पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला केले संबोधित
श्री अरबिंदो यांच्या सन्मानार्थ स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी
"श्री अरबिंदो, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या जीवनातील 1893 हे एक महत्त्वाचे वर्ष होते"
"प्रेरणा आणि कृती यांच्या मिलाफातून अशक्यप्राय ध्येयदेखील निश्चितपणे होते साध्य "
"श्री अरबिंदोचे जीवन म्हणजे 'एक भारत श्रेष्ठ भारत' चे प्रतिबिंब होय.
"आपल्या संस्कृती आणि परंपरांद्वारे भारत हा देशाला कसा जोडून ठेवतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे काशी तमिळ संगम"
"आम्ही 'भारत प्रथम' या मंत्राने काम करत आहोत आणि आमचा वारसा संपूर्ण जगासमोर अभिमानाने ठेवत आहोत"
"भारत हा मानवी सभ्यतेचा सर्वात सुसंस्कृत विचार आहे, मानवतेचा सर्वात नैसर्गिक आवाज आहे"
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2022 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत पुद्दुचेरीच्या कंबन कलाई संगम येथे आज श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी श्री अरबिंदो यांच्या सन्मानार्थ एक स्मृती नाणे आणि टपाल तिकीटही जारी केले.
संमेलनाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी श्री अरबिंदो यांच्या वर्षभर उत्साहात साजऱ्या होणाऱ्या 150 व्या जयंती वर्षाचे महत्त्व अधोरेखित केले. स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी करून राष्ट्र श्री अरबिंदो यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशाच्या अशा प्रयत्नांमुळे भारताच्या संकल्पांना नवी ऊर्जा आणि बळ मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा अनेक महान घटना एकाच वेळी घडतात, तेव्हा अनेकदा त्यांच्यामागे ‘योग-शक्ती’ म्हणजेच सामूहिक आणि एकसंध शक्ती असते. पंतप्रधानांनी अनेक महान व्यक्तींचे स्मरण केले ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासोबतच देशाच्या आत्म्याला नवसंजीवनी दिली. त्यापैकी तीन व्यक्तिमत्त्वे, श्री अरबिंदो, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी ज्यांच्या जीवनात एकाच वेळी अनेक महान घटना घडल्या. या घटनांनी या व्यक्तिमत्त्वांचे जीवनच बदलले नाही तर राष्ट्रीय जीवनात दूरगामी बदल घडवून आणले. पंतप्रधानांनी विषद केले की 1893 मध्ये श्री अरबिंदो भारतात परतले आणि त्याच वर्षी स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेत भाषण करण्यासाठी अमेरिकेला गेले. गांधीजी त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेला गेले होते, जिथे त्यांचे महात्मा गांधींमध्ये परिवर्तन होण्यास सुरुवात झाली होती. आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना आणि अमृत काळाचा प्रवास सुरू करत असताना श्री अरबिंदो यांची 150 वी जयंती आणि नेताजी सुभाष यांची 125 वी जयंती साजरी करत आहोत हा योगायोग त्यांनी नमूद केला. "प्रेरणा आणि कृती यांचा मिलाफ झाल्यावर, अशक्यप्राय ध्येय देखील निश्चितपणे संभव होते. आज अमृत काळातील राष्ट्राचे यश आणि ‘सबका प्रयास’ हा संकल्प याचा पुरावा आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की श्री अरबिंदो यांचे जीवन 'एक भारत श्रेष्ठ भारत' चे प्रतिबिंब आहे कारण त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता आणि त्यांना गुजराती, बंगाली, मराठी, हिंदी आणि संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी आपले बहुतांश आयुष्य गुजरात आणि पुद्दुचेरीमध्ये व्यतीत केले आणि ते जिथेही गेले तिथे त्यांची अमिट छाप सोडली. श्री अरबिंदो यांच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी टिप्पणी केली की जेव्हा आपण आपल्या परंपरा आणि संस्कृतीबद्दल जागरूक होतो आणि त्याद्वारे जगू लागतो, त्याच क्षणी आपली विविधता आपल्या जीवनाचा नैसर्गिक उत्सव बनते. “स्वातंत्र्याच्या अमृत काळासाठी हा एक मोठा प्रेरणास्रोत आहे. एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना समजावून सांगण्याचा याहून कोणताही चांगला मार्ग नाही,” ते म्हणाले.
