निती आयोग

एटीएल मॅरेथॉन 2022-23 साठी मागवण्यात आले अर्ज

Posted On: 19 DEC 2022 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अर्थात अटल नवोन्मेष अभियानाने  (एआयएम) अटल टिंकरिंग प्रयोगशाळा कार्यक्रमाअंतर्गत,  ‘एटीएल मॅरेथॉन 2022-23’ या महत्त्वाच्या अभिनव संशोधन विषयक स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

‘एटीएल मॅरेथॉन’ ही भारतभरातील युवा संशोधकांसाठी सुरु करण्यात आलेली राष्ट्रीय पातळीवरील नवोन्मेष स्पर्धा आहे. या स्पर्धेतील स्पर्धक त्यांना योग्य वाटेल त्या  सामाजिक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी, वर्किंग प्रोटोटाईप किंवा किमान व्यवहार्य उत्पादनाच्या (एमव्हीपी) स्वरूपातील अभिनव उपाय शोधून काढू शकतात. 

भारताकडील जी-20 समूहाचे अध्यक्षपद ही यावर्षीच्या एटीएल मॅरेथॉनची संकल्पना आहे. जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यावर्षी भारताकडे असल्यामुळे, अटल नवोन्मेष अभियानाने यावर्षी स्पर्धेसाठी, संबंधित लक्षित क्षेत्रांमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या समस्यांवर जी-20 समूहाच्या कार्यकारी गटाने दिलेल्या प्रोत्साहनपर शिफारसींवर आधारित प्रश्नावली तयार केली आहे.

विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या जागतिक प्रश्नांवरील उत्तरे शोधून केवळ अधिक उत्तम भारत उभारणीच्या दृष्टीनेच नव्हे तर अधिक उत्तम विश्वासाठी अभिनव संशोधन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी प्रचंड संधी निर्माण करणे ही यामागची संकल्पना आहे.

यावर्षीच्या स्पर्धेत, विहित संकल्पनांखेरीज इतर क्षेत्रांवर आधारित प्रकल्प सादर करण्याचा पर्याय देखील विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांतील समस्यांशिवाय स्थानिक पातळीवरील इतर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी देखील उपाय सुचविता येतील. 

एटीएल मॅरेथॉन 2022-23 या स्पर्धेतील उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा देखील वापर करता येणार आहे. या स्पर्धेची माहिती स्पर्धकांना इंग्रजी तसेच हिंदी भाषेतून देण्यात येईल आणि त्यांना त्यांच्या प्रवेशिका देखील या दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून सादर करता येतील. 

 या स्पर्धेतील विजेत्या संघांना विद्यार्थी नवोन्मेष कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील प्रमुख कॉर्पोरेट संस्था तसेच इनक्युबेशन केंद्रांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. तसेच या विजेत्यांना नीती आयोगाच्या एआयएम कडून प्रमाणपत्रे आणि इतर अनेक आकर्षक संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

स्पर्धेची सुरुवात करून देताना, एआयएमचे अभियान संचालक डॉ.चिंतन वैष्णव म्हणाले, आपणा सर्वांसाठी हा अत्यंत उत्साहवर्धक क्षण आहे. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा यासाठी त्यांनी उत्तेजन देखील दिले.

 एटीएल मॅरेथॉन 2023 स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याचा प्रवास

 खालील क्षेत्रांतील समस्यांवर विद्यार्थ्यांना उपाययोजना सुचवायच्या आहेत:

1.  शिक्षण

2.  आरोग्य

3.  कृषी

4.  पर्यावरण आणि हवामान शाश्वतता

5.  विकास

6.  डिजिटल अर्थव्यवस्था

7.  पर्यटन

8.  इतर (तुम्ही स्वतःची समस्या मांडून त्यावर उपाययोजना सुचवू शकता)

या स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://innovateindia.mygov.in/atl-marathon-2022/

  

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884870) Visitor Counter : 189