गृह मंत्रालय

ईशान्य भारत परिषदेच्या शिलाँग इथे झालेल्या सुवर्ण महोत्सवी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती

Posted On: 18 DEC 2022 5:30PM by PIB Mumbai

 

मेघालयची राजधानी शिलाँग इथे आज ईशान्य भारत परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले होते. याप्रसंगी मेघालयचे राज्यपाल, राज्यपाल ब्रिगेडियर (डॉ) बी.डी. मिश्रा, मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्यासह ईशान्येकडील राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईशान्य भारत परिषदेच्या (एनईसी) नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी ईशान्य भारत परिषदेच्या गेल्या 50 वर्षांच्या कामांची प्रशंसा केली, तसेच, येत्या 25 वर्षात ईशान्येच्या विकासाच्या सर्व पैलूविषयी ब्लू प्रिंट तयार करण्याचे आणि एक उद्दिष्ट निश्चित करुन, त्यानुसार कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत, असं गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य प्रदेश शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे, असं शाह म्हणाले.

याआधी, ईशान्य भारताला दिलेला निधी तळागाळापर्यंत पोहोचत नव्हता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हा निधी गावोगावी पोहोचून विकासासाठी वापरला जात आहे, हे एक मोठे यश आहे, असंही शाह म्हणाले.पंतप्रधानांनी नेहमीच ईशान्येला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधानांनी गेल्या 8 वर्षांत 50 हून अधिक वेळा ईशान्येला भेट दिली आहे, तर केंद्रीय मंत्र्यांनीही 400 हून अधिक वेळा ईशान्य भारताचे दौरे केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या खंबीर नेतृत्वामुळे ईशान्य प्रदेश आता सर्व वादविवादांपासून मुक्त झाला आहे आणि या भागात शांतता प्रस्थापित झाली आहे, असे अमित शाह म्हणाले.

ईशान्य भारत विकास परिषद आणि ईशान्येकडील राज्यांचे मुख्यमंत्री या प्रदेशाचा विकास करण्यासाठी आणि विकसित, शांततापूर्ण, रोजगार निर्मिती करण्यात मदत करण्यासाठी तसेच पंतप्रधान मोदींनी एनईसीसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील, ज्यामुळे, देशाच्या इतर प्रदेशांप्रमाणे समृद्ध ईशान्य प्रदेश विकसित होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1884581) Visitor Counter : 134