आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या पायाभूत सुविधांमधील मैलाचा दगड असलेल्या आणि देशाच्या आरोग्य संशोधनाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रीय वन हेल्थ संस्थेच्या नागपूर इथे प्रस्तावित इमारतीचा कोनशिला समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार
या संस्थेत, नवीन स्वरूपाचे आणि अज्ञात प्राणीजन्य आजार ओळखण्यासाठी क्षमता आणि सज्जता वाढवली जाणार
पंतप्रधानांच्या हस्ते, हिमोग्लोबिनोपॅथीशी संबंधित आनुवंशिक आजारांवर संशोधन व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचेही होणार उद्घाटन, हिमोग्लोबिनोपॅथी आणि तत्सम आजारांवरील संशोधनात या केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार
Posted On:
10 DEC 2022 2:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, उद्या, म्हणजेच 11 डिसेंबर 2022 रोजी, नागपूर इथं राष्ट्रीय वन हेल्थ संस्थेच्या प्रस्तावित इमारतीची पायाभरणी आणि हिमोग्लोबिनोपॅथीशी संबंधित आनुवंशिक आजारांवर संशोधन व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
वैद्यकीय उत्कृष्टतेशी संबंधित या दोन संस्था, देशांत आरोग्यविषयक संशोधनाला चालना देतील, आणि अशा आजारांना बळी पडणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात महत्वाची भूमिका बजावतील. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ’ या संस्थेच्या इमारतीची पायाभरणी आणि चंद्रपूर इथे आयसीएमआरच्या हिमोग्लोबिनोपॅथीशी संबंधित आनुवंशिक आजारांवर संशोधन व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, केंद्रीय आरोग्य सचिव डॉ राजीव बहल, आणि आयसीएमआरचे महासंचालक यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मानव आणि पाळीव किंवा जंगली प्राणी यामधील संपर्क वाढत असल्याने, तसेच, आता त्यावर हवामान बदलाचाही परिणाम होत असल्याने, केवळ मानवी आरोग्याकडे स्वतंत्रपणे बघता येणार नाही. मानवाला होणाऱ्या संसर्गापैकी निम्यापेक्षा जास्त संसर्ग प्राण्याद्वारे पसरला जाऊ शकतो. याच संदर्भात, राष्ट्रीय वन हेल्थ संस्थेची होणारी उभारणी, भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार आहे. या संस्थेत, अज्ञात स्वरूपाच्या आणि अज्ञात अशा प्राणीजन्य आजार पसरवणाऱ्या घटकांचा शोध घेण्यासाठीची सज्जता आणि क्षमता वाढवली जाईल. याच कार्यासाठी समर्पित अशा या संस्थेत, सुसज्ज-अत्याधुनिक अशी, बायो सेफ्टी लेव्हल (BSL-IV) प्रयोगशाळा असेल. यामुळे, प्राणीजन्य आजार पसरवू शकणाऱ्या घटकांवर संशोधन होऊन, अशा आजारांचा उद्रेक रोखता येऊ शकेल, ज्यामुळे सार्वजनिक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
मध्य भारतात, विदर्भ, विशेषतः विदर्भाच्या ग्रामीण आदिवासी भागात सिकल सेल आजाराचे प्रमाण अधिक आहे, त्यातही या आजाराच्या वाहक जीवाणूची क्षमता काही आदिवासी समुदायात 35 टक्क्यांपर्यंत असल्याचेही सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेत, तसेच अशाच प्रकारच्या आजारांचा, देशांत सगळीकडे होणारा फैलाव बघता, आयसीएमआर च्या हिमोग्लोबिनोपॅथीशी संबंधित आनुवंशिक आजारांवर संशोधन व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. हे केंद्र, हिमोग्लोबिनोपॅथी आणि संबंधित आजारांवर संशोधन करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल . ह्या केंद्रात, अत्याधुनिक निदान आणि संशोधन करण्यावर भर दिला जाईल, ज्यामुळे भारताला या क्षेत्रात मोठे क्रांतिकारी संशोधन करण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. हे केंद्र हिमोग्लोबिनोपॅथीशी संबंधित आजारांना समर्पित आहे. त्यातही, हिमोग्लोबिनशी संबंधित आजार जसे की, बी-थेलेसेमिया सिंड्रोम आणि सिकल सेल सारख्या आजारांचा समावेश असेल. या केंद्राद्वारे सामुदायिक नियंत्रण कार्यक्रम आणि अनुवादात्मक संशोधनाद्वारे मार्गदर्शन केले जाईल, ज्याचा फायदा चंद्रपूर आणि आसपासच्या भागातील रुग्णांना होईल.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882321)
Visitor Counter : 238