आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक पातळीवर कोविड- 19 च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि लसीकरण प्रगतीचा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह घेतला आढावा


कोविड- 19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सज्जता ठेवण्याचा आणि सतर्क राहण्याचा राज्यांना दिला सल्ला

यापूर्वी कोविड- 19 चा उद्रेक झाला त्या काळात केल्याप्रमाणे केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे: डॉ. मनसुख मांडविया

“कोविड व्यवस्थापनासाठी चाचणी-माग -उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तनाचे पालन करणे ही रणनीती कायम ठेवणार”

राज्यांना देखरेख यंत्रणा मजबूत करण्याचा दिला सल्ला; चाचण्या वाढवा आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची सज्जता ठेवा

Posted On: 23 DEC 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022

केंद्र आणि राज्यांनी कोविड19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी आधीप्रमाणे एकत्रितपणे आणि सहयोगी भावनेने काम करणे आवश्यक आहे,असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केले. राज्यांचे आरोग्य मंत्री , प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिव आणि माहिती आयुक्त यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य)  डॉ व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत ही आभासी बैठक झाली. चीन, जपान, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये अलीकडेच वाढलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहीम प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री  डॉ माणिक साहा,  जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राजस्थानचे  आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा , उत्तराखंडचे आरोग्य मंत्री धन सिंह रावत, आसामचे आरोग्य मंत्री केशब महंता, कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर, झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता , मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी, पंजाबचे आरोग्य मंत्री एस चेतन सिंह जौरामाजरा, छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव, मणिपूरचे आरोग्य मंत्री सपम रंजन सिंग, हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री थिरू मा सुब्रमण्यम, आंध्र प्रदेशच्या आरोग्य मंत्री विदादला रजनी, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज, पश्चिम बंगालच्या आरोग्य मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या उच्चस्तरीय आढावा बैठकीत सहभागी  झाले.

काल झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांना दिलेला सतर्क राहण्याचा आणि कोविड19च्या व्यवस्थापनासाठी सर्व तयारी ठेवण्याचा दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ मांडवीय यांनी दिला. राज्यांना खबरदारीचा  आणि सक्रिय दृष्टीकोन ठेवण्याची विनंती त्यांनी केली. देशात एखाद्या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला तर त्याबाबत वेळीच कळावे यासाठी  भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) नेटवर्कद्वारे  पॉझिटिव्ह रूग्णांच्या नमुन्यांचा संपूर्ण जीनोम अनुक्रमासाठी देखरेख प्रणाली बळकट  करण्याचे त्यांनी राज्यांना आवाहन केले. आरोग्य सुविधा आधारित सेंटायल सर्वेलन्स(रोग असल्याच्या निर्देशांकांवर देखरेख ) पॅन-रेस्पीरेटरी व्हायरस देखरेख, समुदाय-आधारित देखरेख सांडपाणी देखरेख यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सामुहिकपणे प्रणालीला पुनरुज्जीवित करण्याच्या तसेच आत्मसंतुष्टता आणि कमकुवता  दूर करण्याच्या गरजेवर त्यांनी प्रकाश टाकला.

कोविड व्हेरियंट नवा असला तरी कोविड व्यवस्थापनासाठी चाचणी-माग -उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तनाचे पालन करणे ही  कसोटीवर उतरलेली रणनीती कायम ठेवणार असल्याचे डॉ. मांडवीया यांनी सांगितले. यामुळे योग्य सार्वजनिक उपाययोजना हाती घेणे शक्य होईल.  22 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात प्रति दशलक्ष 79 इतक्या कोविड चाचण्यांच्या सध्याच्या दरावरून, चाचण्यांचा दर त्वरेने वाढवण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली. या चाचण्यांमध्ये आरटी- पीसीआर(RT-PCR) चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सर्व पात्र लोकसंख्येचे, विशेषत: वृद्ध आणि असुरक्षित लोकसंख्येचे लसीकरण वाढवण्याचा सल्ला दिला. वस्तुस्थितीनुसार योग्य माहितीचा प्रसार सुनिश्चित करून, चुकीची माहिती पसरू नये यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कोविड प्रतिबंधासाठी  सुयोग्य वर्तनाचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या मोहिमांवर भर दिला.डॉ. मांडविया यांनी सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना वैयक्तिकपणे सर्व पायाभूत सुविधांच्या तयारीचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करण्याची विनंती केली आहे आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जागतिक कोविड -19 परिस्थिती आणि देशांतर्गत परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून 2022 मध्ये "कोविड-19 च्या संदर्भात "काटेकोरपणे  लक्ष ठेवण्याच्या कार्यवाहीची  मार्गदर्शक तत्त्वे" जारी केली आहेत; ज्यात नवीन सार्स-कोव्ह-2,(SARS-CoV-2) प्रकारातील संशयित आणि संसर्ग झालेल्या रुग्णांचा लवकर शोध घेणे,विलगीकरण, चाचण्या आणि वेळेवर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे,हे सांगितले होते याचे स्मरण करून देण्यात आले.  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची विनंती केली.रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासह कोविड व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर व्यापक आणि तपशीलवार चर्चा झाली; 

माननीय पंतप्रधान,केंद्रीय आरोग्य मंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली सुयोग्य वेळेवर झालेल्या  आढावा बैठकीबद्दल  सर्व राज्यांनी समाधान व्यक्त केले.   कोविड-19 च्या प्रभावी प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी ते केंद्रासोबत काम करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ते दक्ष आहेतच आणि सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.काही  राज्यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या तयारीसाठी दक्षतेची तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्याचे आश्वासनही  दिले.

या बैठकीला डॉ. मनोहर अग्नानी, अतिरिक्त सचिव  (आरोग्य मंत्रालय),  लव अग्रवाल, अतिरिक्त सचिव  (आरोग्य मंत्रालय),  मनदीप भंडारी, संयुक्त सचिव (आरोग्य मंत्रालय), डॉ. अतुल गोयल, डीजीएचएस आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हे देखील उपस्थित होते.

 

 

 

 

 

S.Kakade/Prajna/Sampada/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886146) Visitor Counter : 222