परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
जी-20 विकास कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचे मुंबईत 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान होणार आयोजन
Posted On:
12 DEC 2022 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2022
[पूर्वावलोकन]
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली विकास कार्य गटाची (डीडब्लूजी) पहिली बैठक मुंबईमध्ये 13 ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित होणार आहे. जी-20 सदस्य, अतिथी देश आणि निमंत्रित आंतरराष्ट्रीय संघटना या बैठकीत व्यक्तिशः सहभागी होणार आहेत.
या कार्य गटाच्या मुख्य बैठकीपूर्वी 13 डिसेंबर 2022 रोजी “विकासाकरता आकडेवारी- 2030 जाहीरनामा पुढे नेण्यामध्ये जी-20 ची भूमिका” आणि "हरित विकासामध्ये नवे ‘लाईफ’ फुलवणे” हे दोन छोटेखानी कार्यक्रम देखील भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. या दोन कार्यक्रमांनंतर ताज महाल पॅलेसमध्ये या शिष्टमंडळांमधील प्रतिनिधींसाठी स्वागतपर मेजवानीचे आयोजन होणार आहे.
- विकास कार्य गटाच्या बैठकीचे 14-15 डिसेंबर 2022 रोजी आयोजन होणार आहे.
- 2015 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या शाश्वत विकासाच्या 2030 जाहीरनाम्याच्या अतिशय महत्त्वाच्या मध्यबिंदूवर भारताचे जी-20 अध्यक्षपद आहे.
- वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या जी-20 चे घोषवाक्य आणि “ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” ही संकल्पना आहे.
- या विकास कार्यगटाच्या बैठकीत शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जी-20 ने केलेले प्रयत्न याविषयी चर्चा होणार आहे.
- शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसंदर्भातील प्रगतीला गती देण्याबाबतचे भारताचे प्रमुख प्राधान्यक्रम, पर्यावरण पूरक जीवनशैली आणि विकासासाठी डेटा यावर भर
- हरित विकासाच्या संदर्भात न्याय्य उर्जा संक्रमणाबरोबरच हवामानविषयक अर्थसाहाय्य आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांवर प्रामुख्याने भर राहणार आहे.
- तंत्रज्ञानाबाबत आपल्या मानवकेंद्री दृष्टीकोनाद्वारे शिक्षणासह शेतीपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाधारित विकास यावर देखील चर्चा होणार आहे.
शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसंदर्भातील प्रगतीला गती देण्याबाबतचे भारताचे प्रमुख प्राधान्यक्रम, पर्यावरणासाठी जीवनशैली आणि विकासासाठी डेटा यावर भर देत विकास कार्यगटाची बैठक 14-15 डिसेंबर रोजी होणार आहे.
2015 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या शाश्वत विकासाच्या 2030 जाहीरनाम्याच्या अतिशय महत्त्वाच्या मध्यबिंदूवर भारताचे जी-20 अध्यक्षपद आहे.या विकास कार्यगटाच्या बैठकीत शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जी-20 ने केलेले प्रयत्न याविषयी चर्चा होणार आहे.हरित विकासाच्या संदर्भात हवामानविषयक अर्थसाहाय्य आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांबरोबरच विकसनशील देशांसाठी न्याय्य उर्जा संक्रमण यावर देखील प्रामुख्याने भर राहणार आहे. हवामान बदलाची समस्या उद्योग, समाज आणि विविध क्षेत्रांना सारख्याच प्रमाणात भेडसावत असल्याचे लक्षात घेऊन लाईफ( पर्यावरण पूरक जीवनशैली) या संकल्पनेवर म्हणजे आपल्या समृद्ध, प्राचीन आणि शाश्वत परंपरांमधून निर्माण झालेल्या वर्तनावर आधारित, पर्यावरणाबाबत जागरुकता असलेली जीवनशैली आत्मसात करण्यासाठी ग्राहकांना आणि त्याचबरोबर बाजारांनाही जागृत करणाऱ्या चळवळीविषयी देखील चर्चा होणार आहे. वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या जी-20 चे घोषवाक्य आणि “ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या भारताच्या संकल्पनेशी लाईफचा अतिशय जवळचा संबंध आहे. तंत्रज्ञानाबाबत आपल्या मानवकेंद्री दृष्टीकोनाद्वारे शिक्षणासह शेतीपर्यंतच्या विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाधारित विकास यावर देखील चर्चा होणार आहे.शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महिलांना आघाडीच्या स्थानांवर आणण्यासाठी आणि नेतृत्व देण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे प्रतिनिधित्व यावर देखील चर्चा होणार आहे.
विकास कार्यगटाच्या प्रमुख बैठकीनंतर शिष्टमंडळांमधल्या प्रतिनिधींची 16 डिसेंबर 22 रोजी कान्हेरी गुंफा इथे एक अभ्यास सहल देखील आयोजित होणार आहे.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882865)
Visitor Counter : 293