रेल्वे मंत्रालय
काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचे स्मरण म्हणून काशी तमिळ संगमम एक्स्प्रेस या नवीन रेल्वे सेवेची रेल्वे मंत्र्यांनी केली घोषणा
Posted On:
10 DEC 2022 12:13PM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचे स्मरण म्हणून काशी आणि तामिळनाडू दरम्यान धावणाऱ्या काशी तमिळ संगमम एक्स्प्रेस या नवीन रेल्वे सेवेची घोषणा केली आहे. काशी तामिळ संगमम या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केलेल्या तामिळनाडूतील प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचीही त्यांनी पाहणी केली.
अश्विनी वैष्णव यांनी यावेळी आठव्या तुकडीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत करणाऱ्या रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसी चमुच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या परस्पर संवादामुळे परंपरा, ज्ञान आणि संस्कृती एकमेकांच्या जवळ येतील, तसेच सामायिक वारशाची जाणीव निर्माण होईल आणि या दोन प्रदेशातील लोकांमधील संबंध दृढ होतील.
मंत्री वैष्णव यांनी या कार्यक्रमाचे स्मरण म्हणून काशी आणि तामिळनाडू दरम्यान धावणाऱ्या काशी तमिळ संगमम एक्स्प्रेस या नवीन रेल्वे सेवेची घोषणा केली. लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनांचाही आढावा घेतला. भविष्यात होणारी रहदारी लक्षात घेऊन स्थानकाच्या पुनर्विकासाचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानकाची पाहणी करताना मंत्री म्हणाले की, या स्थानकाचा जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकात पुनर्विकास करणे हे, रेल्वे स्थानक विमानतळ टर्मिनलसारखे बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. ते म्हणाले की, या रेल्वे स्थानकाला जगातील सर्वोत्तम स्थान बनवण्यासाठी सुमारे 7000 कोटी रुपये खर्च केले जातील.
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून काशी तमिळ संगमम हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेला महिनाभर चालणारा कार्यक्रम आहे. काशीतील या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना आमंत्रित केले जाते.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882326)
Visitor Counter : 182