ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

शिलाँग येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार


'एनईसी'च्या अधिकृत बैठकीला व जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करणार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), शिलाँग, एनईसीचे प्रकल्प व मेघालय राज्याच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार 

कार्यक्रमादरम्यान मेघालयातील 4जी टॉवर्सचे लोकार्पण होणार

गेल्या 50 वर्षांत ईशान्य क्षेत्राच्या विकासामधील एनईसी च्या योगदानाचा आढावा घेणाऱ्या “द गोल्डन फूटप्रिंट्स”, या स्मरण पुस्तिकेचे प्रकाशन होणार

केंद्रीय गृहमंत्री, ईशान्य क्षेत्राचे विभागीय मंत्री, ईशान्येकडील राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, ईशान्य क्षेत्रातील केंद्रीय मंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार 

Posted On: 17 DEC 2022 1:37PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबर 2022 रोजी शिलाँग येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल (एनईसी), अर्थात ईशान्य भारत परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते 'एनईसी'च्या अधिकृत बैठकीला व जाहीर सभेला संबोधित करतील.

परिषदेची अधिकृत बैठक स्टेट कन्व्हेन्शन सेंटर ऑडिटोरियममध्ये होणार असून, जाहीर सभा शिलाँगमधील पोलो ग्राऊंडवर होणार आहे.

केंद्रीय गृह मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विभागीय मंत्री, ईशान्येकडील राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, ईशान्य क्षेत्रातील केंद्रीय मंत्री, स्थानिक खासदार व आमदार तसेच एनईसीचे नामनिर्देशित सभासद या सोहळ्याला उपस्थित राहतील.

राज्यांचे मुख्य सचिव, केंद्रीय मंत्रालयांचे निवडक सचिव, ईशान्येकडील राज्यांमधील वरिष्ठ अधिकारी आणि एनईसीच्या सहयोगाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठित संस्थांच्या प्रमुखांनाही या समारंभाला आमंत्रित करण्यात आले आहे.

यावेळी होणार्‍या जाहीर सभेला, स्थानिक जनतेव्यतिरिक्त, प्रतिष्ठित नागरिक, विशेष कामगिरी करणारे नागरिक, बचत गटांचे प्रतिनिधी, ईशान्येकडील आठही राज्यांमधले शेतकरी गट देखील उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेला 10,000 लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

'नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल' (एनईसी)ची स्थापना 1971 मध्ये संसदेमधील कायद्याद्वारे करण्यात आली. त्याचे औपचारिक उद्घाटन 7 नोव्हेंबर 1972 रोजी शिलाँग येथे झाले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये त्याला 50 वर्षे पूर्ण झाली.

एनईसीच्या कार्यकाळातील हा महत्त्वाचा टप्पा दिमाखदार सोहळ्याने साजरा केला जाईल, असा निर्णय ऑक्टोबर 2022 मध्ये गुवाहाटी येथे केंद्रीय गृहमंत्री आणि एनईसीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 70व्या वर्षपूर्ती बैठकीदरम्यान, घेण्यात आला. त्यानुसार, एनईसीचा सुवर्णमहोत्सवी सोहळा 18 डिसेंबर 2022 रोजी शिलाँग येथे साजरा होत आहे.

कार्यक्रमाच्या दिवशी पंतप्रधान ईशान्य क्षेत्रातील विविध महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), शिलाँग, एनईसी चे प्रकल्प आणि मेघालय राज्यातील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान यावेळी काही अन्य प्रकल्पांची पायाभरणीही करतील, तसेच मेघालयमधील 4जी टॉवर्सचे लोकार्पण करतील. 

या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात, गेल्या 50 वर्षांत ईशान्य क्षेत्राच्या विकासामधील एनईसीच्या योगदानाचा आढावा घेणाऱ्या द गोल्डन फूटप्रिंट्स, या स्मरण पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे. 

या पुस्तिकेतील माहिती, परिषदेच्या अभिलेखागारातून आणि परिषदेच्या आठ सदस्य राज्यांच्या अधिकृत नोंदींमधून गोळा करण्यात आली आहे. तसेच अलीकडच्या काळात एनईसीच्या सहाय्याने पूर्ण झालेल्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि विकास कामांचे तपशील देखील यात टिपण्यात आले आहेत.

या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यामुळे एनईसीला आगामी काळात आणखी चांगले काम करण्यासाठी आणि गेल्या पाच दशकांमध्ये ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रभावीपणे राबवलेल्या विकास उपक्रमांना यापुढे अधिक चालना देण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

***

S.Pophale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884374) Visitor Counter : 163