आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाने(एनबीईएमएस) आयोजित केलेल्या सायक्लॉथॉनमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांचा सहभाग
Posted On:
19 DEC 2022 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022
राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाने(एनबीईएमएस) नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या सायक्लॉथॉनमध्ये आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सहभागी झाले. ‘पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा’ ही संकल्पना असलेल्या या सायकल रॅलीचा प्रारंभ निर्माण भवन येथून झाला आणि कर्तव्य पथावरून या रॅलीने प्रवास केला. हिवाळ्यात पहाटेला आयोजित केलेल्या सायकल रॅलीत अनेक जण उत्साहाने सहभागी झाले. भौतिक व्यायामप्रकारांच्या मदतीने आरोग्यदायी वर्तनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायकलिंगविषयी विशेष जिव्हाळा असल्याने ‘ हरित खासदार’ म्हणून ओळखले जाणाऱ्या मनसुख मांडविया यांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी लोकांनी सायकलचा वापर करावा असे आवाहन केले. थंडीच्या काळात पहाटेपासून या जागरुकता रॅलीत उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व सहभागींचे कौतुक केले. कोणतेही प्रदूषण न करणारे वाहन असल्यामुळे सायकल पर्यावरणीय समस्या कमी करण्यात मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. अनेक विकसित देशांमध्ये सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे तर भारतात सायकल म्हणजे गरिबांचे वाहन म्हणून ओळखले जाते, आपल्याला ही ओळख बदलून श्रीमंतांचे वाहन अशी ओळख निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. फॅशनमधून पॅशन म्हणजे आधुनिक शैलीमधून आपल्या आवडीची जोपासना करण्याची गरज आहे. हरित पृथ्वी आणि निरोगी पृथ्वीसाठी चला आपण सर्वांनी सायकलिंग हा आपल्या जीवनाचा एक भाग बनवुया, असे आवाहन त्यांनी केले. सायकलिंग आणि भौतिक व्यायामप्रकारांचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. मांडविया म्हणाले की शारीरिक फायद्यांबरोबरच मानसिक फायद्यांसाठी आपल्या आयुष्यात व्यायामाचा समावेश केला पाहिजे. शारीरिक हालचालींच्या व्यायामांमुळे अनेक बिगर संसर्गजन्य आणि जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना दूर ठेवता येते, असे त्यांनी सांगितले. या ‘गो ग्रीन’ उपक्रमाबद्दल आणि आरोग्याबाबत जागरुकता आणि पर्यावरण रक्षणाबाबत सक्रिय पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी एनबीईएमएसची प्रशंसा केली. हा कार्यक्रम येथे पाहता येईल. https://www.youtube.com/watch?v=SgxvYc7i2WI
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884791)
Visitor Counter : 207