांची जीवनप्रवाससुद्धा याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या प्रत्येक भागातून पंच प्यारे आले आहेत या सत्याचा उल्लेख करत पंतप्रधानानी या मूळ पंच प्यारेंपैकी एक जण द्वारकेतून आले होता तीच भूमी आपला वारसा आहे याबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
राष्ट्र प्रथम या ठरावामागे गुरु गोविंदसिंगजींचा ठाम निर्धार होता असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या कुटुंबाचा व्यक्तिगत स्तरावरील सर्वोच्च त्याग सांगत पंतप्रधानांनी आपल्या म्हणण्याची पुष्टी केली. राष्ट्र प्रथम ही परंपरा आपल्यासाठी मोठीच प्रेरणा आहे यावरही पंतप्रधानांनी भर दिला. या प्रेरणास्रोतावर भारताच्या भावी पिढ्यांचे भवितव्य अवलंबून असेल असेही मोदी म्हणाले. भरत, भक्त प्रल्हाद, नचिकेता आणि ध्रुव, बलराम, लवकुश आणि बाळकृष्ण यांसारख्या प्रेरणादायी बालकांची उदाहरणे देत पंतप्रधान म्हणाले की प्राचीन काळापासून ते आधुनिक कालापर्यंत धैर्यशील मुले व मुली भारताच्या शौर्याची प्रचिती देतात.
नवीन भारत गेल्या काही दशकांपासूनच्या चुका सुधारत आपल्या खूप वर्षांपूर्वीपासून गमावत चाललेल्या परंपरेची पुनर्स्थापना करत आहे. कोणताही देश त्याच्या मूलभूत तत्वांमुळे ओळखला जातो असे सांगत पंतप्रधानांनी जेव्हा देशाची मूळ मूल्ये बदलत असतात तेव्हा देशाचे भवितव्य कालानुरुप आकार घेते असे प्रतिपादन केले. या भूमीच्या इतिहासाबद्दल स्पष्टता असणारी तरुण पिढी असेल तरच ही मूल्ये जतन करता येतात यावर त्यांनी भर दिला.
प्रेरणा आणि शिक्षण यासाठी युवापिढी नेहमीच रोल मॉडेलच्या शोधात असते म्हणूनच आपण भगवान रामाच्या आदर्शांवर विश्वास ठेवतो, भगवान बुद्धांपासून आणि भगवान महावीरांपासून प्रेरणा घेतो, आणि गुरु नानकजीच्या वचनानुसार आयुष्य व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो, याशिवाय महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी यांच्या जीवनमार्गाचा अभ्यास करतो, असे पंतप्रधान म्हणाले. धर्म आणि आध्यात्मिकता यावर विश्वास ठेवणाऱ्या भारताच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा महत्वपूर्ण उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, या आपल्या भूमीच्या पूर्वजांनी सण आणि श्रद्धा यांनी समृद्ध असलेल्या भारतीय परंपरेला आकार दिला. ती जाणीव शाश्वत ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच देश स्वातंत्र्यलढयाचा तेजस्वी इतिहास आजादी का अमृतमहोत्सवातून पुनरुज्जीवित करत आहे. धैर्यवान पुरुष आणि स्त्रिया तसेच आदिवासी समाजाचा यातला सहभाग प्रत्येकाला कळावा यावर काम सुरु आहे. वीर बाल दिवस या निमित्त आयोजित सर्व स्पर्धा आणि कार्यक्रमात देशाच्या प्रत्येक भागातून आलेल्या भव्य प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला. वीर साहिबजादेंच्या जीवनातील संदेश जागापुढे निर्धारपूर्वक मांडण्याच्या आवश्यकतेचा त्यांनी पुनरु्च्चार केला.
यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हरदीपसिंग पूरी, अर्जून राम मेघवाल, मीनाक्षी लेखी हे केंद्रीय मंत्री व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
सरकारतर्फे एक संवाद आणि सर्वसहभागाला वाव देणारा कार्यक्रम सर्व देशभरात आयोजिक केला आहे. साहिबजादेंच्या अनुकरणीय धैर्याची कथा आणि त्यााबाबत सर्व नागरिक विशेषतः लहान मुलांना याबद्द्ल माहिती व्हावी हा यामागील हेतू. या उपक्रमात निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूूषा अशा अनेक कार्यक्रमांचे देशभरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजन केले जाणार आहे. रेल्वे स्थानके, पेट्रोलपंप, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी डिजिटल प्रदर्शने भरवली जातील. सर्व देशभरात मान्यवरांकडून साहेबजादेंच्या जीवनाबद्दल आणि त्यागाबद्दल कथा सांगितल्या जातील.
* * *
R.Aghor/S.Chitnis/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886712)
Visitor Counter : 371
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam