आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत आत्तापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदींचे डिजीटायझेशन तसेच या नोंदींची  नागरीकांच्या आयुष्मान भारत आरोग्य खात्याशी जोडणीही पूर्ण


नागरिकांना कोणत्याही वेळी आपल्या डिजीटाईज वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी पाहणे त्यांचे सुलभतेने  व्यवस्थापन करणे  होणार शक्य, तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत प्रत्यक्ष कागदपत्राविना डिजिटल वैद्यकीय सेवाही मिळवता येणार

Posted On: 17 DEC 2022 4:52PM by PIB Mumbai

 

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) या मुख्य योजनेअंतर्गत देशासाठी सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारण्याचे काम सातत्यपूर्णरितीने पुढे जात आहे. आत्तापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त नागरिकांचे डिजीटाईज केलेले आरोग्यविषयक तपशील, त्यांच्या आयुष्मान भारत आरोग्य खात्याशी (आभा) जोडले गेले आहेत. हा या योजनेच्या यशातला महत्वाचा टप्पा आहे. आत्तापर्यंत 29 कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी त्यांचे आयुष्मान भारत आरोग्य खाते तयार केले आहे.

नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी त्यांच्या आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी डिजिटल पद्धतीने जोडले गेल्यामुळे, आता  नागरिकांना त्यांची सोय आणि आवश्यकतेनुसार या नोंदी आणि तपशील सहज उपलब्ध होऊ शकतात, तसेच या नोंदींचे सुलभतेने  व्यवस्थापन करणेही त्यांना शक्य होणार आहे. इतकेच नाही तर नागरीकांना विविध आरोग्य सेवा पुरवठादारांकडून, स्वतःच्या आरोग्यविषयक घडामोडींचा परीपूर्ण वैद्यकीय इतिहास तयार करून घेणे, यामुळे वेळोवेळी त्यांच्यासाठी वैद्यकीय उपचारविषयक नेमके निर्णय घेणेही सुलभ होऊ शकणार आहे. यासोबतच, आता नागरिकाना त्यांच्या वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आरोग्य सेवा पुरवठादारांना डिजीटल पद्धतीने देणेही शक्य होणार आहे.

आरोग्य नोंदींच्या डिजिटायझेशन करण्याच्या प्रक्रियेत आयुष्मान भारत डिजिटल मिशनची नेमकी काय भूमिका आहे, याबद्दल राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी अधिक माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ही आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. या नात्यानेच, जास्तीत जास्त नागरिकांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेता यावा याकरता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण विविध भागधारकांसोबत प्रत्यक्षात काम करत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने रुग्णालये, दवाखाने, रोगनिदान प्रयोगशाळा अशा आरोग्य सुविधांकरता प्रोत्साहन योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषक डिजिटल नोंदीचा संग्रह आणि व्यवस्थापनासाठी अनेकविध पर्याय उपलब्ध व्हावेत याकरता वेगवेगळे आरोग्यविषयक डिजीटल लॉकर भारत डिजिटल मिशनसोबत जोडले जावेत, यासाठीही राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण प्रयत्नशील असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

शर्मा यांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आरोग्यविषयक नोंदींच्या डिजिटलायझेशनवर लक्ष केंद्रित केले आहे, आणि यातून प्रत्यक्ष  कागदपत्र विरहीत  वैद्यकीय सल्लामसलत यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आम्हाला साध्य करायचे आहे. यामुळे रुग्ण आणि आरोग्य सेवा पुरवठादारांमध्ये अधिक अचूकता असलेल्या सल्ला आणि माहितीचे आदानप्रदान शक्य होईल असे शर्मा म्हणाले.

नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी त्यांच्या आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी डिजिटल पद्धतीने जोडण्याची ही प्रक्रिया राज्य सरकारांच्या मदतीने देशभरातील विविध आरोग्यविषयक सुविधा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्यविषयक नोंदी त्यांच्या आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यात आंध्र प्रदेश सरकार, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गतची प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच) योजना, ई-रुग्णालये आणि कोविन अशा इतर यंत्रणांचेही मोठे योगदान असल्याचे शर्मा यांनी अधोरेखीत केले.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884415) Visitor Counter : 240