गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मेहसाणा, गुजरात येथील श्री गोवर्धननाथजी मंदिराला दिली भेट; मंदिर परिसरात विविध कामांची शाह यांच्या हस्ते पायाभरणी
मेहसाणा येथील शेठ जी सी हायस्कूलला 95 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अमित शहा यांनी केले संबोधित.
“2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले, या नवीन धोरणामुळे पुढील 25 वर्षात भारताला जगात अव्वल स्थान प्राप्त होण्यास मदत होईल.”
“नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5+3+3 आणि 4 वर्षांची शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली असून ही रचना 10 वर्षांत संपूर्ण देशात लागू केली जाईल.”-अमित शाह
Posted On:
24 DEC 2022 8:16PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील मेहसाणा इथल्या गोवर्धननाथ जी मंदिराला भेट दिली आणि मंदिर परिसरात विविध कामांची पायाभरणी केली.
शेठ जी.सी., हायस्कूल, पिलवाई, मेहसाणा या शाळेला 95 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातही अमित शाह सहभागी झाले होते. शाह यांनी गांधीनगरच्या महुडी जैन मंदिरालाही भेट दिली.
शेठ जी.सी. हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताला येत्या 25 वर्षात जगात अव्वल स्थान गाठण्यास मदत होईल.
नवीन शैक्षणिक धोरणात, शिक्षणव्यवस्थेशी संबंधित अनेक मूलभूत बदलांचा समावेश करण्यात आला आहे, असे अमित शाह म्हणाले.विद्यार्थ्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, अशी व्यवस्थाही या धोरणात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले . यासोबतच तांत्रिक, वैद्यकीय आणि इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांचे भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्याचे कामही सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले. मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या सत्रातील अनेक पुस्तकांचे हिंदीत भाषांतर केल्यानंतर आता गुजराती, तेलगू, पंजाबी, ओडिया आणि बंगालीसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय आणि इतर तांत्रिक उच्च शिक्षण सुरू केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
जोपर्यंत देशातील नागरिक शिक्षित होत नाही आणि आपल्या मातृभाषेत त्यांचे विचार विकसित होत नाही, तोपर्यंत ते स्वत:चा आणि देशाचा आदर करू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. नव्या शैक्षणिक धोरणात 5+3+3 आणि 4 वर्षांची शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली असून 10 वर्षांत संपूर्ण देशात ही रचना लागू केली जाईल, अशी महितीही त्यांनी दिली. यासोबतच, प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी 360 अंशांचे सर्वांगीण प्रगती पुस्तक कार्यक्रमही विकसित करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणात व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाला मोठा वाव देण्यात आला आहे. असे सांगत, हे नवीन शिक्षण 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वीच त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाशी जोडून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात मदत करेल, असे ते म्हणाले. या शैक्षणिक धोरणात सहावी ते आठवीपर्यंत दहा दिवस दप्तर विरहित तास असा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे, असे शाह म्हणाले.
हे धोरण कितीही चांगले असले, तरी केवळ सरकार या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करू शकत नाही, तर शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्यांची त्याच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका असेल, असेही ते म्हणाले. केवळ स्वतःसाठी कष्ट करण्यासोबतच इतरांसाठी, देशासाठी आणि समाजासाठीही काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
***
S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886401)
Visitor Counter : 174