राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिनाच्या समारंभाला राष्ट्रपतींनी लावली उपस्थिती
Posted On:
10 DEC 2022 4:45PM by PIB Mumbai
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज 10 डिसेंबर, 2022 ला नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, संपूर्ण मानवजातीसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण याच दिवशी 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला होता.त्यांनी नमूद केले की मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्याचे जगातील वेगवेगळ्या 500 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.त्यामुळे हा दस्तावेज मानवी इतिहासातील सर्वात जास्त अनुवादीत झालेला दस्तावेज आहे.
भारतात, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जनजागृती करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे ही वस्तुस्थिती आपल्याला दिलासादायक आहे ,असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं . राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आपल्या तीस वर्षाच्या काळात मानवी हक्कांना संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे. मानवी हक्कांसाठी विविध जागतिक मंचांमध्येही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सहभागी असतो. आपल्या कामाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असल्याचा भारताला अभिमान आहे.असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, संवेदनशीलता आणि सहानुभूती विकसित करणे ही मानवी हक्कांना चालना देण्याची गुरुकिल्ली आहे. हा मूलत: मानवी कल्पनाशक्तीचा संवेदनशील अभ्यास आहे. ज्यांना मानवापेक्षा कमी समजून दुय्यम वागणूक दिली जाते त्यांच्या जागी जर आपण स्वतःची कल्पना करू शकलो, तर आपल्याला त्याची जाणीव होऊन आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी तयार होऊ.
राष्ट्रपती म्हणाल्या की, हवामान बदलाचे आव्हान इतके मोठे आहे की ते आपल्याला मानवी‘अधिकार’ पुन्हा परिभाषित करण्यास भाग पाडत आहे.
राष्ट्रपतींनी सांगितलं की आपल्या सभोवतालचे प्राणी आणि झाडे जर बोलू शकले असते तर आपल्याला काय सांगितलं असतं ? आपल्या नद्या मानवी इतिहासाबद्दल काय म्हणतील ? आपली गुरेढोरे मानवी हक्कांच्या विषयावर काय म्हणतील ? हा सर्व विचार करायलाच हवा. त्या म्हणाल्या की, आम्ही त्यांचे अधिकार दीर्घकाळ पायदळी तुडवले आणि आता त्याचे परिणाम आमच्यासमोर आहेत. निसर्गाशी साहचर्य राखत वागणे आपण शिकले पाहिजे, पुन्हा पुन्हा शिकले पाहिजे. हे केवळ नैतिक कर्तव्य नसून ते आपल्या स्वतःच्या जगण्यासाठी देखील आवश्यक आहे, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882393)
Visitor Counter : 225