काशी तमिळ संगममध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली, त्या गोष्टीचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की हा सुंदर कार्यक्रम म्हणजे, भारत आपली संस्कृती आणि परंपरांच्या माध्यमातून देशाला कसे एकसंध ठेवतो, याचे उत्तम उदाहरण आहे. काशी तमिळ संगमने दाखवून दिले की आजची तरुणाई भाषा आणि पोषाखाच्या आधारावर भेदभाव करणारे राजकारण सोडून एक भारत श्रेष्ठ भारताचे राजकारण अंगीकारत आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आणि अमृत काळात आपल्याला काशी तमिळ संगमचा भाव वृद्धिंगत करायचा आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की अरबिंदो हे असे व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या जीवनात आधुनिक वैज्ञानिक स्वभाव, राजकीय बंडखोरी आणि दैवी भावना देखील होती. बंगालच्या फाळणीच्या वेळी त्यांनी दिलेल्या ‘नो कॉम्प्रोमाइज’ (कोणतीही तडजोड नाही ) या घोषणेचे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांची वैचारिक स्पष्टता, सांस्कृतिक ताकद आणि देशभक्ती यामुळे ते त्या काळातील स्वातंत्र्य योध्यांसाठी आदर्श ठरले. सखोल तात्त्विक आणि अध्यात्मिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या अरबिंदो यांच्यामधील ऋषी-तुल्य पैलूंवर देखील मोदी यांनी भाष्य केले. त्यांनी उपनिषदांना सामाजिक सेवेची जोड दिली. विकसित भारताच्या प्रवासात आपण कोणतीही हीनतेची भावना न बाळगता, सर्व दृष्टीकोन आपलेसे करत आहोत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आपण ‘भारत प्रथम ’ या मंत्रासह काम करत आहोत, आणि आपला वारसा अभिमानाने जगासमोर प्रदर्शित करत आहोत.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, अरबिंदो यांचे जीवन हे भारताकडे असलेल्या आणखी एका सामर्थ्याला मूर्त रूप देते, जे “गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्तता” या पाच प्रतिज्ञांपैकी एक आहे. प्रचंड पाश्चात्त्य प्रभाव असूनही, भारतात परतल्यावर, आपल्या कारावासादरम्यान अरबिंदो यांचा गीता या ग्रंथाशी परिचय झाला आणि त्यानंतर ते भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आवाज म्हणून उदयाला आले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी रामायण, महाभारत आणि उपनिषदांपासून ते कालिदास, भवभूती आणि भर्तृहरीपर्यंतच्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि अनुवाद केला. “लोकांनी अरबिंदो यांच्या विचारांमध्ये भारत पाहिला, तेच अरबिंदो ज्यांना तरुणपणी भारतीयत्वापासून दूर ठेवण्यात आले होते. भारत आणि भारतीयत्वाचे हेच खरे सामर्थ्य आहे”, पंतप्रधान म्हणाले.
"भारत हे असे अमर बीज आहे, जे प्रतिकूल परिस्थितीत थोडे दडपले तर थोडेसे कोमेजून जाईल, पण मरणार नाही", पंतप्रधान म्हणाले. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारत ही मानवी संस्कृतीची सर्वात सुसंस्कृत कल्पना आहे, मानवतेचा सर्वात नैसर्गिक आवाज आहे.”
भारताच्या सांस्कृतिक अमरत्वाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “महर्षी अरबिंदो यांच्या काळातही भारत अमर होता, आणि आज स्वातंत्र्याच्या अमृत काळातही अमरच आहे.” आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी आजच्या जगासमोरच्या भीषण आव्हानांचा उल्लेख करत त्या आव्हानांवर मात करण्यामधील भारताच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले. “म्हणूनच महर्षी अरबिंदो यांच्याकडून प्रेरणा घेऊन, सबका प्रयास या मंत्राच्या मदतीने विकसित भारताची निर्मिती करण्यासाठी स्वतःला तयार करायला हवे”, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पार्श्वभूमी
अरबिंदो यांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 रोजी झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात चिरस्थायी योगदान देणारे ते दूरदर्शी होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि भारतीय नागरिकांचे कर्तृत्व साजरे केले जात आहे. याचा भाग म्हणून, अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशात वर्षभर विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
* * *
S.Kakade/V.Joshi/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1883238)
आगंतुक पटल : 276
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam